ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

बनावट नोटा कशा ओळखायच्या?

सध्या देशात बनावट नोटांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नुकतीच आकडेवारी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०२ टक्क्यांने वाढ झाली आहे. २००० रुपयांच्या नोटांमध्ये ५४ टक्के तर १० रुपयांच्या नोटांमध्ये १७ टक्क्यांने वाढ झाली आहे.

मागील वर्षीच्या पेक्षा यावर्षी ११ टक्के जास्त बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. या बनावट नोटांमध्ये सगळ्यात जास्त ८५-८८ टक्के नोटा या ५०० व २००० रुपयांच्या होत्या. पण हे असं असलं तरी सर्वसामान्यांना या बनावट नोटा ओळखायच्या कशा, हा मोठा प्रश्न पडला आहे. तर याचं उत्तर आपण या लेखातून मिळवूया.

बनावट नोट कशाला म्हणतात?

फेक इंडियन करन्सी नोट म्हणजे एफआयसीएन. बनावट नोटेला कायद्याच्या भाषेत हेच नाव आहे. या नोटा ‘सरकारच्या मान्यताप्राप्त छापखान्यात तयार केलेल्या नसतात. भारतीय रिझर्व्ह बँके शिवाय बाकी कुणीही नोटा छापू शकत नाही. तर अशा मान्यता नसलेल्या ठिकाणाहून नोटा छापणं व त्या वापरणं हा गुन्हा आहे.

कशा येतात बनावट नोटा बाजारात?

बनावट नोटांची छपाई आणि बाजारात वितरीत करणं यासाठी लोक कार्यरत असतात. हे बनावट नोटांची रॅकेट्स म्हणून ओळखले जातात. याचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. देशातील देशविरोधी गटांनी छापलेल्या बनावट नोटा हा झाला पहिला प्रकार.

या प्रकारात नोटांचे बनावट साचे बनवून नोटा छापल्या जातात. अशी रॅकेट्स पकडणं तपास यंत्रणांसाठी त्या मानाने सोपं काम आहे. बँकेतही या नोटा सहज पकडल्या जातात. परदेशातील देशविरोधी शक्तींनी चालवलेला बनावट छपाईचा उद्योग उदा.

आयएसआय व अन्य दहशतवादी संघटना यांचा उद्देश भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा आणि आर्थिक दहशतवाद पसरवण्याचा असतो. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून अशा बनावट नोटा मोठ्या संख्येने भारतात आणल्या जातात.

त्यामुळे हे काम करणारी रॅकेट्स आणि त्यांनी बाजारात आणलेल्या बनावट नोटा सहज ओळखणं सोपं नाही. हा झाला दुसरा प्रकार. म्हणूनच आपण सर्वसामान्यांनी खासकरून ५००, २००० च्या नोटांची देवघेव करताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

कशा ओळखायच्या बनावट नोटा?

बनावट नोट ओळखण्यासाठी काही निकष असतात, ते आता पाहूया,

● आपण नोट प्रकाशात धरली असता, प्रकाश पार जाईल असा भाग नोटेच्या पुढच्या बाजूला आहे. नोटेची किंमत जितकी आहे, तो आकडा त्या भागावर उमटवलेला असतो, तो प्रकाशात नोट धरल्यावर सहज दिसतो. उदा. ५०० रुपयाच्या नोटेवर ५०० हा आकडा आणि २००० रुपयांच्या नोटेवर २००० हा आकडा उमटवलेला असतो. नोट दिव्यासमोर धरली असता लगेच प्रकाशात ते आकडे आपल्याला दिसतात.

● देवनागरी भाषेत नोटेची किंमत नोटेच्या पुढच्या बाजूला लिहिलेली असते.

● डोळ्यासमोर नोट थोडी तिरपी धरली असता त्या नोटेवर किंमत सांगणारा आकडा दिसून येतो. हे नोटेच्या पुढच्या भागात दिसतं.

● ५०० रुपयांची नोट ही नवीन मालिकेतील असून महात्मा गांधी यांच्या फोटोची जागा आणि त्याचं आकारमान यांत आधीपेक्षा फरक आहे हे आढळून येतं. नव्या मालिकेतील सर्व नोटांमध्ये फोटोचा आकार व जागा एकसारखाच आहे.

● नोट खरी आहे हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य समजून यावं त्यासाठी नोटेमध्ये एक भाग दिसतो, जो चांदीचा असतो. नोट वाकवून पहिली असता त्याचा हिरवा रंग निळा रंगात बदलतो.

● नव्या मालिकेतील नोटांमध्ये गव्हर्नर यांचा संदेश, त्यांची सही आणि रिझर्व्ह बँकेचं बोधचिन्ह हे आता महात्मा गांधींच्या फोटोच्या उजव्या बाजूला आहे. जे आधीच्या नोट मध्ये मध्यभागी खालच्या बाजूला होतं.

● नोटेच्या पुढच्या भागावर जी पांढऱ्या रंगात असणारी जागा आहे ती प्रकाशात पाहिली असता महात्मा गांधींच्या चित्राचा वॉटरमार्क दिसून येतो.

● नोटेवर उजवीकडे हिरव्या रंगात ‘₹ 500’ असं लिहिलं आहे. याचा रंग साधारणपणे हिरवा दिसतो परंतु नोट हलवली असता त्याचा रंग निळा झालेला दिसतो.

● त्याच्या खाली नोटेचा क्रमांक छापलेला असतो, तो नीट पाहिला असता लक्षात येतं की यातील आकडे डावीकडून उजवीकडे जाताना मोठे होत जातात.

● ‘₹500’ आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला अशोकस्तंभ दिसतो. अशोकस्तंभाच्या वरच्या बाजूला अंध लोकांना नोट ओळखता यावी म्हणून चिन्ह छापलं आहे. तसेच नोटेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाच छोट्या रेषा आहेत.

● आता नोटेच्या मागे डाव्या बाजूला नोट ज्या वर्षी छापली असेल ते वर्ष दिलेलं असतं. तर खालच्या बाजूला स्वच्छ भारत मोहिमेचं बोधचिन्ह आणि संदेश दिलेला असतो.

● मागच्या बाजूला बरोबर मध्ये विविध भारतीय भाषांमध्ये नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं.

● प्रत्येक नोटेच्या मागच्या बाजूला भारताच्या दृष्टीने महत्वाच्या घटनेचं एखादं चित्र असतं. जसं वर सांगितल्याप्रमाणे पाचशेच्या नोटेवर लाल किल्ला आणि दोन हजारच्या नोटेवर मंगळयानाचं चित्र आहे.

● मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेत नोटेचं मूल्य लिहिलेलं आहे.

 
बनावट नोटा आपल्याला सापडल्यास काय करावे?

आपण प्रत्येक नोट ही वरील निकष लावून तपासून घ्यावी. त्यासाठी कायमच जागरूक असावं. जर अनावधानाने बनावट नोट आपल्याकडे आलीच तर नजीकच्या दंडाधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

बँकेत पैसे भरायला जाताना त्यात बनावट नोट आली तर बँक आपल्यासमोर ती नोट जप्त करते आणि त्या ऐवजी एक पावती देते. याच्या बदली तितकी रक्कम आपल्याला मिळत नाही.

जप्त केलेली नोट स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. पण एखादी बनावट नोट बँकेकडून किंवा एटीएम मधून मिळाली व ती बनावट असल्याचं सिद्ध झालं तर आपल्याला ती बदलून मिळू शकते.

म्हणून वर सांगितलेल्या गोष्टी जागरूकपणे करा कारण आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्याची आपलीही तितकीच जबाबदारी आहे. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला अशा बनावट नोटेचा अनुभव आला असेल तर तोही आमच्याशी नक्की शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button