ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

पावसाळ्यात ‘असे’ जपा आपले आरोग्य…

पावसाळा आता जवळ आला आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची काळजी घेणं फार आवश्यक आहे. सतत बरसणारा पाऊस हा अनेक आजारांना आमंत्रण देतो.

पावसाळ्यात थोडं जरी निष्काळजीपणाने वागलं तरी आपल्याला आणि मुलांना आजारपण येऊ शकतं. म्हणून लहान मुलांचे व स्वतःचे आरोग्य चांगले रहावं यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

सतत स्वच्छता राखा:
पावसाळ्यात पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे चिखल किंवा घाण झालेली असते. अशा परिस्थितीत घरात त्याच पायांनी येतो, म्हणून घरात सतत स्वच्छता राखायला हवी. बहुतांश वेळा आपण आणि घरातील बाकी सदस्य फरशीवर बसतात त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच घरातील फरशी वरचेवर पुसली जाणं आवश्यक आहे. वेळोवेळी, फरशीला डेटॉल सारख्या निर्जंतुक करणाऱ्या रसायनाने धुवायला हवं. जेणेकरून फरशीवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरणार नाही.

पावसात भिजलात तर लगेच कोरडे व्हा:
पावसामुळे वातावरण खूपच गार होऊन जातं. तसेच हवेत अपेक्षित सूर्यप्रकाश नसतो म्हणून जीवाणू-विषाणू यांचा नायनाट न होता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ऋतुबदल झाल्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती थोडी कमी होते.

म्हणूनच पावसाळ्यात वरचेवर ताप, सर्दी, खोकला, होत राहतो. यासाठी पावसाच्या पाण्यात शक्यतो भिजू नये. जर पावसात भिजलो तर गरम पाणी हात-पायांवर ओतावं आणि हात पाय धुवून घ्यावेत.

अंग व केस लगेच कोरडे करून घ्यावेत कारण जर केसात पाणी राहत असेल बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. तसेच ओले कपडे घातल्याने रॅश होतात किंवा ओल्या कपड्यामुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो.

पाणी उकळून प्यावं:
पावसाने पाणी दूषित होतं. दूषित पाण्यामुळे संसर्ग होत असतो. आणि पोटाचे विकार होऊ शकतात. जंतूसंसर्गापासून रक्षण व्हावं पाणी उकळून प्यावं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुरटी व ठराविक रसायने मिळतात त्यांचा वापर करावा.

डासांपासून सावध रहा:
पाऊस मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारखे साथीचे आजार आणतो. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. म्हणूनच घरात आणि आजूबाजूच्या परिसरात डासांची संख्या वाढू देऊ नका.

घरात अंगणात कुठेही पाणी साचत असेल तर ते वेळीच काढून टाका. मच्छरदाणी, डासांपासून रक्षण करणारे क्रीम लावून झोपत जा.

घरचंच अन्न खावं:
या ऋतूत थंडावा असल्यामुळे बाहेर उघड्यावर असणारे वडा, भजी सारखे चमचमीत पदार्थ खाणं आपल्याला अपायकारक ठरू शकतं. या ऋतूत जीवाणूंना पोषक ओलावा वातावरणात असल्याने साठवलेल्या अन्नावर जीवजंतू लवकर वाढतात, त्यामुळे साठवलेलं अन्न खाऊ नये.

तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसमी फळे खावीत. आरोग्य राखण्यासाठी आपल्या घरातलं अन्न तसेच डाळिंब, जांभूळ, पीच, प्लम(अलुबुखार), नासपाती (पेअर) अशी फळे खावीत. पावसाळ्यात हे उपाय करा आणि मनसोक्त व निरोगी राहून पावसाळा सर्वांनी एन्जॉय करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button