इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

डावखुऱ्या लोकांचं एकदम वेगळं वैशिष्ट्य काय असतं? जाणून व्हाल थक्क…

‘अरे हा तर डावखुरा (डावरा) आहे!’ कोणी डाव्या हाताने काम करताना दिसलं की असं आपण अगदी आश्चर्याने बोलतो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आपल्यापैकी काही लोकच डावखुरी का असतात,

नैसर्गिकरित्या अशा कोणत्या गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना डाव्या हाताने काम करण्याची सवय असते आणि यामध्ये खरंच चांगलं किंवा अपशकुन अशा काही गोष्टी असतात का? डावखुऱ्या लोकांकडे वेगळी अशी काय वैशिष्ट्य असतात आणि खूप कमी प्रमाणातच लोकं डावखुरी का असतात, हे आपण या लेखात जाणून घेऊया.

आपल्या भारतात डाव्या लोकांची संख्या जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं होतं. त्या संशोधनातून भारतातल्या डाव्या हाताचा अधिक वापर करणाऱ्या लोकांची आकडेवारी घेण्यात आली.

भारतात जवळ जवळ १० ते १२ टक्के लोक हे डावखुरे आहेत. त्यात महिलांची संख्या ९ ते १० टक्के आहे तर डावखुऱ्या पुरुषांची संख्या १२ ते १३ टक्के इतकी आहे. त्यामुळे भारतात महिलांच्या तुलनेत पुरुषांनी डावखुरे असण्यात बाजी मारलेली दिलते.

डावखुऱ्यांविषयी वैज्ञानिक काय सांगतात –

वैज्ञानिक सांगतात की, आपल्याला एक मेंदू असला तरी त्या मेंदूचा डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. मेंदूचा उजवा भाग हा आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर तर मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूवर नियंत्रण ठेवतो.

वैज्ञानिकांच्या मते उजव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा डावा मेंदू हा उजव्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि कार्यरत असतो. उजव्या हाताच्या व्यक्तीचा डावा मेंदू शरीराला कामं करण्यास संदेश देतो.

डावखुऱ्या लोकांमध्ये कोणते खास कलागुण असतात?

पण डावखुऱ्या लोकांच्या बाबत मेंदूचं हे समीकरण वेगळं असतं. त्यांच्या उजव्या मेंदूचं डाव्या मेंदूवर अधिक प्रभुत्व असतं. उजव्या हाताच्या लोकांचा जसा डावा मेंदू शरीराला कार्य करण्यास संदेश देतो तसंच डावखुऱ्यांचा उजवा मेंदू शरीराला सूचना देतो.

वैज्ञानिकांच्या मते ज्यांचा उजवा मेंदू डाव्यापेक्षा शक्तिशाली असतो, त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती भन्नाट असते. त्याची कलाशक्ती, कौशल्य, हुशारी हे सगळंच भारी असतं. अशी लोक अत्यंत कलासक्त, भावनाप्रधान आणि सृजनशील असतात. क्रीडा आणि संगीत क्षेत्रात हे लोक अधिक रमतात.

डावखुऱ्यांच्या समस्या त्यांनाच माहीत –

● उजव्या हाताच्या लोकांना उजवी कडून डावीकडे लिहीत जाणं सोप्प होतं पण डावखुऱ्या माणसांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यांना डाव्या हाताने उजवीकडे लिहीत जाणं अवघड होतं.

यामुळे त्यांच्या खांद्यावर आणि मानेवर अधिक ताण निर्माण होतो. अनेकदा त्यांनी लिहिलेली अक्षरं उलटी असतात. त्यामुळे त्यांना उजव्या बाजूच्या गोष्टींचा सराव करावा लागतो.

● आपल्याकडच्या सर्व सोयी-सुविधा उजव्या हाताला लक्षात घेत बनलेल्या आहेत. मग त्यात कात्री असो, कॉम्प्युटरचा माऊस असो, फिशिंग रॉड असो, दरवाज्याचं हॅन्डल,

गिटारच्या तारा, शर्टची बटणं, शिलाई यंत्र अशा अनेक गोष्टी निरीक्षण केल्यास सापडतील ज्या केवळ उजव्या हाताचा विचार करुन केल्या आहेत. त्यामुळे उजव्या हाताच्या व्यक्तीला सहज जमणाऱ्या गोष्टी डाव्या हाताच्या व्यक्तीला अत्यंत कठीण होऊन जातात.

डावखुऱ्या लोकांचा क्लब पण आहे !

डाव्या लोकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी किंवा त्यांना पडलेल्या डावखुऱ्या नावाला कायमचं मिटवून सामान्य व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहण्यासाठी डाव्या हाताच्या लोकांचा हक्काचा असा एक क्लब देखील आहे.

आज जगात त्यांच्या सर्वत्र शाखा निर्माण झालेल्या आहेत. या क्लबच्या स्थापनेनंतरच डावखुऱ्यांसाठी १३ ऑगस्ट हा जागतिक “लेफ्ट हँडर्स डे” म्हणून साजरा केला जातो.

डावखुऱ्या लोकांबाबतच्या विकृत प्रथा –

● फार पूर्वी जपानमध्ये अशी समज रुढ होती की, डावखुरी स्त्री ही चेटकीण असते. त्यामुळे लग्नांनतर ती डावखुरी आहे, हे समोर आलं तर कोणताही विचार न करता तिला घटस्फोट दिला जाई.

● चीन, जपान तसेच इतर देशांमध्ये राजे-रजवाडे डाव्या हाताच्या महिलेशी लग्न करत पण तिला कधीही पत्नीचा दर्जा देत नसत. तिला रखेल म्हणून रहावं लागे.

● एस्किमो लोकांच्या समाजात हा विचार रूढ होता की, डावखुरी व्यक्ती जादूचे प्रयोग करणारी किंवा चेटूक करणारी असते. त्यामुळे लोक त्यांना घाबरत किंवा समाजातून वगळत.

● भारतात आजही डावं-उजवं फार केलं जातं. प्रसाद घेताना डावा नाही उजवा हात. पैसे देताना डावा नाही उजवा हात अशा अनेक गोष्टीत उजव्या हाताला शुभ आणि डाव्याला अशुभ मानलं जातं जे आजच्या काळात बदलणं अत्यंत आवश्यक आहे.

● भारतातील बहुतांश घरात डावखुऱ्या मुलांना लहानपणापासूनच उजव्या हाताने काम करण्याचा अट्टहास केला जातो. जर त्यांनी तसं केलं नाही तर शिस्त लावण्याच्या नावाने मुलांच्या डाव्या हातावर फटके, चटके दिले जातात.

ज्यामुळे अनेक प्रकरणात मुलाचा हात खिळखिळा होतो किंवा ते उजव्या हाताने काम करु लागल्याने त्यांच्या विकासात बाधा येते. मुलं अपंगत्व आल्याप्रमाणे वागू लागतात. एकूणच त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो.

डावखुऱ्यांचे देश –

लंडन आणि ब्रिटनमध्ये जवळजवळ ७० ते ८० लाख लोक डावखुरे आहेत. ब्रिटन आणि लंडनमध्ये खास डावखुऱ्यांना लक्षात घेत सोईसुविधा उपलब्ध आहेत. लंडनमध्ये १९६८ पासून ‘एनीथिंग लेफ्ट हॅन्डेड’ नावाचं पहिलं डावखुऱ्यांचं दुकान आहे. तेथील कर्मचारी डावखुरेच आहेत. डाव्या हाताने वापरता येईल असं सर्व सामान दुकानात मिळतं.

यशस्वी डावखुरी माणसं –

आपल्याला आजवर हे माहीत नसेल, पण यशाचं शिखर गाठलेली अनेक माणसं डावखुरी होती. त्यात चार्ली चॅप्लिन, टॉम क्रुज, सचिन तेंडुलकर, ज्यूलियस सीझर,

ॲलन बॉर्डर, महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, आइनस्टाइन, जॉर्ज बुश, प्रिन्स विल्यम्स अशी अनेक महान व्यक्तिमत्व येतात. त्यामुळे डावखुरे अधिकच हुशार असतात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या डावखुऱ्या मित्र मैत्रिणींचा न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांना हा लेख नक्की पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button