इतिहासजरा हटकेताज्या बातम्या

भक्तीचा खरा अर्थ सांगणारे संत चोखोबा…

भाव शिरोमणी संत चोखामेळा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे संत आहेत. जातीने महार म्हणून त्यांना उच्चवर्णीय लोकांनी खूप त्रास दिल्याचे आपण जाणतोच. पण एका शब्दानेही विठ्ठलाला त्यांनी बोल लावले नाही.

सर्व महार जातीतील लोकांनी गावाबाहेर राहावे म्हणून एक भिंत बांधण्यात आली होती, त्याच भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते. स्वतः नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी पंढरपूरात आणल्या व जिथे चोखोबा उभे राहायचे तिथे समाधी बांधली.

त्यांच्या भोळ्या भक्तीचे फळ हेच की, आजही पांडुरंगाचे दर्शन घेण्याआधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते. आज चोखोबांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने त्यांच्या एका अभंगातून अध्यात्माचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

ह्या अभंगातून चोखोबा सांगतात की, मला काहीही ज्ञान वगैरे कळत नाही. माझ्याकडे केवळ भोळा भाव आहे त्यानेच माझा भगवंत प्रसन्न होतो. ते म्हणतात “आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण। वेदाचें वचन नकळे आम्हां।।” चोखोबांना त्यांच्या जातीमुळे उच्चवर्णीय लोकांनी ज्ञानापासून वंचित ठेवले.

त्यांचे मन ह्या गोष्टींमुळे पिळवटून निघाले असेल. कारण चोखोबा म्हणतात, “उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन।।” असे शब्द ऐकून आपल्यालाच वाटते की, त्या काळात जाऊन चोखोबांचा हात हातात घ्यावा आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीला लावावा.

जी काय शिक्षा व्हायची, ती थोडी आपण सहन करू. पण चोखोबांचाच अधिकार इतका मोठा आहे की त्यांनी आपला हात धरून अध्यात्म समजावले आहे.

चंद्रभागा नदीकडे आपल्याला घेऊन जावे नि सांगावे “चोखा म्हणे मज नवल वाटावे। विठ्ठलपरते आहे कोण।।”

अर्थात चोखोबा सांगतात की, देव मंदिरातच आहे असे नाही, तो तर ह्या चंद्रभागेच्या वाळवंटात आणि जगाच्या कणाकणात आहे. असं काय आहे, जे विठ्ठल नाहीये? इतके ज्ञान असून देखील चोखोबा म्हणतात की, आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी कळत नाही.

पुराणातील कथा मर्म आम्हाला कळत नाही. आणि इतकेच नाही तर वेदांमधील जी वचने आहेत ती देखील आम्हाला कळत नाही. आता चोखोबा असे म्हणत असले तरी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की, जे ज्ञान वेदांना कळणार नाही ते वारकरी संतांकडे होते.

जरी वाचनाचा अधिकार चोखोबांना नव्हता तरी देखील नामदेवांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले होते. नामदेवांनी त्यांना अध्यात्माचे मर्म सांगितले म्हणूनच चोखोबांना वेदांचे ज्ञान ठाऊक नसल्याची खंत वाटत नाही. चोखोबा पुढे म्हणतात,

“आगमाची आढी निगमाचा भेद। शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां।।”

आगम हे अध्यात्मातील एक तत्वज्ञान आहे. ते शैव परंपरेत असते. तसेच निगम म्हणजे वेदप्रमाण मानणारे वैष्णव होय. इथे चोखोबा म्हणतात की, आम्हाला ह्या शिव परंपरेतील आगमाची आढी व विष्णू परंपरेतील निगमाचा हा भेद माहिती नाहीये.

पुढे ते म्हणतात, शास्त्रांचा संवाद देखील आम्हाला कळत नाही. सुरुवातीला वेदांचे वचन व नंतर शास्त्रांचा संवाद असे चोखोबांनी म्हटले आहे, ह्याचे कारण असे की, वेदांमध्ये नियम किंवा सूत्र असतात ज्याला आपण वचन म्हणतो तसेच शास्त्रांमध्ये ऋषीमुनींचे संवाद आहेत. ते एक ज्ञानाचे मंथन आहे पण हे देखील आम्हाला कळत नाही असे चोखोबा म्हणतात.

अभंगाच्या तिसऱ्या चरणात चोखोबा म्हणतात, “योग याग तप अष्टांग साधन। नकळेची दान व्रत तप।।” अर्थात आम्हाला योग विद्या माहिती नाहीये, आम्हाला यागयज्ञ कळत नाही, तप करणे आम्हाला जमत नाही तसेच मोक्षप्राप्तीसाठी लागणारी आठ प्रकारची योगसाधने देखील आम्हाला ठाऊक नाहीयेत.

दान देणे वा व्रत उपवास करणे देखील आम्हाला कळत नाही. आता काहीच कळत नाही ,असे चोखोबा म्हणतात खरे पण त्यांना जे येते ते कदाचित कोणालाच येत नसावे. पंडितांना देखील माहिती नसेल इतकी माहिती वरील तीन चरणांमध्ये देत चोखोबा स्वतःला अज्ञानी का म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे. ह्याचे उत्तर शेवटच्या चरणात देताना ते म्हणतात,

“चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझें।।” ह्यात चोखोबांच्या अभंगाचा मर्म समजतो. आम्हाला हे ज्ञान कळत नाही आणि कळण्याची गरज देखील नाहीये. एक भोळा भाव असला की, देव आपलाच होतो. देव भावाचा भुकेला असतो.

अर्थात देवाला केवळ भाव समजतो. जाती-धर्म तर मानवाने निर्माण केले. चोखोबांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणतात, “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा।।” म्हणजे तुमच्या लेखी माझी जात आणि मी हीन असेन पण माझा भाव शुद्ध आहे हेच चोखोबा सांगतात.

अर्थात ही केवळ स्वतःची भावना नसून चोखोबा आपल्याला अध्यात्माचे सार सांगतात. ‘इतके ज्ञान मिळवत बसू नका. कारण केवळ एक शुद्ध भाव तुम्हाला देवस्वरूप बनवेल’, असे म्हणत चोखोबा आपल्या सारख्या अज्ञानी लोकांसमोर ज्ञानाची कवाडे खुली करतात.

Vikram Sambyal

[email protected]   Vikram Sambyal has pursued Bachelors of Technology and Mass Communication. He has 4 years of experience in active editor. From a editor at huff post to seniorColuminst at Batmi, the journey wasn't so smooth. He loves animals so much. In his free time, he loves to sing and watch Netflix.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button