इतिहासताज्या बातम्या

शिवकाळातील चलन कसे होते? पाहा फोटो…

शिवरायांचे स्वराज्य आणि तो संपूर्ण शिवकाळ स्वत्व टिकवण्यासाठीच होता. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले किल्ले, आपली भूमी सारे आपल्या राज्यात टिकावे म्हणून हे स्वराज्य निर्माण केले गेले होते.

प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून स्वराज्याला व रयतेला कसा लाभ होईल हे शिवराय नेहमी पहायचे. तसेच एक पाऊल महाराजांनी आपल्या स्वत्वासाठी उचलले होते.

अर्थकारणाला नवीन चालना मिळाली होती. शिवरायांनी स्वतःच्या नावे चलन चालू केले होते. शिवराई आणि होन ही नाणी आपल्याला माहितीच आहेत.

आजच्या लेखामधून आपण शिवकाळातील हेच चलन कसे चालायचे? ते किती प्रकारचे होते? कुठे निर्माण व्हायचे? हे पाहणार आहोत.

शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले म्हणजेच भूमीपुत्रांचे राज्य निर्माण केले. इथे स्वत्वाला महत्व होते. जसे राजाभिषेका वेळी महाराजांनी भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला अगदी तसेच राजांनी स्वराज्यासाठी नाणी बनवण्यास सांगितली.

हे चलन परकीय नाही तर स्वकीय असणार होते. ह्या आधी पातशाही होन, अशरफी इत्यादी मोगलांचे वा इतर बादशहांचे चलन स्वराज्यात चालायचे.

ह्याच गोष्टीवर शिवरायांना बंदी घालायची होती. हेन्री ऑक्सिंडन हा इंग्रज अधिकारी जेव्हा रायगडावर राजाभिषेकासाठी गेला होता तेव्हा तो इंग्रजांच्या काही मागण्या शिवरायांकडून पूर्ण करून घेणार होता.

एकूण १९ मागण्या घेऊन आलेल्या हेन्रीची शेवटची मागणी होती ती म्हणजे इंग्रजांचे चलन स्वराज्यात चालवण्याची. पण महाराजांनी ती मागणी नाकारली.

त्यावर फुली मारत राजांनी स्वत्व टिकवले. शिवरायांना स्वतःच्या चलनाविषयी आणि स्वराज्यविषयी किती प्रेम असेल हे ह्यातून दिसते.

शिवरायांनी रायगडावर टंकसाळ अर्थात नाणी पडण्याचा कारखाना निर्माण केला होता. जी आजही रायगडावर पाहता येते. केवळ रायगड नाही तर इतरही काही किल्ल्यांवर ह्या नाणी पाडल्या जात होत्या.

शिवरायांनी प्रामुख्याने दोन प्रकारची नाणी पाडली ‘होन’ आणि ‘शिवराई’. ह्यातील होन सोन्याचा व शिवराई तांब्याची होती.

होन हा कन्नड शब्द असून त्याचा अर्थ सुवर्ण असा होतो. ह्या दोन्ही नाण्यांवर एका बाजूने ‘श्री राजा शिव’ तर दुसऱ्या बाजूने ‘छत्र पती’ असे शब्द वेगवेगळे करून लिहिले होते.

केवळ एक टंकसाळ नसून अनेक किल्ल्यांवर ह्या नाणी पाडण्याचे काम चालायचे. त्याचे परवाने महाराजांनी लोकांना दिले होते. एका विशिष्ट पद्धतीने ती इतर नाणी पाडली जायची. त्यावर एक वेगळे चिन्ह असायचे म्हणून त्याला निशाणी होन म्हणायचे.

आज ह्याच एका होनाची किंमत तेरा लाख रुपये इतकी आहे. शिवराई बाबतीत विचार केला की समजते ६४ शिवराई म्हणजे एक रुपया. ह्यात अर्धी शिवराई देखील मिळायची.

एक टंकसाळेत सगळी नाणी निर्माण होत नसत त्यामुळे त्यांच्यात थोडा फरक जाणवतो. त्यावरील शिव ह्या शब्दातील वेलांटी बदलते. कधी कधी ‘सिव’ असे छापलेले दिसते.

शिवकाळात ह्या व्यतिरिक्त इतरही नाणी चालायची. अचानक इतर सगळ्या चलनावर बंदी घालणे शक्य नव्हते. म्हणून काही मोगली चलन देखील राजाभिषेकानंतर काही वर्षे सुरू राहिले.

गंभार, होन, पुतळी, रुणगिरी, पातशाही देवराई, अच्युतराई, रामचंद्रराई, धारवाडी, फलम, चक्रम असे इतर चलन देखील स्वराज्यात चालायचे.

मोहोरा ह्या नाणी एक राजा दुसऱ्या राजाला भेट देताना वापरायचा. यादव काळातील पगोडा हे चलन देखील वापरात होते.

आज जसे सुट्टे पैसे असतात त्याप्रमाणे शिवकाळात देखील अशी नाणी होती. प्रताप, धवल, चवल हे त्याचीच उदाहरणे. दोन ‘वीस’ नामक नाणी म्हणजे एक ‘व्यान’.

तसेच दोन ‘व्यान’ म्हणजे एक ‘दुव्वल’. ह्यात फलम नावाच्या नाण्यावर केवळ ‘छत्रपती’ लिहिलेले असायचे. दहा फलम म्हणजे एक होन अशा किंमती ठरलेल्या होत्या.

आज होन हा प्रकार पाहायला मिळत नाही. काही इतिहासकार ह्याचे कारण सांगतात की मोगलांच्या चलनापुढे कदाचित होन टिकले नसतील.

पण काहींच्या नुसार औरंगजेबाने दक्षिणेत आल्यानंतर मिळतील तितके होन वितळवले होते. शिवराई बाबतीत गोष्ट वेगळी आहे. शिवराई स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय ठरली. आजही मोठ्या प्रमाणात ती उपलब्ध होते.

सभासद बखरमध्ये उल्लेख आहे की महाराजांच्या निधनासमयी स्वराज्यात ३१ प्रकारची सोन्याची नाणी होती. त्या सुवर्ण नाण्यांची एकूण संख्या ६९ लाखांच्या घरात होती.

त्यात ४ लाख शिवराई होन होते. अशी ही शिवकाळातली अर्थव्यवस्था व चलन होते. तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती असल्यास आम्हाला नक्की सांगा. सोबत हा लेख कसा वाटला हे सागायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button