इतिहासजरा हटकेताज्या बातम्या

अशी झाली बाजीराव आणि मल्हाररावांची पहिली भेट…

इतिहासाच्या पानांमधील पराक्रमाचा नि निष्ठेचा गंध असणारा खंडोबाचा भंडारा म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. ज्यांच्या धाकाने “मल्हार आया मल्हार आया” असे म्हणत गनिम दुरूनच पळून जायचा त्या मल्हारराव होळकरांची आज पुण्यतिथी आहे.

२० मे १७६६ ला आलमपूर इथे असताना मोहिमेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंनी त्यांची तिथे समाधी बांधली व आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले. मल्हारराव होळकर एक कर्तबगार सेनानी

होतेच त्यांच्या पराक्रमाचे किस्से आपण ऐकलेच असतात पण पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊ त्यांची आणि बाजीराव पेशव्यांची ओळख कशी झाली? हे दोन्ही योद्धे शत्रुत्वापासून मित्रत्वाकडे कसे वळले? नेमके असे काय झाले होते की मल्हाररावांनी थेट बाजीराव पेशव्यांना मारायची धमकी दिली होती? पाहुयात.

मल्हारराव हे जेजुरी जवळ असणाऱ्या होळ गावात जन्मले. त्यांचे वडील खंडोजी अत्यंत पराक्रमी होते पण मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच खंडोजी युद्धात धारातीर्थी पडले. इतक्या लहान वयात पित्याचे छत्र हरवले होते. अखेर त्यांच्या मातोश्री आपल्या लहानग्या मुलास घेऊन आपल्या माहेरी आल्या.

भोजराज हे मल्हाररावांचे मामा कदम-बांडे सरदारांकडे कामाला होते. ह्याच वातावरणात मल्हारराव मोठे झाले. त्यांनी आपल्या मामाच्या मुलीसोबत विवाह केला व स्वतःच्या कर्तबगारीवर कदम-बांडे सरदारांकडे काम करू लागले. त्यांच्या दिमतीस ५०० ची फौज होती.

मल्हाररावांचा मुळात असणारा चांगला नि भोळा स्वभाव. त्यात ते अडीअडचणीला इतरांच्या मदतीला धावून जायचे तसेच आपल्या सैन्यातील लोकांवर ते भावाप्रमाणे प्रेम करायचे ह्याच त्यांच्या गुणांमुळे लोक त्यांच्या शब्दाखातर शस्त्र उचलायला तयार व्हायचे. असे हे मल्हारराव होळकर आता रणमैदान गाजवू लागले होते.

जेव्हा शाहू महाराज व बाळाजी विश्वनाथ भट ह्यांनी दिल्लीवर स्वारी केली तेव्हा त्यात कदम-बांडे ह्यांचे ५०० सैनिक होते. त्यांचे नेतृत्व स्वतः मल्हारराव करत होते. ह्यात मल्हाररावांचे काही लोक थोडे हट्टी होते. मल्हाररावांचे सोडून ते कुणा दुसऱ्याचे ऐकत नसायचे.

तेव्हाचीच ही घटना आहे. दिल्लीला जात असताना मल्हाररावांच्या दोन-तीन सैनिकांनी आपले घोडे थेट शेतकऱ्यांच्या वावरात नेले. तिथे घोड्यांना चारले. शेताची नासधूस झाली आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ह्या शेतकऱ्याने थेट बाळाजी विश्वनाथ ह्यांना ह्या विषयी तक्रार केली. बाळाजींनी ह्यात स्वतः लक्ष न घालता आपल्या तरुण मुलास म्हणजेच बाजीराव ह्यास घडलेल्या गोष्टीचा निवडा करण्यास सांगितले.

तरुण वायतले बाजीराव पण होळकरांच्या छावणीत घुसले. मल्हाररावांना काहीही न सांगता बाजीरावांनी थेट त्या तीन सैनिकांना बांबूने बडवायला सुरुवात केली. इथे बाजीरावांनी मल्हाररावांना जाब विचारण्याऐवजी स्वतःच सैनिकांना शिक्षा द्यायला सुरूवात केली होती.

ह्याचा मल्हाररावांना चांगलाच राग आला. “मी ज्यांना भावांप्रमाणे वागवतो त्यांना हे पेशव्याचं पोरं बडवतंच कसं?” असं म्हणत मल्हाररावांनी चिखलाचे गोळे बाजीरावांवर फेकले. तिथून बाजीराव निघून गेले खरे पण त्यांच्या मनात देखील राग होता. चिखलाच्या गोळ्यांचे उत्तर त्यांना लढाईने द्यायचे होते.

तरुण वयातील बाजीरावांनी फौज जमवायला सुरुवात केली. हे मल्हाररावांना कळताच त्यांचा राग अधिकच वाढला. इतक्या छोट्या प्रकरणासाठी बाजीराव असे करतायत म्हटल्यावर मल्हारराव काय गप्प बसणार? त्यांनी आपले सारे घोडे सोडून दिले, लष्करी सामान पेटवले,

अंगावरचे कपडे काढून फेकले व राख फासून दूर जाऊन बसले आणि जाहीर केले की आम्ही आता संन्यास घेत आहोत. मल्हाररावांना मराठ्यांमध्येच युद्ध नको होते, म्हणून त्यांनी असे केले. त्यांना पाहून त्यांच्या सैनिकांनीही तेच केले.

आता मात्र कसलीही माहिती नसलेल्या बाळाजी विश्वनाथ ह्यांना ह्याची खबर मिळाली होती. ते मल्हाररावांकडे गेले व त्यांची समजूत काढली, बाजीरावांना देखील काही बोल सुनावले आणि अखेर हे प्रकरण मिटवण्यात आले.

मल्हाररावांना मात्र बाजीरावांचा सूड घ्यायचाच होता. “एवढं एवढं ते पेशव्याचं पोर, त्याची गुर्मी उतरलीच पाहिजे,” असे म्हणत एक दिवस बाजीराव एकटे असताना मल्हाररावांनी गाठले. मल्हाररावांचे काही साथीदार पण आपले भाले सरसावून उभे होते.

घोड्यावर असणाऱ्या मल्हाररावांनी एकट्या असणाऱ्या बाजीरावांच्या छातीवर भाल्याचे टोक ठेवले आणि म्हणाले, “घालू का ह्यो भाला आरपार, त्या दिवशी लैच गुर्मीत व्हतास. आता काय करशील?” बाजीराव घाबरले नाही ते म्हणाले, “काका मला जेवायचे आहे, तुम्ही पण आमच्या सोबत पंगतीस बसावे.” त्या काळात जातीव्यवस्थेमुळे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र पंगतीला बसत नसायची.

पण बाजीरावांनी असे करून मल्हाररावांचे मन बदलले होते. मल्हाररावांना हे काहीच अपेक्षित नव्हते. जेवणाला बसल्यावर बाजीरावांनी मल्हाररावांना सांगितले, “आम्ही तुम्हाला ५००० ची फौज देऊ पण आमच्या पदरी काम करा.” मल्हाररावांनी समतेची वागणूक देण्याची बोली बाजीरावांकडून करून घेतली व अखेर मराठी सत्तेमध्ये मल्हारराव होळकर सामील झाले.

नंतर मल्हारराव ह्यांनी खूप निष्ठेने पेशवे दरबारी अर्थात बाजीरावांकडे काम केले. तसे मल्हारराव कर्तबगार सेनानी होतेच पण त्यांचे बाजीरावांविषयी असणारे शत्रुत्व संपत मित्रत्व कसे सुरू झाले हे ह्यातून समजते. तुम्हाला ही ऐतिहासिक घटना कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button