इतिहासताज्या बातम्या

असे होते पुरोगामी विचारांचे राजे सयाजीराव गायकवाड!

समाज सुधारकांमध्ये कोणत्या राजा महाराजांचे नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड. सयाजीरावांचे राज्य तसे बडोद्याचे असल्यामुळे कायम मराठी माणसाने ह्यांच्या इतिहासाकडे व कार्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आजच्या लेखामधून त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सयाजीराव तसे कुठे जन्माला आले. त्यांना महाराज कोणी बनवले? त्यांनी काय कार्य केले हे आजच्या लेखातून जाणून घेऊ.

बडोद्याला गायकवाड घराण्याचे राज्य होते. खंडेराव गायकवाड तिथले महाराज होते. त्यांची पहिली पत्नी लवकर निधन पावली. पुढे त्यांच्या दुसरी पत्नी महाराणी जमनाबाई ह्यांना मुलं झाली पण अल्पकाळातच ती दगावली.

त्या वेळेस जमनाबाई ह्यांनी आपल्या गायकवाड घराण्यातील इतर शाखांमधील लोकांना बोलावले. सोपे करून सांगायचे तर एका घराण्याच्या अनेक शाखा असतात. पुढे त्या इतक्या विभागल्या जातात की त्या आडनावाचे गाव निर्माण होते. कधी कधी एकाच आडनावाची व एकाच घरण्यातले लोक आपल्याला दिसतात त्याच ह्या शाखा असतात. तेव्हा महाराणी जमनाबाई ह्यांनी गायकवाड शाखेचा शोध घेतला.

नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यात तेव्हा कौळाणे भागात काशीराव गायकवाड ह्यांना ११ मार्च १८६३ रोजी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी गोपाळ असे ठेवले होते. काही वर्षांनी जमनाबाई ह्यांनी काशीरावांना व त्यांच्या मुलांना बोलावून घेतले.

काशीराव आपल्या आनंदराव, संपतराव आणि गोपाळराव ह्या तिन्ही मुलांसोबत कौळाणे वरून बडोद्याला पायी गेल्याचे जाणकार सांगतात. तिथे गेल्यानंतर जमनाबाईंनी तिन्ही मुलांची परीक्षा घेतली. आनंदराव, संपतराव आणि गोपाळराव रांगेत उभे होते. त्यांना जमनाबाई यांनी प्रश्न विचारला,

“तुम्ही इथे का आलात?” तेव्हा आनंदराव व संपतराव ह्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘घरच्यांचे ऐकून आम्ही इथे आलो आहोत.’ मात्र गोपाळरावांनी उत्तर दिले ते महाराणी साहेबांना अगदी आवडले. गोपाळराव म्हणाले, “मी इथे राजा होण्यासाठी आलो आहे.” हे ऐकताच जमनाबाई ह्यांनी गोपाळरावांना दत्तक घेतले आणि २७ मे १८७५ ला त्यांचे सयाजीराव असे नामकरण केले.

सयाजीरावांनी सारे प्रशिक्षण घेतले व ते गादीवर बसले. ते पुरोगामी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचे किती गुण गावेत. त्यांच्या हातून घडलेल्या कार्यामुळे भारताला एक नवीन संदेश मिळाला होता. त्यांनी सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

ह्यासाठी अत्यंत कडक कायदे बनवले व त्याची अमंलबजावणी देखील करण्यात आली. शिक्षण घेतल्यानेच माणसाचे भले होते हे त्यांना ठाऊक होते. यामुळेच हा शिक्षणाचा घाट त्यांनी घातला होता. त्यांच्या बडोद्याच्या राज्यात त्यांनी बरेच आर्थिक सुधार केले.

आज जी आपण बँक ऑफ बडोदा बघतो ती सयाजीरावांनीच २० जुलै १९०८ साली सुरू केली होती. अशा काही सुधारणांसोबत त्यांनी प्रशासकीय कामांची देखील विभागणी केली. लोक नेमले आणि उत्तम प्रशासन निर्माण केले. राज्याला व राज्यातील रयतेला आधार असतो तो न्यायाचा. म्हणूनच सयाजीरावांनी न्यायव्यवस्था सक्षम केली. ग्रामपंचायत त्यांनी पुनर्जीवित केली.

ज्यांना औद्योगिक क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असेल त्यांच्यासाठी महाराजांनी ‘कलाभुवन’ निर्माण केले. ज्यांना संस्कृत ग्रंथांमध्ये रस आहे त्यांच्यासाठी ‘प्राच्य विद्यामंदिर’ निर्माण केले. ह्यासोबतच राज्यात साक्षरता वाढावी म्हणून शाळा चालू केल्या आणि वाचन वाढावे म्हणून अनेक वाचनालये महाराजांनी चालू केली.

उन्नतीसाठी आधी समाजात सुधार व्हावा लागतो. म्हणूनच पुरोगामी विचारांच्या सयाजीरावांनी चुकीच्या गोष्टींचे खंडन केले आणि एक आदर्श समाज बनवण्याचे कार्य केले. त्यांनी बालविवाहाला विरोध केला. कन्या विक्री खरेदीवर बंदी आणली.

विधवांच्या पुनर्विवाहासाठी कार्य केले सोबतच अस्पृश्यता निवारण केले. जातिभेद संपवला. हरिजनांसाठी विशेष अशा १८ शाळा उभ्या केल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली होती व नंतर उत्तम पदावर नोकरी दिली होती. सयाजीरावांचे विचार खूप प्रगत होते. घटस्फोटाचा कायदा त्यांच्या राज्यात आधी अमलात आणला गेला.

बडोदा शहर चांगले ठिकाण बनवण्यात देखील सायजीरावांचा हात आहे. त्यांनी अनेक वस्तूसंग्रहालयांची स्थापना केली. लक्ष्मी विलास पॅलेस, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाज राजवाडा इत्यादी वास्तू त्यांनी उभारल्या. लाल झेंड्यावर मुकुट आणि तलवार असा बडोद्याचा ध्वज होता.

ह्या ध्वजाखाली सयाजीरावांनी सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित केले होते. सयाजीरावांचे मुंबई इथे ६ फेब्रुवारी १९३९ ला निधन झाले. आज देखील सयाजीरावांच्या विचारांची आणि कृतींची भारताला गरज आहे. अशा कल्याणकारी राजाला वंदन!

Harsh Desai

I am Editor of Batmi.net. I am Capable to run Online Business and Now working on Batmi.net as Author. Email :[email protected]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button