इतिहासताज्या बातम्या

ही होती मराठ्यांची ऐतिहासिक ‘दहा’ शस्त्रे…

जगात सर्वत्र शांतता नांदावी, कुठेही रक्तपात होऊ नये हेच धर्मात शिकवले जाते. मात्र अधिक सत्तेच्या लालसेने शांतता भंग करणाऱ्यांना शस्त्रांनी शासन करायचे असते हे देखील धर्मच सांगतो. राजाचा विजय हा एकूण त्याच्या सैन्यावर, शस्त्रांवर व आत्मबलावर अवलंबून असतो.

शिवरायांनी इतक्या लढाया केल्या आणि मावळ्यांनी देखील जंगलात, खिंडीत, गडकोटांवर लढाया केल्याचे आपण जाणतोच. त्या लढायांमध्ये विविध प्रकारची शस्त्रं वापरली गेली.

मराठ्यांकडे कोणती अशी विशेष दहा शस्त्रं होती हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात मराठ्यांची ऐतिहासिक शस्त्रं.

१) धोप व ढाल :

धोप हे शस्त्र मराठ्यांचे अत्यंत प्रिय शस्त्र आहे. तलवारीचे आडवे पाते सरळ केले की त्यास धोप म्हणतात. आता ह्या धोपमध्ये अनेक प्रकार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र असे प्रदेशाप्रमाणे हे बदल जाणवतात. ह्या धोपला मागच्या बाजूने एक गज असतो. शिवरायांनी जी भवानी तलवार वापरली तिलाच धोप, फिरंगी अशी नावे आहेत. ह्या धोपसोबत ढाल असते आणि हे मराठ्यांचे प्राथमिक शस्त्र होते.

२) गुर्ज :

गुर्ज हे मराठ्यांचे व शिखांचे शस्त्र आहे. भारतात गदा ह्या शस्त्राला महत्व असल्यामुळे ह्या शस्त्राची रचना गदेप्रमाणे आहे. ह्या शास्त्रात तीन शस्त्रांचा समावेश दिसतो. वरचा भाग गदेप्रमाणे आहे, पण गदा गोलाकार असते इथे मात्र कुऱ्हाडीच्या पाकळ्यांनी बनलेली ही गदा असते. ह्याला धरायला खाली तलवारीची मूठ असते. अशी तीन शस्त्रं ह्यात दिसतात.

३) दांडपट्टा :

दांडपट्टा हे शस्त्र देखील अत्यंत प्रचलित असे शस्त्र आहे. बाजी प्रभू देशपांडे ह्यांनी हेच दंडपट्टे वापरत खिंड लढवली होती. जिवा महाले ह्यांच्या हाती देखील दांडपट्टा होता. ज्यामुळे शिवरायांचे प्राण वाचले होते. दांडपट्ट्याला दोन्ही बाजूने धार असते. खाली धरायला एक आडवा गज असतो आणि हात झाकतील असे कवच असते.

४) वाघनखं :

वाघनखं ह्या शस्त्राला आता सारेजण ओळखतात. अत्यंत प्रचलित असणारे हे शस्त्र शिवरायांनी निर्माण केल्याचे इतिहासकार सांगतात. ह्याला अमुक्त शस्त्र म्हणतात. मुक्त म्हणजे हातातून सुटणारे शस्त्र आणि अमुक्त म्हणजे ज्याला हातावेगळे करता येत नाही ते. शिवरायांनी वाघनखाने अफझलखानाचा कोथळा काढल्यापासून संपूर्ण जगाने ह्याची धास्तीच घेतली आहे.

५) कट्यार/ बिचवा :

कट्यार हे मानाचे आणि महत्वाचे शस्त्र होते. राजे महाराजे एकमेकांना हे शस्त्र भेट म्हणून द्यायचे. तितकाच ह्या शस्त्रांचा आपत्कालीन स्थितीत वापर व्हायचा. कमरेला खोचलेली ही कट्यार त्रिकोणी आकाराची असते. मावळ्यांकडे कट्यारीप्रमाणे छोटे छोटे बिछवे पण होते. लांबून एखाद्याला बिछवा मारून फेकला की शत्रू प्राणास मुकलाच म्हणून समजा.

६) माडू :

हे शस्त्र अत्यंत कमी वेळा वापरण्यात आलेले आहे. काळविटाची दोन शिंगं विरुद्ध दिशेने छोट्या ढालीवर बसवली जातात आणि त्यांच्या टोकाला छोट्या आकाराचे भल्याचे टोक लावले जातात. एका हातात तलवार आणि एका हातात माडू घेऊन कधी मावळा लढायला उतरलाच तर रुद्राचे तांडव होणार हे निश्चित.

७) धनुष्य बाण:

हे शस्त्र सर्वांनाच परिचयाचे आहे पण बाणांचे अत्यंत महत्व असल्याने काहींचे आडनाव बांदल पडले. ज्यांच्याकडे धनुष्यबाणाचे पथक होते ते बाण दल अर्थात बांदल. बारीक बांबूच्या काठीला पुढे टोकदार धातू असतो व मागच्या बाजूला पक्षांचे पंख लावलेले असतात. नंतरच्या काळात शंभूराजांनी विशिष्ट प्रकारचे बाण बनवले. विविध आकारांमुळे त्याला महत्व प्राप्त झाले.

८) भाला / निशाणीचा भाला / विटा :

भाला हे शस्त्र अत्यंत वापरात असलेले शस्त्र आहे. चित्रपट मालिकांमध्ये आपण मावळ्यांच्या हातात आपण अनेकदा भाला पाहतोच. पण भाल्यासोबतच निशाणीचा भाला पण असायचा.

ध्वजाला वरच्या बाजूने टोकदार भाला लावला जायचा. जेणे करून ध्वजधारी व्यक्तीला पण लढता येईल. विटा हे शस्त्र भाल्याप्रमाणेच असते फक्त हे एकदा सोडले की पुन्हा माघारी येते. हे शस्त्र शिवा काशीद ह्यांच्या हातात दिसते.

९) गोफण:

गोफण हे शस्त्र नसून केवळ शेतातली पाखरे हकण्यासाठी वापरात असणारे एक तंत्र होते. पण उपलब्ध असणाऱ्या गोष्टींमधून शिवरायांनी शस्त्रनिर्मिती केली. दगड तसे कुठेही मिळतात आणि गोफणीचा मारा असा भयानक असतो. एकदा नेम पकडला की थेट जाऊन शत्रूचे मस्तकच फोडणार. गनिमी काव्यात ह्या शस्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाई.

१०) कुऱ्हाड / कोयता:

कुऱ्हाड झाडे तोडण्यासाठी आणि कोयता शेती कामासाठी लोक वापरायचे. पण स्वराज्य निर्माण झाल्यानंतर मात्र कुऱ्हाड आणि कोयता खूप वापरात आला. रामोशी समाजाकडे हे शस्त्र बघायला मिळते.

अशी ही मराठ्यांची शस्त्रे होती. ह्यांच्याच बळावर स्वराज्य निर्माण झाले आणि कोणत्याच शत्रूने स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहिले नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button