इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

असं घडलं सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यूस्टार!

१९८४ मधल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या अनुयायांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश भारतीय लष्कराला दिला.

ही मोहिम ऑपरेशन ब्लूस्टार म्हणून ओळखली जाते. ३ जून ते ६ जून १९८४ दरम्यान ही मोहीम अखंडपणे चालली. ६ जूनला ही मोहीम थांबली तेव्हा भारतातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाणार आहे याची नांदी झाली होती. आज त्या घटनेला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया या कारवाईत नेमकं काय काय घडलं ते.

भिंद्रनवालेंची पार्श्वभूमी

फुटीरतावाद्यांना जसा काश्मीर वेगळा हवा आहे अगदी तसंच शिखांचं ‘खलिस्तान’ हे वेगळं राष्ट्र निर्माण करण्यासाठीच्या चळवळीला ‘खलिस्तानवादी चळवळ’ म्हणून ओळखले जाते. खलिस्तानवादी चळवळीची बीजं जरी ४० च्या दशकात रूजली असली तरी तिला तळागाळात पोहोचायला १९८० साल उजाडलं.

भिंद्रनवाले हे दमदमी टकसालचे नेते होते. त्यावेळी खलिस्तानच्या मागणीला नव्याने वाचा फोडणारे म्हणून भिंद्रनवाले यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शीख तरुणांवर प्रभाव पडला होता. खलिस्तानची मागणी जोर धरू लागली होती.

या मागणीमागे अनेक कारणे होती. यात चंदीगडचा समावेश पंजाबमध्ये करावा, पंजाब मधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी हरयाणा आणि राजस्थानला मिळू नये, अशा मागण्या होत्या. यासोबत पंजाबात झालेल्या राजकीय घडामोडी आणि त्यातून फुटीरतावाद्यांना मिळणार पाठींबा यामुळे खलिस्तानची मागणी वाढू लागली होती.

डिसेंबर १९८३ मध्ये भिंद्रनवाले आणि त्याने खलिस्तानवादी साथींनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात असलेल्या अकाल तख्त संकुलाचा ताबा घेतला. इथूनच सूत्रे हलवून त्यांनी अनेकांच्या हत्या घडवून आणल्या.

त्यांचा बिमोड करण्यासाठी आणि त्यांच्या तावडीतून सुवर्णमंदिर किंवा हरमंदिर साहिब परिसर मुक्त करण्यासाठी सैन्याला सुवर्ण मंदिरात घुसून कारवाई करण्याचे आदेश देण्यापलीकडे तात्कालीन पंतप्रधन इंदिरा गांधी यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. या मोहिमेला ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ हे नाव दिलं आणि कारवाई सुरु झाली.

ऑपरेशन ब्लूस्टारची प्रत्यक्ष कारवाई

हे ऑपरेशन १ ते ८ जूनच्या दरम्यान चालवले जाणार होते असे सांगितले जाते. पण, मुख्य हल्ला ३ ते ६ जून दरम्यान झाला ज्यात सुरुवातीच्या हल्ल्यात लष्कराचे अनेक जवान शहीद झाले. सैन्याला कळले की,

भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांकडे अँटी-टँक गन, रॉकेट लॉन्चर, स्नायपर गन यांसारखी आधुनिक शस्त्रे आणि सर्वात जास्त प्रशिक्षित लोक होते. या लोकांना जनरल शाबेग सिंग या भिंद्रनवालेच्या सहकाऱ्याने प्रशिक्षण दिले होते. हा शाबेग भारतीय सैन्यात मेजर जनरल होता. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान मुक्ती वाहिनीच्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणात त्याचा सहभाग होता.

विरोधकांची ताकद लक्षात आल्यानंतर ६ जून रोजी लष्कराने अकाल तख्तवर रणगाड्याने हल्ला केला. रणगाडे थेट सुवर्ण मंदिरात घुसले.

यावेळी हल्ल्यात भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचे समर्थक एक तर मारले गेले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले. लष्कराच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात सुमारे ८३ जवान शहीद झाले आणि २५० जखमी झाले, तर भिंद्रनवालेसह त्यांच्या समर्थकांचा मृतांचा आकडा ५०० च्या आसपास पोहोचला.

हल्ल्यानंतर सुवर्ण मंदिराची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना पाहून त्यांची तयारी प्रदीर्घ लढाईची होती याचा अंदाज बांधता येतो.

ऑपरेशन ब्ल्यूस्टार नंतरचे पडसाद

या कारवाई दरम्यान मीडियाला पंजाबमध्ये प्रवेश करण्यापासून पूर्णपणे रोखण्यात आले होते. यापूर्वी पंजाबमध्ये पोहोचलेल्या मीडिया कर्मचाऱ्यांना बसमध्ये बसवून हरियाणा सीमेवर उतरवण्यात आले.

पंजाबमध्ये कर्फ्यूची परिस्थिती असल्याने त्यांना प्रवासासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. यामागील आणखी एक कारण असे मानले जात होते की, सुवर्ण मंदिरावर कब्जा करणाऱ्या कट्टरतावाद्यांपर्यंत सरकारच्या कारवाईची माहिती पोहोचली नाही.

या घटनेमुळे शीखांमध्ये इंदिराजींबद्दल द्वेषाची भावना निर्माण झाली होती आणि या कारवाईचा परिणाम असा झाला की इंदिरा गांधींना ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून ठार मारले.

तसेच याच घटनेमुळे १९८५ मध्ये मॉन्ट्रियलहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे कनिष्क विमान उडवण्यात आले होते. यामध्ये एकूण ३२९ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश हिंदू प्रवासी होते. यानंतर १९८४ मध्ये राजीव-लोंगोवाल यांच्यात पंजाब भारतातच राहील याबद्दल करार झाला.

लोंगोवाल यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती म्हणून त्यांचीही १९८५ मध्ये हत्या झाली. १९८६ मध्ये ऑपरेशन ब्लूस्टारच्या वेळचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही हत्या झाली आणि जनरल ब्रार यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आणि ती आजही कायम आहे.

राजकारण, धर्म, अस्मिता, फुटीरता आणि संघर्ष असे विविध पैलू असलेली ऑपरेशन ब्लूस्टारची ही थरारक कथा आहे जी येणारी अनेक वर्षे स्मरणात राहील. पण ही फार मोठी शिकवण सुद्धा आहे. सशस्त्र संघर्ष हे कोणत्याही आंदोलनाला यशस्वी करीत नाही.

आपल्या विरोधात जे जे गेले त्या त्या लोकांना फुटीरतावाद्यांनी संपवलं पण या सगळ्याची अखेर कोणा एका व्यक्ती किंवा संघटनेच्या हितासाठी नाही तर समस्त देशाला एकसंध ठेवणाऱ्या विचारानेच झाली. तुम्हाला या ऑपरेशन ब्लूस्टार विषयी काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button