इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

नामांतराची प्रकरणे का चिघळतात? एकदा नक्की वाचा…

‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरने म्हणलं आहे. पण नावातच सगळं आहे. नावामुळे आपली ओळख असते. नावाचं स्पेलिंग चुकलं तरी व्यावहारिक जीवनात बऱ्याच अडचणी येतात.

लोकांच्या भाव भावना, अस्मिता या ही नावाशीच जोडलेल्या असतात. आपण जगात धडपड करत असतो ती नाव मिळवण्यासाठी आणि पावलं जपून टाकत असतो ते नावाला बट्टा लागू नये म्हणून तीच नावं बदलण्यावरून बरेच वाद पेटले आहेत.

अशी नावाची प्रकरणे महाराष्ट्राला नवीन नाहीत या निमित्ताने महाराष्ट्रात घडलेली काही नामांतराची प्रकरणे पाहू.

मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा:

‘नामांतर चळवळ’ म्हणून हे प्रकरण प्रसिद्ध आहे. १९७८ मध्ये विधानसभेतच डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवण्याचा ठराव संमत झाला आणि जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा औरंगाबाद व मराठवाड्याच्या बाकी भागात वातावरण पेटलं.

बऱ्याच विचारवंतांनीही याला विरोध केला. दलित विरुद्ध सवर्ण असा हा वाद पेटला. दलित वर्गातील बऱ्याच लोकांचे जीव गेले आणि त्यांची घरे पेटली.

यांत सेनेसारखा पक्ष नामांतराच्या विरोधात होता. कारण मराठवाड्यातील सेनेचे मतदार त्या विरोधात होते म्हणून. पण नामांतर न होता केवळ नामविस्तार होऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवलं गेलं.

औरंगाबादचे संभाजीनगर:

१९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेतलेल्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्याचं जाहीर केलं. जून १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत बदलण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हा राज्यसरकारमध्येही सेनाच होती. तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांत खैरेंनी नामांतराचा प्रस्ताव मांडला.

तो मंजूर करून नाव बदललं पण यांवर खूप वादंग झाला. औरंगाबाद महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली.

व विरोध का आहे ? यावर ‘”आमचा विरोध नावाला अथवा व्यक्तीला नाही. पण हे करण्यामागे जो उद्देश आहे तो वाईट आहे, त्याला आमचा विरोध आहे.” असं मुश्ताक यांनी सांगितलं.

पुढं सुप्रिम कोर्टानेही नाव बदलण्यापेक्षा विकास काम करा असं सांगून ताशेरे ओढले. २००४ मध्ये आघाडी सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी हे ही मंजुरी मागे घेतली.

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर:

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ’ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यावर लिंगायत समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले तर तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा मागे घेतल्यावर धनगर समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले. व हे प्रकरण मागे पडलं आहे.

नामंतरावरून रान पेटवलं जातं आणि वाद निर्माण केले जातात. वातावरण बिघडवलं जातं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. यात इतक्या परस्परविरोधी भूमिका दिसतात की मराठवाडा

विद्यापीठाच्या नामांतरासाठी हाल सोसणारे; औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करतात. किंवा मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारे मुंबई विद्यापीठाच्या नामांतराची मागणी करतात.

या तर मोठ्या गोष्टी साध्या सिनेमाच्या नावावरून ही लोकांच्या अस्मिता दुखावतात आणि सिनेमाचं नाव बदललं जातं. नावं बदलण्यासाठी दंगे धोपे करण्यापेक्षा समजा शहरांची नावं न बदलता त्यांची मूळ नावं,

त्यांचा इतिहास समाजात सर्वत्र पोहोचवला, शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि अन्य ठेवा नीट जपला तर शांततेत बराच अपेक्षित बदल होईल.

पण केवळ राजकीय फायद्यासाठी वातावरण तापवून शांतता नष्ट करून काय लाभ होणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button