इतिहासताज्या बातम्या

स्वराज्य बांधणीत शिवरायांच्या ८ विवाहांचे योगदान काय?

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही विचार करून केलेली असायची. उगीच स्वतःच्या आनंदासाठी महाराजांनी एकही क्षण व्यतीत केला नसेल. शिवराय जरी सिंहासनाधिष्ठित झाले असले आणि रयत त्यांची लेकरं असली तरी त्यांनी कधीही स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

शिवरायांचे आठ विवाह झाले होते, हे आपण जाणतोच पण ही गोष्ट देखील अत्यंत विचार करून जिजाऊंनी आणि शिवरायांनी केली होती. आजच्या लेखात आपण शिवरायांच्या आठ विवाहांमागील कारणं आणि अर्थ जाणून घेणार आहोत.

हे विवाह मराठी सरदारांना एकत्र आणण्यासाठी केले होते, हे आपल्याला माहिती असेल मात्र ह्याचा योग्य परिणाम झाला का, इतके विवाह करून शिवरायांना आणि स्वराज्याला काय प्राप्त झाले, हे जाणून घेऊ आजच्या लेखात.

जिजाऊंनी शहाजी राजांच्या बरोबरीने ह्या स्वराज्याचा विचार केला होता. पण शहाजी राजांना त्रास झाला तो आप्त स्वकीयांमुळेच. मराठे एकत्र राहिले असते तर कदाचित आपण पारतंत्र्यात अडकलोच नसतो हे जिजाऊंना कळले होते. म्हणूनच शिवरायांकडून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याआधी जिजाऊंनी मराठी सरदारांना एकत्र आणायला सुरुवात केली होती.

काही मंडळी एकत्र तर यायची पण अडीअडचणीच्या काळी शत्रूला सामील व्हायची. शिवाय ह्या प्रत्येक सरदाराच्या मनगटीत जोर होता. गरज होती ती केवळ एकीची. आणि ती एकी झाली शिवरायांच्या विवाहाच्या निमित्ताने.

एकदा का एखाद्या सरदाराची मुलगी आपली सून झाली की, ते घराणे स्वराज्याच्या विरोधात जाणार नाही, सर्व मतभेद सोडून ही मंडळी स्वराज्यासाठी एकत्र येतील, हाच उद्देश समोर ठेऊन जिजाऊंनी शिवरायांचा पहिला विवाह ‘सईबाई’ ह्यांच्या सोबत लावला.

फलटणच्या निंबाळकर घराण्यासोबत जोडलेले हे संबंध नवीन नव्हते. जिजाऊंच्या सासूबाई ‘दीपाऊ’ आणि आई ‘म्हाळसाबाई’ ह्या दोघी निंबाळकर घराण्यातील होत्या. जरी सईबाई ह्यांचे बंधु बजाजी आदिलशाहीत होते तरी नंतर त्यांनी स्वराज्यासाठी मोहीमा केल्याचे इतिहासकार सांगतात.

शिवाजी महाराजांचा पहिला विवाह बघता आला नाही म्हणून शहाजी राजांनी शिवरायांचा दूसरा विवाह बंगळूरला आपल्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई ह्यांच्या भावाच्या मुलीशी अर्थात ‘सोयराबाई’ ह्यांच्या सोबत लावला. ह्या मोहिते घराण्यातील होत्या.

या घराण्यामुळे स्वराज्याला ‘हंबीरराव मोहिते’ व ‘महाराणी ताराबाई साहेब’ लाभल्या. पुढे शिवरायांचा विवाह पालकर घराण्यातील पुतळाबाई ह्यांच्या सोबत झाला. पुतळाबाई ह्यांचे काका म्हणजेच नेतोजी पालकर. ज्यांची ओळख प्रती शिवाजी अशी होती. नेतोजी स्वराज्याचे सेनापती होते. ह्यावरूनच समजते की जिजाऊंनी जो लोकांना संघटित करण्याचा विचार केला होता तो योग्य होता.

शिवाजी महाराजांचा विवाह नंतर शिर्के घराण्यातील ‘सगुणाबाई’ ह्यांच्या सोबत झाला. हे शिर्के घराणे अत्यंत नामवंत होते. जेव्हा अल्लाउद्दीन अजमशाने मलिक तूज्जार ह्या आपल्या माणसाला विशाळगड घेण्यास पाठवले तेव्हा दक्षिणीत शिर्के आणि मोरे राज्य करीत होते.

ह्या शिर्क्यांनी मलिक तूज्जारच्या सैन्याला सह्याद्रीच्या जंगलामध्ये गनिमी कावा करत हरवले. अर्थात अत्यंत हुशार असणारे हे घराणे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते. शंभूराजांच्या पत्नी ‘महाराणी येसुबाई’ ह्या देखील शिर्के घराण्यातील होत्या. शिवाजी महाराजांनी नंतर गुप्त मोहिमेदरम्यान विचारे घराण्यातील ‘लक्ष्मीबाई’ ह्यांच्या सोबत विवाह केला. लक्ष्मीबाई ह्यांचे बंधु पुढे शिवरायांकरीता पावनखिंडीत धारातीर्थी पडले.

जिजाऊ मासाहेबांनी नंतर शिवरायांचा विवाह नामवंत असणाऱ्या गायकवाड घराण्यातील ‘सकवारबाई’ ह्यांच्या सोबत लावला. गायकवाड घराणे अत्यंत इमानदार होते. प्रतापगडी जेव्हा शिवरायांची अफजलखानासोबत भेट झाली तेव्हा दहा अंगरक्षकांपैकी एक सकवारबाई ह्यांचे बंधु नांदोजीराव गायकवाड होते.

अगदी ह्याच प्रमाणे इंगळे घराणे होते. हे घराने तसे तंजावरचे होते. पण जिजाऊंसोबत ते वऱ्हाडला आले होते. आदिलशाहीत अत्यंत महत्वाच्या पदावर इंगळे सरदार होते. ‘गुणवंतीबाई इंगळे’ ह्यांच्या सोबत राजांचा विवाह झाला होता. गुणवंतीबाई ह्यांचे बंधु कात्याजी इंगळे अफजलखान प्रसंगी राजांचे अंगरक्षक होते.

तसेच शिवरायांनी केलेल्या पहिल्या लढाईत शिवाजी इंगळे हे इंगळे घराण्यातील सरदार कामी आले होते. रूस्तम-ए-जमान व फाजल खान स्वराज्यावर चालून आले तेव्हा हिरोजी इंगळे राजांसोबत होते. तसेच पन्हाळगडावर त्र्यंबकजी इंगळे किल्लेदार होते आणि यांच्या सोबतीला बाळाजी व कान्होजी इंगळे होते.

शिवरायांनी आणखी एक विवाह केला तो जाधव घराण्यातील काशीबाई ह्यांच्या सोबत. जिजाऊ स्वतः जाधव घराण्यातील होत्या. पण हे नाते आणखी पक्के व्हावे ह्या हेतूने ही सोयरीक झाली होती. काशीबाई ह्यांचे बंधु देखील पावनखिंडीत शिवरायांसाठी धारातीर्थी पडले होते.

असे हे घराणे व त्या घराण्यातील आप्तेष्ठ मंडळी स्वराज्यासाठी कामी आली. पुढे देखील शिवरायांनी आपल्या मुलामुलींचा विवाह ह्याच घराण्यात लावला. हेच शंभुराजांनी केले. ह्याच साथीमुळे स्वराज्य निर्माण झाले व त्याचे रक्षण देखील ह्याच लोकांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button