ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

ब्रिटिशांनी भारतातून नेमकं काय काय लुटलं?

ब्रिटिशांनी भारतावर तब्बल १५० वर्षे राज्य केलं. तेवढ्या काळात भारतात तसे बरेच आधुनिक बदल घडून गेले. त्यांनी भारताला शिक्षण, रेल्वे, रस्ते, महापालिका, कायदे यांसारख्या बऱ्याच सुविधा दिल्या. पण त्या बदल्यात त्यांनी आपल्या भारतातून बरीच संपत्ती, मालमत्ता लुटली. ज्यात कोहिनूर हिरा अग्रक्रमाने येतो. पण या व्यतिरिक्तही ब्रिटिशांनी अनेक वस्तू लुटल्या. तर आजच्या या लेखात ब्रिटिशांनी भारतातून नेमकं काय काय लुटलं याची माहिती घेऊयात.

१. कोहिनूर हिरा –

कोहिनूर हिरा हा पंजाब प्रांताचे महाराजे दिलीप सिंह यांचा होता. कोहिनूर हिरा हा ब्रिटिशांनी चोरला असे जरी सगळे म्हणत असले तरी त्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. कारण १८४९ साली लॉर्ड डलहौसी आणि महाराज दिलीप सिंह यांच्यात लाहोर करार झाला. त्यावेळी तो हिरा त्यांनी इंग्लंडच्या राणीकडे सोपवला. त्यामुळे असे म्हटले जाते की तो हिरा भारतीयांनीच ईस्ट इंडिया कंपनीला भेट म्हणून दिला होता.

२. भवानी तलवार-

शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली ही जगदंबा तलवार सध्या ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ज्यात भवानी तलवारीचा समावेश होतो. त्या तलवारीस मराठ्यांची प्रमुख निशाणी मानली जाते. ही तलवार खूप विलक्षण असून त्याची पाती, नक्षीकाम हे सगळंच सुबक आहे. तलवारीच्या मुठीवर मोठे हिरे आणि माणिक जोडले आहेत. ही तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. परंतू अजूनही या प्रयत्नास यश आलेले नाही.
३. संसाधनांची लूट –
ब्रिटिशांनी जडजवाहीर पैसे तर लुटलेच पण त्यासोबतच नीळ, मसाले असे पदार्थ भारतातून कमी किंमतीत विकत घेऊन ते बाहेरील देशात जास्त किंमतीमध्ये विकत. याही गोष्टीसोबत अजून बऱ्याच संसाधनांची लूट त्यांनी केली ती पुढीप्रमाणे –
• चीनबरोबर केलेल्या अफूच्या व्यापारामध्ये ब्रिटिशांनी भारताचा उपयोग कच्चा माल पोहचवण्यासाठी केला. बिझिनेस टर्मिनोलॉजी वापरायची तर अफूच्या व्यापाराचे मुख्य केंद्र इंग्लंडमध्ये होतं, त्याचा उत्पादक भारत होता. वितरक हाँगकाँग होता आणि ग्राहक चीन होता. नीमच, गाजीपूर वगैरे भागात अजूनही चिक्कार अफीम पिकवले जाते. भारतातली सरकारी अफू फॅक्टरी गाजीपूरला आहे. यातला दु:खाचा भाग म्हणजे आधी पिकवत असलेली पारंपरिक पिकं थांबवून शेतकर्‍यांना अफीम पिकवायला जवळजवळ भाग पाडलं गेलं. तेही अशा रितीने की त्या दुष्टचक्रातून तो शेतकरी कधी बाहेरच पडू नये. अशाप्रकारे ब्रिटिशांनी भारतीय शेतकरी यांची आर्थिक नस पकडून त्यांची लूट केली.

• चहा हे गरीब श्रीमंत या सगळ्यांचं आवडतं पेय आहे. चहा हे मुळात भारतातलं पीकच नव्हतं. ते चीनमधून भारतात एका ब्रिटिशाने लपूनछपून आणलं. ब्रिटिशांनीच डोंगरउतार ताब्यात घेऊन बागा लावल्या. भारतातल्या इतर शेतीच्या तुलनेत चहाची शेती संघटित आहे याचं कारणही हेच आहे. त्या डोंगरउतारांचं नुकसान झालं. तिथलं जैववैविध्य उध्वस्त झालं हे खरं आहे, पण तिथे चहापूर्वी कोणतीही शेती होत नव्हती. नेमकी हीच बाब ब्रिटिशांनी ओळखली आणि याचा फायदा करून घेतला.

• भारतातला कापूस मँचेस्टरला नेऊन त्यापासून बनवलेलं कापड भारतात विकणे हा वसाहतीकरणाचा आणि शोषणाचा एक भाग होता असं वाटलं तरी वस्तुस्थिती काहीशी वेगळी होती. जर अटलांटिकमध्ये काही अडथळा निर्माण झाला तरच भारतातल्या कापसाला मागणी वाढत असे. त्या काळचे अडथळे हे मुख्यतः महायुद्धच होती. कापड तसेही चैनीच्या वस्तूंमध्ये मोडत नाही. त्यामुळे किंमतीचा दबाव अधिक होता. त्यावेळी कच्चा माल भारत, उत्पादन इंग्लंड आणि विक्री भारत असा पुरवठा क्रम ठेवला नव्हता. त्याचा सगळा नफा ते आपल्याकडे वळवून घेत. भारतात कापड गिरण्या उभ्या राहण्याचं प्रमुख कारण देखील तेच होतं.

४. व्यापार करण्याचा परवाना –

ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती हा इतिहासातील मैलाचा दगड ठरला. इंग्रज ही कंपनी उभी करू शकले याचे एकमेव कारण भारत होते. सर थॉमस हे ब्रिटिश राजदूत भारतात आले आणि त्यांनी जहांगीर बादशहाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. युरोपातील एका देशाला, मुगल सलतनतने कायदेशीररीत्या करारनामा करून खुलेआम व्यापार करायला मोकळीक दिली आणि त्या देशातील कंपनीला प्रोत्साहनच दिले. यामधून इंग्रजांना खुलेआम भारतीयांना लुटण्याची संधीच मिळाली.

५. अमानुष कर वसुली –
१९४३ साली पडलेल्या दुष्काळात भारतातील कित्येक लोक हे अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी पडले. कित्येकांवर उपासमारीची देखील वेळ आली. तसे पाहायला गेले तर दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण तरी सुद्धा या दुष्काळाच्या मुळाशी निर्दयपणे केलेले शोषण, साधन-संपत्तीची असंतुलित आयात आणि दुष्काळाच्या कालावधीतही, अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली महागडी कर वसुली ही प्रमुख कारणे होती. शेतकरी अन्न पाण्यावाचून मरताना सुद्धा त्यांनी करवसुली थांबवली नाही. शिवाय धाकदपटशा करून त्यांनी गरिबांची घरे, संपत्ती, धान्य यांच्यावर डल्ला मारला.
अशाप्रकारे ब्रिटिशांनी भारतीयांना आर्थिक, सामाजिक आणि भावनिक या तिन्ही स्तरांवर लुटले. हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि या लेखावर तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button