इतिहासताज्या बातम्या

काय आहे आषाढी एकादशीलाच वारी निघण्याचा इतिहास?

आषाढ महिना जवळ येऊ लागला की वारकरी लोक आनंदी होतात. जशी ही पृथ्वी पावसाची वाट पाहते तसेच वारकरी वारीची वाट पाहतात. वारीचा हा प्रवास काय सुचवतो, ह्याचे उत्तर अजूनही कोणाला सापडले नाही.

पण नेमकी ही जिव्हाळ्याची वारी कधी सुरू झाली असेल, कोणी सुरू केली असेल, वारीचा इतिहास तरी काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वारी कधी आणि का काढली जाते हे सारे काही आपण आजच्या लेखात पाहुयात.

वारीची परंपरा कधी सुरू झाली?

वारी कधी सुरू झाली ह्याबद्दल ठाम मत कोणालाच देता येत नाही. पांडुरंग ही उपास्य देवता आणि तिची साधना म्हणजे वारी असा सरळ अर्थ आहे. अर्थात विठ्ठल पंढरपुरात आल्यानंतर ही वारी चालू झाली असावी.

नामदेवांप्रमाणे “युगे अठ्ठावीस विटेवरी उभा” अर्थात अठ्ठावीस युग झाले हा पांडुरंग पंढरपुरात आहे, असा शब्दशः अर्थ न घेता अगणित वर्षे झाली असा खरा अर्थ होय. शंकराचार्यांनी देखील आठव्या शतकात पांडुरंगाचे अष्टक लिहिले, तेव्हा वारी होतीच.

महानुभाव संप्रदायात देखील वारीचे उल्लेख सापडतात. ह्याचाच अर्थ वारीची परंपरा किती जुनी हे सांगता येत नाही.

संतांचे वारीविषयी उल्लेख असे आहेत – नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे “आषाढी कार्तिकी भक्तजण येती” तसेच ज्ञानोबांनी म्हटले आहे, “जाईन गे माये तया पंढरपूरा” आणि ह्यांनाच समकालीन असणारे चोखोबा म्हणतात, “टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची” हे उल्लेख नंतर एकनाथ महाराज, तुकाराम महाराज तसेच निळोबा, बहिणाबाई अशा सर्व संतांच्या अभंगात आढळतात.

तुकोबांच्या काळापर्यंत दिंडी निघत असे. अर्थात वारी मध्ये पादुका नेण्याची परंपरा नव्हती. पण तुकोबांचे पुत्र नारायणबाबा ह्यांनी तुकोबांच्या व ज्ञानोबांच्या पादुका पालखीत बसवून पंढरपूरला नेण्याची नवीन पद्धत चालू केली होती. संत सुद्धा आपल्या सोबत आहेत हीच त्यामागची भावना होती.

 वारी कधी करायची असते?
थोर असा इतिहास लाभलेली ही वारी आजही निघते. पण ती कधी काढली जाते, हे महत्वाचे आहे. तसं पाहता वारी केवळ आषाढीची नसते तर ती प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायची असते. अनेकजण ही परंपरा आजही पुढे चालवतात. ज्याला बारा एकादशी जमत नाही त्याने चार कराव्यात, ज्याला तेही जमत नाही त्याने आषाढी, कार्तिकी अशा दोन कराव्यात.
तेही अवघड असेल तर किमान आषाढीची वारी करावी. ह्या संप्रदायात शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात असतो. कारण पहिला पाऊस झाल्यानंतर पेरणी होते. नंतर पंधरा-वीस दिवस तरी शेतकऱ्याला जास्त काम करावे लागत नाही. कदाचित ह्याच उद्देशाने आषाढीला महत्व असावे.
 
वारकरी फक्त कळसाचे दर्शन का घेतात?

वारी कधी निघते हे समजले पण ती का निघते हे सांगणे जरा कठीण आहे. कारण प्रत्येकाची वारीला जाण्याची कारणे वेगळी असतात. संतांना जे अभिप्रेत आहे ते असे की, वारी ही मनुष्यजन्माचा सोहळा साजरा करण्याची पद्धत असते. कुठेही मोक्षाची भावना न ठेवता केवळ निसर्गाच्या कृपेने आपण मनुष्य आहोत, ह्याचीच कृतज्ञता पांडुरंगाजवळ व्यक्त करायची असते.

ती एक भेट असते भक्तांची आणि विठ्ठलाची. मंदिरातल्या विठोबाची नव्हे तर जनमानसात असणाऱ्या विठोबाची. म्हणून तर तुकोबा म्हणतात, “पंढरीसी नाही कोणा अभिमान। पाया पडी जन एकांमेका।” कोणतेही कर्मकांड न करता आनंदने वारी करायची असते.

नाचत, खेळत जायचे असते. तुकोबा म्हणतात “नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया। सुख देईल विसावा रे।।” इथे जाऊन चराचरातला विठोबा अनुभवायचा असतो. आणि हेच कारण आहे की, वारकरी मंदिरात न जाता केवळ कळसाचे दर्शन घेऊन मागे फिरतात.

 वारीमागील इतर उद्देश –

वारी ही संघटन करण्यासाठी देखील निघत असावी. समविचारी लोक जसे आज एकत्र येत परिषद भरवतात अगदी तसेच. शिवाय सामान्य लोकांना अध्यात्मातले ज्ञान मिळावे म्हणून ही पद्धत होती. ज्ञानोबांनी सांगितलेला अद्वय सिद्धांत नामदेवांच्या व चोखोबांच्या अभंगात कसा दिसतो, तसेच नामदेवांची भक्ती ज्ञानोबांच्या ओव्यांमध्ये कशी येते, हाच प्रश्न अनेकांना पडतो.

पण ही मंडळी वारी करायची तेव्हा आपले ज्ञान ह्या मनीचे त्या मनी देत असायची. अर्थात ज्ञानाची देवाणघेवाण म्हणजे वारी असते. इथे प्रत्येकाला अधिकार आहे. तुकोबा म्हणतात “यारे यारे लहान थोर। याती भलती नारी नर।” लहान, थोर, नारी, नर आणि प्रत्येक जातीतील लोकांना इथे अधिकार आहे.

जिथे नवरा-बायकोची फुगडी, लहान मुलांची धावाधाव, पुरुषांचे कमरेवर हात ठेवून नाचणे असते, जिथे भगव्या पताका, तुळस, मंजिरी, डोईवरचे देव, संत, कळस-घागरी घेऊन सारे टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरतात,
जिथे स्त्रियांचा डोईवरचा पदर कमरेला येतो आणि आबालथोरांच्या मनातील स्वच्छंद भाव फुलुन येतो त्यालाच वारी म्हणतात. आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्यायलाच हवा. तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बोला, जय जय पांडुरंग हरी..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button