इतिहासताज्या बातम्या

शिवरायांच्या समाधीचा शोध कोणी आणि कसा लावला?

शिवराय उभ्या हिंदुस्थानचे दैवत आणि त्यांची समाधी म्हणजे तेरावे ज्योतिर्लिंगच. ह्या समाधी पुढे झुकताना जो आनंद प्राप्त होतो तो कशातच नाही. ज्या राजाने उभे आयुष्य स्वराज्यासाठी वेचले, त्या शिवछत्रपतींची समाधी रायगड किल्ल्यावर असल्यामुळे त्या किल्ल्याला वेगळी शोभा प्राप्त झाली आहे.

पण ही समाधी कोणी बांधली? कोणी शोधली? तिचा जीर्णोद्धार कोणी केला? फुले, टिळक ह्यांचे नेमके काय योगदान होते? आणि विशेष म्हणजे इथे सापडलेल्या शिवरायांच्या अस्थींचे काय झाले? सारे काही पाहुयात आजच्या लेखात.

शिवरायांच्या समाधीचा शोध अनेकांनी घेतला. त्यात इतिहासकारांनी जे निष्कर्ष काढले ते असे की रायगडावर ३ एप्रिल १६८० ला शिवराय निर्वाणीस गेले. त्यांना जगदीश्वराच्या मंदिरापुढे अग्निडाग देण्यात आला. शंभूराजे तेव्हा पन्हाळगडावर होते. पण इथे राजांचे अंत्यसंस्कार पूर्ण झाले होते.

शंभूराजे रायगडावर पुन्हा आले तेव्हा त्यांनी शिवरायांची समाधी व्यवस्थितपणे बांधून काढली. अष्टकोनी असणारी शिवसमाधी जणू राजमुद्रेचेच प्रतीक होती. जिजाऊंच्या समाधीला जशी दिवाबत्तीची सोय होती तिच सोय शिवसमाधीला देखील करण्यत आली. पुढे शिवसमाधीचा उल्लेख कुठेच सापडत नाही. तो सापडतो थेट इंग्रजांच्या काळात.

शिवरायांची समाधी ही अत्यंत पवित्र होती हे इंग्रज देखील जाणून होते. त्यांनी चुकीचा इतिहास मांडला पण शिवरायांचे कार्य व दहशत त्यांना माहिती होती. एका महान राजाची समाधी आहे म्हणत कर्नल प्रॉथरने तिचा उल्लेख केलेला आहे. १८१८ मध्ये इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला.

रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तेव्हा प्रॉथरने केलेले वर्णन असे की इथे महान शिवाजी महाराजांची समाधी आहे, जी इथल्या लोकांकडून उपेक्षित राहिली आहे. मंदिरापुढे असणारा चौथरा ह्या समाधीचा आहे. पण ह्या लोकांनी समाधीची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत नाही.

ह्या नंतर शिवसमाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनीच घेतला. अनेक लोक ह्या गोष्टीला काल्पनिक मानतात. पण ह्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत. इंग्रजांकडून समाधीच्या गोष्टी ऐकत फुलेंनी रायगडावर जाऊन समाधी शोधण्याचे कार्य केले. ज्योतिबा रायगडावर गेले तिथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला.

वाटेत येणारे काटेकुटे, झुडपे सारे तोडत ज्योतिबा गडमाथ्यावर पोहचले. तिथे त्यांना जगदीश्वराच्या मंदिरापुढे समाधी सापडली. आता अनेकांचे असे म्हणणे असते की समाधी आधीपासून होती मग ज्योतिबांनी शोधली, असे कसे म्हणता येईल.

तर इतिहासकार वा. सी. बेंद्रे ह्यांनी देखील संभाजी महाराजांची समाधी तुळापूरला नसून वढू बुद्रुकला असल्याचे शोधून काढले होते. तेव्हा देखील संभाजी महाराजांची समाधी वढू बुद्रुकला होती. पण ती जगासमोर आणल्यामुळे त्याला शोध असे म्हणतात.

फुलेंनी शिवछत्रपतींची समाधी स्वच्छ केली आणि त्यावर काही फुलं वाहिली. गावातील ग्राम जोशी तिथे आला व त्याने लाथेने ती फुलं उधळून लावलीत. ज्योतिबांनी त्यास दमदाटी करून माघारी धाडले. असा सर्व प्रकार ह्या शोधादरम्यान घडला. हा सगळा वृत्तांत नारायण मेघाजी लोखंडे ह्यांच्या ‘दिनबंधू’ ह्या वर्तमानपत्रात छापून आला होता.

शिवसमाधी तशी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे नंतर कोल्हापूरचे आबासाहेब घाटगे ह्यांनी देखील समाधीच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले. पण पुढे त्यांचे निधन झाले. इंग्रजांनी देखील अनेकदा ह्या समाधीचे वर्णन केले. ज्योतिबांच्या नंतर पुन्हा लोक रायगडावर जाऊ लागले होते.

इंग्रजांनी वर्षाला ५ रुपये समाधीच्या डागडुजी करता दिले. पुढे लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांची भेट घेऊन हे काम हाती घेतले. ‘श्री शिवाजी रायगड स्मारक’ नावाची संस्था निर्माण करत त्यांनी मोठा निधी जमा केला. पण ज्या बँकेत हा निधी होता ती बँक बुडाली. नंतर टिळक निधन पावले आणि पुन्हा समाधीच्या जिर्णोद्धाराचा विषय जोर धरू लागला.

शिवछत्रपतींची समाधी बांधण्याचे इंग्रजांनी देखील ठरवले होते. नंतर हा विषय अस्मितेचा न राहता राजकारणाचा बनला. पण तरीही इंग्रजांनी श्री शिवाजी स्मारक मंडळाला मदतीस सोबत घेतले आणि समाधी बांधण्याचे काम चालू झाले. तात्यासाहेब सुळे ह्यांनी हे कार्य हाती घेतले.

तेव्हा उत्खनन चालू असताना तिथे अस्थी सापडल्या. त्या तपासण्यासाठी कलकत्त्याला पाठवण्यात आल्या. वैज्ञानिक तपासणीचा अहवाल आणि इतिहासकारांच्या सांगण्यावरून त्या अस्थी शिवाजी महाराजांच्याच असाव्यात असा निष्कर्ष निघाल्यावर काही लोकांनी थोड्या थोड्या करत ह्या अस्थी आपल्या घरी नेल्या व उरलेल्या अस्थी कलशात भरून त्यावर समाधी बनवण्यात आली.

शिवसमाधी कोणी बांधली ह्यावर आपण आज वाद घालत बसतो. पण आपल्या क्रांतिकारकांनी व समाजसुधारकांनी ही समाधी समाज एकत्र आणण्यासाठी बांधली होती. आपण मात्र त्या समाधी पुढे नतमस्तक व्हायचे सोडून वाद घालतो. शिवसमाधी खरोखर एक प्रेरणास्थान आहे. तिथे जाऊन मस्तक टेकवावे आणि हाती असणारे कार्य पूर्ण करावे हेच सुज्ञपणाचे लक्षण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button