इतिहासताज्या बातम्या

चला करूया नाशिकची ऐतिहासिक सफर!

नाशिक एक अध्यात्मिक, धार्मिक तसेच ऐतिहासिक शहर. जिथे गोदावरीचा गोडवा लोकांच्या मनामधून वाहतो. डोंगररांगांची कणखरता जिथे प्रत्येकात दिसते, असे हे शहर. नाशिक तसे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकचा इतिहास प्रत्येकाला आकर्षित करतो. आजच्या लेखात पाच मुद्यांमध्ये नाशिकबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया !

नाशिकचा पुरातन इतिहास:

पंचवटीमधील रामाचे वास्तव्य आणि अंजनेरीवरचा हनुमानाचा जन्म नाशिकचे पुरातन महत्व वाढवते. सीता गुहासारखे ठिकाण रामयुगाचे साक्षीदार आहे. तसेच तपोवन भूमीचे ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. लक्ष्मण रेखा, रामकुंड, टाकेद सारखी ठिकाणं अभ्यासाचा विषय ठरतो. असा हा नाशिकचा पुरातनकालीन इतिहास आहे.

नाशिकच्या ऐतिहासिक लेण्या:

पुरातन इतिहासप्रमाणे नाशिकला लेण्यांचे लेणे लाभले आहे. सुप्रसिद्ध असणारी पांडवलेणी अर्थात बौद्ध लेणी अत्यंत सुंदर आहे. पांडव इथेच राहिले असे म्हणतात त्यामुळे पांडवलेणी असे नामकरण झाले. पण गौतम बुद्धांच्या लेण्यांमुळे हिला बुद्ध लेणी देखील म्हणतात.

प्रत्येक शिल्प व गुहा बघण्यासारखी आहे. तसेच चामर लेणी देखील प्रसिद्ध आहे. पांडवांनी आपल्या चपला पांडवलेणी वरून फेकल्या ज्या एका डोंगरावर पडल्या, त्यालाच चामरलेणी म्हणतात अशी आख्यायिका आहे.

इथे देखील अनेक शिल्प आहेत, ज्यांचे सौंदर्य काळ्या पाषाणात दिसते. नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगीवर सर्वात उंच म्हणून नावाजले गेलेले महावीर शिल्प आहे. बुद्ध व जैन इतिहासाची सांगड नाशिकमध्ये बघायला मिळते.

नाशिक मधील ऐतिहासिक गडकिल्ले:

महाराष्ट्रातील सर्वात जास्त किल्ले नाशिकमध्येच आहेत. जवळपास ६५ पेक्षा जास्त किल्ले नाशिक मध्ये आहेत. आणि इथल्या किल्ल्यांचे उद्देश टेहेळणी करणे असे होते हे जाणवते. शिवरायांनी साल्हेर किल्ल्यावर सुरतेची लुट आणली शिवाय हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे.

किल्ल्यांची नावे देखील छान आहेत, साल्हेर-मुल्हेर-चौल्हेर, मांगी-तुंगी इत्यादी. तसाच मोठा इतिहास रामशेज सारख्या किल्ल्यांना प्राप्त झाला आहे. अत्यंत कमी शिबंदी असताना सहा वर्षे हा किल्ला मावळ्यांनी मोगलांविरुद्ध लढवला. आणि विश्रामगडा सारख्या किल्ल्यांवर स्वतः शिवछत्रपतींनी विश्राम केला. त्यामुळे नाशिकचा ऐतिहासिक वारसा अधिकच वाढतो.

नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरे:

मंदिरांचे शहर म्हणून प्रसिध्द असणारे नाशिक अध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आहे. गोदावरीच्या घाटावर वसलेले काळाराम मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच सत्याग्रह केला होता. त्या मुळे धार्मिक व सामाजिक अशा दोन्ही इतिहासाची सांगड काळाराम मंदिरामध्ये दिसते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंम्बकेश्वराचे मंदिर देखील अत्यंत प्राचीन आहे ते आक्रमकांनी तोडल्यानंतर पेशव्यांनी पुन्हा बांधल्याचे सांगितले जाते. तसेच नाशिक मधील नवशा गणपती, सुंदर नारायण मंदिर अत्यंत सुंदर आहेत. पेश्वयांच्या कालखंडापासून इथे मंदिरांना एक वेगळे महत्व लाभले.

नाशिकमधील इतर ऐतिहासिक स्थळे:

तसं बघायला गेलं, तर नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. पण आधुनिक इतिहासातील काही गोष्टी इथे अजून देखील सुस्थितीत आहेत. सावरकरांचा भगूर येथील वाडा ह्याच गोष्टीचा नमुना आहे. अजूनही हा वाडा सुस्थितीत आहे. ह्या वाड्याप्रमाणेच पेशवाईतील सरकारवाडा सुंदर आहे.

इतिहासाची परंपरा नाशिकला लाभली आहे. केवळ गरज आहे तो वारसा जतन करण्याची. अनेक लेण्या, गडकोट, मंदिरे, वाडे, घाट इतिहासाचे व त्या काळाचे साक्षीदार आहेत. तो वारसा टिकला तर आपले भवितव्य टिकेल, कारण जो आपला इतिहास विसरतो तो आपले भविष्य घडवू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button