इतिहासताज्या बातम्या

शाहीर अमर शेख ह्यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा…

शाहीर अमर शेख म्हणजे मराठमोळ्या डफावरची मराठमोळी थाप. तुणतुण्याचा ताण नि पहाडी आवाज. धर्म माणसासाठी असतो माणसं धर्मासाठी नसतात हे तत्व पाळून त्यांनी हाडाचा मराठी बाणा सांभाळला.

‘सुटला वादळी वारा’ सारखे गीत लिहिणारे नि संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर डफावर थाप मारत पोवाडे गाणारे शाहीर अमर शेख अत्यंत वंदनीय आहेत.

शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कविता व पोवाडे अमर शेख ह्यांनीच सादर केले होते. आजच्या लेखात अमर शेख ह्यांनी शिवरायांवर लिहिलेला पोवाडा आपण पाहणार आहोत. तसा हा पोवाडा मोठा आहे पण नेमके त्यांना काय म्हणायचे होते, त्यांनी केलेले वर्णन कसे आहे सारे पाहुयात.

शाहीर अमर शेख ह्यांनी महाराजांच्या आयुष्यावर पोवाडा लिहिला असला तरी इंग्रजांवर महाराजांनी केलेली स्वारी ह्यात अधिकच तीव्रतेने मांडली आहे.
आपल्या तरुणांना इंग्रज कसे होते हे ओळखता यावे असाच काही हेतू त्यांचा असावा. शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वर्णन त्यांनी अत्यंत सुंदरपणे केलेले आहे. अमर शेख म्हणतात,
“एके रात्री सह्यगिरी हसला। हसताना दिसला।
आनंद त्याला कसला। झाला उमगेला मानवाला।।”

हे वर्णन शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वातावरण स्पष्ट करते. सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा प्रकाश कसा आला अशी कल्पना करत शाहीर म्हणतात, हे मानवाला उमगलेच नाही. ते केवळ सह्याद्रीला माहिती होते म्हणून तो आनंदाने हसत होता.

चिमण्यांचा थवा कसा गात उठला असे म्हणत सकाळचे वातावरण अमर शेख निर्माण करतात आणि त्याचे उत्तर देताना म्हणतात की, तो प्रकाश सूर्याचा नव्हता, तो सूर्य नव्हताच मुळी ते तर शिवराय होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

“सूर्य नव्हता शिवबा जन्मले। विश्व आनंदले।
गाऊ लागले। चराचर होऊन शिवबाचे भाट।
आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट। काढली शाहिरांनं त्यातूनच वाट।
अमर शाहीर शिवबाचा भाट। पोवाड्याच्या थाट।
ध्यानी तुम्ही घ्याहो। अहो राजे हो जि रं राजे रं जी जी।।”
स्वतःला शिवरायांचा भाट म्हणवून घेताना अमर शेख ह्यांना किती अभिमान वाटत असेल हे ह्यातून दिसते. पुढच्या चौकात शाहीर अमर शेख म्हणतात की, इंग्रज हे थपेबाज आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. शिवरायांना डाकू म्हटलं आहे.
“इतिहासकार इंग्रजी। मुलुखाचे पाजी।
केली थपेबाजी। त्यांनी शिवबाला डाकू म्हटलं।।” 

असे म्हणत हे इंग्रज शिवरायांना का डाकू म्हणतात त्याचे ही कारण अमर शेख पुढे सांगतात. ते म्हणतात, इंग्रजांनी शिवकाळात सुरतला पहिली वखार घातली होती.

तिथून त्यांनी दिल्लीवर नजर रोखली होती आणि ही हालचाल महाराजांच्या ध्यानी आली म्हणूनच राजांनी इंग्रजांना झोडपायचे ठरवले होते. अमर शेख म्हणतात,

“धावती तराजुच्या बसुन काट्यावर। तिचं नव्हतं काही भागणार।
राज्य ती होती हाकणार। अवघ्या भारतावर।।
शिवबा हे द्रष्टे होते थोर। हेरलं त्यांनी सारं।
इंग्रज हे चोर। जळवा ह्या माझ्या वंशवेलिला।
मराठ्यांच्या शूर भावी पिढीला।। नाही तुडवायचं गुजराथ्याला।
तुडवायचं फक्त इंग्रजाला। तसंच मोगली सरदारांना।।” 

हे शब्द लिहून जणू अमर शेख शिवरायांचे मनोदय स्पष्ट करतात. गुजराती लोकांना हात न लावता इंग्रज व मोगलांना झोडपा हा आदेश सांगतो की महाराजांनी सुरत लुटली पण गुजराती बांधवांना नाही लुटले.

अमर शेख ह्यांनी आपल्या शब्दांमधून त्याच काळात हे गैर समज दूर केले होते. इंग्रजांना असे झोडपल्यामुळेच त्यांनी आपला इतिहास चुकीचा सांगितला हे ह्यातून स्पष्ट होते. शाहीर अमर शेख नंतर शिवरायांच्या पूर्वजांचे वर्णन करतात आणि शहाजी राजांचे वर्णन करताना ते म्हणतात,

“पेरावं तेच पीक येतं। जगाची रीत। नवं न्हाई त्यात।
शहाजीनं पराक्रम पेरला। शिवाजी सरजा अवतरला।।”

ह्यातून शिवरायांना स्वराज्य मंत्र देणारे शहाजी महाराज आहेत हेच अमर शेख सांगताय. शिवपूर्व काळातल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना शाहीर म्हणतात की, जणू आई आणि मूल आडरानी अडकले आहे. त्यात जोराचा पाऊस व्हावा, वादळ सुटल्यामुळे जीव भयभीत व्हावा, तोच विजांचा कडकडाट व्हावा.

कुठून तरी वाघाच्या डरकाळीचा आवाज यावा आणि जीव फाटावा, वरून दगडांप्रमाणे गारांचा वर्षाव व्हावा, आश्रयासाठी एक गुहा दिसावी पण आत शिरताच डोंगर कोसळून खाली पडावा अशी काही अवस्था महाराष्ट्राची झाली होती. जी केवळ शिवरायांमुळे दूर झाली आणि महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला.

शाहीर अमर शेख शिवरायांच्या मातापित्यांचे वर्णन करताना म्हणतात, जिजाऊंचे व शिवरायांचे कार्य गाताना ते म्हणतात,

“आला आला शिवाजी आला। अरुणोदय झाला।
लाल जनतेला। जिजाऊनं दिला योग्य वेळेला।
मराठ्यांनो करा रे जयजयकार। थोर त्या आईचे उपकार।
नाही रे नाही तुमच्यानं नाही फिटणारं जी जी जी जी….!”

महाराष्ट्राच्या इतिहासात शाहिरांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी जसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डफावरच्या थापेने ती आग पेरली तशीच शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा जनमनात रुजवली.

शाहिरांच्या या कार्यामुळेच महाराजांचा लढा आजही कोणत्याही लढ्याला बळ देत असतो. शाहीर अमर शेखांना, त्यांच्या कलेला आणि अस्मिता, अभिमान जागृत करणाऱ्या त्यांच्या काव्याला आणि मनाचा मुजरा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button