ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

या ८ गोष्टींपासून स्वतःची सुटका करुन घ्यायलाच हवी; नाहीतर आयुष्यच वाटोळं होत…

नको असलेल्या अनेक गोष्टींचा भार घेऊन आपण सगळेच जगत असतो. मग ते नात्यांबद्दल असो वा वस्तूंबद्दल. त्यात काहीही अर्थ उरला नसेल तरी अशी नाती, वस्तू आपल्याला दूर करता येत नाहीत. असून उपयोग नाही आणि दूरही करता येत नाही असा मानसिक गुंता या सगळ्यामुळे तयार होतो आणि वाढत जातो.

तो टाळण्यासाठी आणि तणावमुक्त जगण्यासाठी अशा गोष्टी आपण वेळीच दूर केल्या पाहिजे. या लेखातून आपण अशाच ८ गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यापासून सुटका का व कशी करायची हेदेखील पाहणार आहोत.

१. एकतर्फी संबंध

काही नाती अशी असतात जी आपल्याला हवीच असतात. मग तिथून तो जिव्हाळा, प्रेम मिळत नसेल तरी आपण ते नातं टिकवण्यासाठी कष्ट घेत राहतो. पण हे किती दिवस करायचं, हे मात्र आपल्याला ठरवता आलं पाहिजे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीसोबत आपण स्वतःहून संपर्क करतो,

भेटायला जातो, पण समोरचा मात्र असा संपर्क ठेवण्याबाबत तितका उत्स्फूर्त दिसत नाही. अनेकदा तर आपल्याला टाळलं जात असल्याचे अनुभवही येतात. त्यामुळे अशा एकतर्फी संबंधांतून शक्य तितक्या लवकर आपण बाहेर पडलं पाहिजे. ती उर्जा जिथे परस्परसंवाद आहे, आपुलकी आहे त्या नात्यांमध्ये खर्च केली पाहिजे.

२. कधीही घालत नसलेले कपडे

आपल्या प्रत्येकाच्या कपाटात असे काही कपडे असतात जे आपण कधीही घालत नाही. अगदी पाच – सात वर्षांपासून ते जपून ठेवलेले असतात. वजन कमी केल्यावर घालेन, ठराविक कार्यक्रमाला घालेन असं म्हणत म्हणत ते जपून ठेवले जातात आणि प्रत्यक्षात आपण ते कधीही घालत नाही.

अशा कपड्यांमध्ये स्वतःचा जीव अडकवून आपण काहीही साध्य करत नाही. सध्या फॅशन दररोज बदलते आणि अशा बदलत्या फॅशनच्या काळात कोणीही जुने कपडे घालण्याला प्राधान्य देत नाही. त्यामुळे कोणत्याही भावनिक गुंत्यामध्ये न अडकता घालत नसलेल्या कपड्यांचा निपटारा करणं गरजेचं आहे.

३. गॅझेट्स, उपकरणं

भविष्यात कधीतरी गरज पडेल म्हणून न लागणारी, खराब झालेली उपकरणंदेखील आपण घरात ठेवतो. गॅझेट्सचाही त्यात समावेश असतो. खराब झालेले मोबाईल, इयरफोन्स, चार्जर याची योग्य वेळेत आपण विल्हेवाट लावली पाहिजे.

एक दिवस गरज पडेल म्हणून खराब झालेल्या वस्तू जपून ठेवण्याचा दृष्टीकोन बदलणं फार गरजेचं आहे. याबरोबरच, स्वयंपाकघरात अडकवून ठेवलेले फडके, कपडे, पिशव्या या गोष्टीदेखील गरज नसल्यास वेळच्या वेळीच काढून टाकणं गरजेचं आहे. बिघडलेले गॅझेट्स, उपकरणं चांगले होऊ शकत असतील तर ते रिपेअर करुन दानही करता येऊ शकतात.

४. रेंगाळलेली कामं

कोणकोणती कामं करायची याची मोठी लिस्ट आपल्याकडे असते. ही कामं वेळच्यावेळी करण्यासाठी आपण टू – डू लिस्ट तयार करतो. जसजसा वेळ जातो तसतसं टू – डू लिस्टकडे आणि त्यातल्या कामांकडेही दुर्लक्ष व्हायला लागतं.

मग ही कामं रेंगाळत जातात. त्यापेक्षा वेळच्या वेळी कामं मार्गी लावण्याची सवय आपण लावली पाहिजे. पेंडिंग कामांमुळे येणारा तणाव मोठा असतो. वेळच्या वेळी कामं पूर्ण केली तर या तणावापासूनही दूर राहता येतं.

५. वापरत नसलेले सबस्क्रिप्शन / सदस्यत्व

हल्ली आपल्या प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये इंटरनेट असतं आणि या इंटरनेटच्या जगात अनेक अनेक एप्स आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. मग पिक्चर बघण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, व्हीडिओज बघण्यासाठी आपण वेगवेगळे सबस्क्रिप्शन म्हणजेच सदस्यत्व घेतो.

परंतु यापैकी किती सबस्क्रिप्शन्सचा वापर प्रत्यक्षात करतो, त्यासाठी किती पैसे खर्च केले आहेत याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र, मासिकांसाठीचे सदस्यत्व आपण घेतलेले असतात. त्याचं खरंच वाचन करणं होतंय का हे तपासून ते होत नसेल तर असे सगळे सदस्यत्व रद्द करावेत.

६. वाचणार नाही अशी पुस्तकं

पुस्तकं आवडतात म्हणून त्यात पैसे गुंतवून आपण ती घेऊन येतो आणि मग ती कुठेतरी कोपऱ्यात पडून राहतात. अशी अनेक पुस्तकं घरात पडलेली असतात. अशी पुस्तकं, जी आपण फारशी वाचणार नाही ती कोणालातरी देऊन टाकावीत.

एखाद्याच्या वाचनाची भूक त्यामुळे पूर्ण होऊ शकतं. एखाद्या लायब्ररीलाही आपण अशी पुस्तकं देणगी स्वरुपात देऊ शकतो. अतिरिक्त पुस्तकं घरात सांभाळण्यापासून सुटका होण्याबरोबरच गरजूंना मदतही आपल्या या कृतीतून होऊ शकते.

७. खराब झालेली औषधं / अन्नपदार्थ

औषधं आणि एक्स्पायर झालेलं अन्नपदार्थ यांपासून सुटका करुन घेणंदेखील अतिशय महत्त्वाचं आहे. पाकिटबंद मसाले, केचप, किराण्याचं सामान या सगळ्याच्या पॅकेट्सवरची तारीख तपासून, ज्याची तारीख संपली आहे म्हणजेच जो पदार्थ एक्स्पायर झाला आहे त्याला लगेचच फेकून द्यावं. औषधांचंही तसंच. जी औषधं एक्स्पायर झाली आहेत ती लगेचच टाकून द्यावीत. या वस्तू सांभाळून काहीही साध्य होत नाही हे आपण ओळखलं पाहिजे.

८. नकारात्मक सोशल मीडिया अकाऊंट्स

आपल्याला दुःखी करणारे, राग आणणारे किंवा नकारात्मक वाटणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंट्सला लगेच अनफॉलो करुन त्यापासून सुटका करुन घ्यावी. बहुतांश प्‍लॅटफॉर्मवर अकाऊंट म्यूट करण्याचे पर्यायदेखील उपलब्ध असतात.

आपण दिवसातला मोठा वेळ सोशल मीडियावर घालवत असतो. नकारात्मक विचारांनी आपल्या मनावरही प्रभाव पडू शकतो. त्यामुळे अशा अकाऊंट्सपासून दूर राहणं आणि आयुष्यात सकारात्मकता ठेवणं महत्त्वाचं आहे.

या ८ गोष्टींपासून आपण स्वतःची सुटका करुन घेतली तर आपलं आयुष्य निश्चितच आनंदी होऊ शकतं. गरज आहे ती ही सुटका करुन घेण्यासाठी इच्छा दाखवण्याची. लेख पूर्ण वाचा, त्यावर विचार करा आणि तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button