ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

जगप्रसिद्ध मराठी पदार्थांचा असा झाला जन्म…

अन्न ही माणसाची जगण्यासाठीची प्राथमिक गरज असली तरी ते अन्न खाण्याला सुद्धा माणसाने आनंददायी केलं. यातूनच जन्म झाला खाद्य संस्कृतीचा. जगातील प्रत्येक प्रांतात त्याची ओळख सांगणारी खाद्य संस्कृती जन्मली आणि तिथल्या लोकांनी तिचं जतन केलं.

अशा सर्व पदार्थांच्या उगमाची कहाणी सुद्धा फार रंजक असते. महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ याला अपवाद कसे असतील? नाव उच्चारताच तोंडाला पाणी आणणाऱ्या काही महाराष्ट्रीयन पदार्थांच्या इतिहासाविषयी चला जाणून घेऊया.

आनंद देणारा मोदक

अग्रपूजेचा मान जसा गणपती बाप्पाचा आहे. तशीच इथं सुरुवातही मोदकापासूनच करू. गणपतीला मोदक प्रिय आहेत याच्या सुरस कथा या पुराणात येतातच. पण प्रत्यक्षात इ. स. ७५० ते १२०० च्या दरम्यान नोंद केलेल्या काही पदार्थामध्ये उकडीच्या मोदकांचा संदर्भ सापडतो.

खोबरं न वापरता थोडी वेगळी सामग्री वापरून गोड सारण घालून बनवलेला हा पदार्थ मोदकाच्या अगदी जवळचा आहे. मात्र त्या पदार्थाचे नाव ‘ठडुंबर’ असे नमूद केले गेले आहे. अजून एक मोदकासारखाच पदार्थ ज्याला ‘वर्षील्लक’ असं नाव आहे.

मात्र त्याच्या कृतीत दुध वापरलं असल्याचा उल्लेख आहे. तांदळाचे पीठ वापरून बनवल्या गेलेल्या एका पदार्थाला मोदकच म्हटले आहे. गणेश चतुर्थीला उकडीचे आणि अनंत चतुदर्शी किंवा संकष्टीला तळलेले असं साधारण समीकरण आपल्याकडे आहे. मोद म्हणजे आनंद देणारा मोदक हा विविध नावांनी देशभरात तर प्रसिद्ध आहेच. पण परदेशी लोकांनाही याच्या चवीनं भुलवलं आहे.

झणझणीत मिसळ पाव

मिसळ पाव हा महाराष्ट्रीयन नाश्त्याच्या रेसिपीसाठी उत्तम पर्याय आहे. कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घातलेली मिसळ आणि लुसलुशीत पाव. झणझणीत मसालेदार मिसळ पावाच्या उत्पत्तीबद्दलचे अनेक सिद्धांत आहेत.

काही लोकांचा असा विश्वास आहे की हा पदार्थ गुजरातमधून आला आहे, तर काही लोक असा दावा करतात की ते प्रथम खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात बनवले गेले. कोल्हापूरच्या मिसळ पाव व्हर्जनला तिखट मसालेदार चव आहे.

याशिवाय, तुम्ही पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, खान्देशी मिसळ आणि अहमदनगर मिसळीचे बाकी प्रकार आहेत. २०१५ मध्ये लंडनमधील ‘आस्वाद रेस्टॉरंट’मध्ये फूडीहब अवॉर्ड्समध्ये जगातील सर्वात चविष्ठ शाकाहारी खाद्यपदार्थ असा बहुमान झणझणीत मिसळीला मिळाला आहे.

खुसखुशीत अळूवडी

अळू ही रानभाजी प्रकारातली. ती जंगलात आपसूकच उगवते. नंतर तिचा खाण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. खायला हवा म्हणून अळू घराजवळ लावला जाऊ लागला. पावसाळ्यात अळू भरघोस येतो. अळू मूळचा भारताच्या पूर्वेकडील, नेपाळ आणि बांगलादेशातला असावा. आता अळू जगभर खाल्ला जातो. कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. कोंड्याचाही मांडा करणाऱ्या सुगरण मराठी गृहिणींपैकी एकीने ही जून पानं ही वाया जाऊ नयेत म्हणून बनवल्या असाव्यात सुंदर चमचमीत अशा अळूवड्या. आपल्याकडे पावसाळ्यात श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत, तेव्हा काहीतरी चटपटीत खायला हवं, त्यातूनच या अळूवड्या जन्माला आल्या असाव्यात.

महाराष्ट्रासह तसंच गुजरातमध्येही अळूवड्या लोकप्रिय आहेत. गुज्जूंनी तर अळूवड्या तळून मस्त कुरकुरीत करून ‘पत्रा’ या नावाने अजूनच प्रसिद्ध केल्या आहेत.

मुंबईचा ब्रँड वडा पाव

वडा पाव आबालवृद्धांना आवडणारा हा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा अभिमान आहे. पावाच्या मध्ये पॅटीस सारखा वडा घालून खाल्ला जातो म्हणून याला ‘बॉम्बे बर्गर’असंही म्हणतात. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी हा एक प्रसिद्ध नाश्ता आहे.

अशोक वैद्य नावाच्या एका मुंबईकराने १९६६ मध्ये वडापाव विकण्याचा पहिला स्टॉल उघडला तेव्हा त्यांना वडापाव निर्मितीचं श्रेय दिलं जातं. कमी किंमतीमुळे वडापाव गिरणी कामगारांमध्ये लोकप्रिय होत गेला.

कल्याणमध्ये असलेला ‘खडकी वडा पाव’ हे वडा पाव विकणारं पहिलं छोटेखानी हॉटेल मानलं जातं. हे १९६० च्या उत्तरार्धात दिसले आणि वाझे कुटुंबाचा एक ब्रँड होता. २३ ऑगस्ट हा जागतिक वडा पाव दिवस म्हणून निवडला गेला. आज मुंबईसह पुण्याचीही ओळख म्हणजे वडापाव आहे.

खमंग, चुरचुरीत पोहे

पोहे ही महाभारतापासून चालत आलेली गोष्ट आहे. गरीब सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाने खाल्ले, हे सांगत आपल्यापैकी अनेकांना घरच्यांनी पोह्याचे घास भरवले असतील. पोहे भिजवून त्याला कढीपत्त्याची फोडणी देणं हा मराठी प्रकार जो आसपासच्या प्रदेशांत ही पसरला.

याशिवाय बटाटा पोहे, कांदे पोहे, दूध पोहे, कोकणातले चहा पोहे, दही पोहे, दडपे पोहे, पापड पोहे, नागपूरचे तर्री पोहे असे विविध प्रकारचे पोहे बनवले जातात. होळकर आणि सिंधिया यांच्या राजवटीत त्याचा व्यापक प्रसार झाला.

महाराष्ट्रीयन राज्यकर्त्यांनी पोहे मध्य प्रदेशात आणले आणि या राज्यातल्या इंदूर शहराने ‘इंदूरी पोहे’ हा अजूनच अनोखा प्रकार आणला व तो जगप्रसिद्ध झाला. लग्न ठरवण्यात कांदे पोह्यांचा किती हातभार असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे.

तर असा हा पदार्थांचा इतिहास आपल्याला समजला परंतु, खाताना आपण कुणीच या पदार्थांच्या उत्पत्ती बाबत अजिबात विचार करत नाही. म्हणून त्या उत्सुकतेपोटी हा लेखनप्रपंच…
आपल्या आवडत्या पदार्थांच्या इतिहासाबद्दलचा हा लेख कसा वाटला? तुमचा आवडतं महाराष्ट्रीयन पदार्थ आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहित असेल तर तोही आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button