इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

कवयित्री शांता शेळकेंच्या आनंददायी कविता…

महाराष्ट्राच्या मातीतून प्रतिभाशाली कवी – कवयित्रींच्या कविता फुलल्या. या कवितांनी मराठी रसिकजन मंत्रमुग्ध होऊन गेले. पण एकाच वेळी कविता,

ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी-लेखन, मराठी भाषांतर अशा अनेक साहित्य प्रकारांत सहज संचार करून आणि ओघवत्या शैलीत आशय मांडून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके या अलग भासतात.

६ जून हा त्यांचा स्मृतीदिन. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या काही कवितांचा आस्वाद घेता यावा म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.

शांताबाईंच्या कविता या विविधतेनं नटल्या आहेत. निराळ्या स्वरूपाच्या वेगळ्या धाटणीच्या या कविता आहेत.

ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रुजवा
युग विरही हृदयावर
सरसरतो मधू शिरवा….

हिरवाईने नटलेली सृष्टी, चहूबाजूला जणू पाचूच उगवून आल्याने ही हिरवाई येते. पृथ्वीवर पावसाचा मोहक शिडकावा झाला म्हणून ती सर्वत्र बहरून जाते…

कारण ती पाण्यासाठी झुरते…. निसर्गाचं इतकं समर्पक वर्णन करणं.. हे शांताबाईच करू जाणे! या रम्य निसर्गाच्या वर्णनानंतर हे बालगीत पहा….

कुणी पाडती चिंचा बोरे,
“एक आकडा मलाही दे रे”
झाडाखाली कुणी बापडा लावील लाडीगोडी…?
मारू बेडूक उडी गड्यांनो, घालूया लंगडी….
लपाछपी खेळता देऊ या झाडामागे दडी

या ओळी आपल्याला लहान मुलाचं भावविश्व दाखवतात. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीही इतक्या चपखलपणे या गीतातून शांताबाईंनी मांडल्या आहेत. यापुढे बाल्यावस्था संपवून तरुणपणात आल्यावर तारुण्यसुलभ प्रेम भावना सांगणारं हे गीतच पहा.

चांदनं रुपाचं आलंय भरा
मुखडा तुझा गं अति साजरा
माझ्या शिवारी ये तू जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले गं,
तुझी वाट पाहुनी, गं… ये ये ये ये ये…
गुलाबी गालांत हसत ये ना
सखे गं साजणी! ये ना!
मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे गं साजणी ये ना!

प्रेयसीला साद घालणाऱ्या प्रियकराच्या मनाची घालमेल या शब्दांमध्ये दिसते. तिला भेटण्याची तीव्र इच्छा धरून तो तिला बोलवत आहे, त्याची आर्तताही आपल्याला जाणवते.

हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी
तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते….

प्रेमाच्या एक पाऊल पुढे जाऊन जेव्हा एखादी स्त्री सुखी संसाराची स्वप्नं रंगवताना काय विचार करते? तिच्या आपल्या साथीदाराकडून काय अपेक्षा असतात? हे साध्या सोप्या शब्दांत किती सुंदरतेनं मांडलं आहे! आता याच मुलीचं जेव्हा लग्न होतं आणि पाठवणीची वेळ येते तेव्हा वधुपिता काय म्हणतो?

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी या गोड आठवाने
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने

त्या पित्याच्या डोळ्यासमोर झरझर आपल्या लाडकीचं आजवरचं आयुष्य शब्दगणिक येतं जातं. एका डोळ्यांत आनंद; दुसऱ्यात अश्रू ही संमिश्र भावना ही यात पहायला मिळते.

हीच स्त्री लग्न करून संसारात रममाण होते आणि एके दिवशी तिला तिचं कपाट आवरताना एक जपून ठेवलेली आठवण सापडते…

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती….

संसार सुरळीत चालला आहे आणि असाच चालत रहावा व अजून सुखी व्हावा म्हणून देवापुढे हात जोडले जातात आणि त्याचं स्तवन केलं जातं.

जन्मजन्मांचा हा योगी,
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे….

उमापती मंगेशाचं स्वरूप डोळ्यांसमोर साक्षात उभं करणारं हे भक्तीगीत आहे.

भक्तीरसात न्हाऊन निघाल्यानंतर पाळी आहे वीररसाची….

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती !
देव, देस अन्‌ धर्मापायी प्रान घेतलं हाती !
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?

देवाला हात जोडले, आशिर्वाद घेतला पण देव, देश आणि धर्माचं रक्षण ही जबाबदारी पार पाडणं, त्यासाठी प्राणार्पण करणं हे पोटातूनच शिकून आला आहे तोच खरा शूरवीर..

भावगीत, भक्तीगीत, कविता, चित्रपटगीतं हे विविध प्रकार आणि आपल्या काव्यातून शब्दचित्र उभं करण्याची प्रतिभा… खरंच देवी सरस्वतीचा वरदहस्त शांताबाईंना लाभला होता. म्हणून त्यांनी तिचीच स्तुती ‘जय शारदे’ या गीतातून केली.

शांताबाईंना जाऊन आज दोन दशकं उलटून गेली. उद्या शतकं उलटल्यानंतर ही तरी त्यांनी स्वतःबद्दल, स्वतःच्या गीतांबद्दलही त्यांची समर्पक रचना आहे.

असेन मी, नसेन मी​ तरी असेल गीत हे​
फुलांफुलांत येथल्या​ उद्या हसेल गीत हे…

वाग्विलासिनी शांताबाई शेळके यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन!.!.!

तुम्हालाही आवडणाऱ्या शांता शेळकेंच्या कविता कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button