ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

पु.ल. देशपांडेंची ‘ही’ पुस्तकं नक्की वाचायला हवीत…

पु.ल.देशपांडे हे नाव तमाम मराठी जनांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतं. पु.ल. हे महाराष्ट्राचं खूप लाडकं व्यक्तिमत्व. पु.ल. देशपांडेचं विनोदी लेखन आपल्याला माहीत असतं.

पण त्याचबरोबर पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, अभिनय, दिग्दर्शन नाटककार, एकपात्री सादरकर्ता असे पुलंच्या व्यक्तिमत्वाचे विविध आयाम होते.

त्यांचे विनोद, प्रवासवर्णने, नाटके यांचे व्हिडीओ आजही आवडीने पाहिले जातात. अशा पुलंनी १२ जून २००० रोजी आपल्यातून एक्झिट घेतली.

आज असलेल्या त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या अशा काही पुस्तकांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांची फार चर्चा झाली नाही.

अघळ पघळ

बारा लेखांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. खळखळून हसायला लावणारे आणि मन प्रसन्न करणारे असे हे सर्व लेख आहेत. त्यांच्या पुस्तकातील शब्दांतून विनोदी प्रसंग डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे.

माझा एक अकारण वैरी, काही बे’ताल’ चित्रे, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधेन अशी यातील लेखांची शीर्षकेही आगळीवेगळी आहेत. ‘अघळ पघळ’मध्ये पुलंनीच लिहिलेल्या “मराठी वाङ्मयाचा ‘गाळीव’ इतिहास”चा खंड दुसरा हा २० पानांमध्ये दिला आहे.

एक शून्य मी

पु. लं. च्या वैचारिक लेखांचा हा संग्रह असलेलं हे पुस्तक आहे. ‘मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस’ हा सुरुवातीचा लेख. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी,

एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ अशा लेखांतून पु.लं.नी आपले विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे. संवेदनशील आणि सुसंस्कृत मराठी जनांचं दर्शन यातून आपल्याला घडवलं आहे.

नस्ती उठाठेव

संगीत चिवडामणी, त्याचे व्यावच्छेदक लक्षण किंवा मी आणि माझे लेखन : एक चडफडाट. असे मथळे वाचल्यावर काय आहे या लेखांमध्ये नक्की हे, याबद्दल तुम्ही खूप उत्सुक व्हाल. त्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मिळवून लगेच वाचायला सुरुवात कराल.

एकूण १३ लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक पुलंची ही नस्ती उठाठेव हवीशी उठाठेव करून टाकते. लेखाबरोबरच नाट्यप्रवेशही वाचायला मिळतात. शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाची खुमासदार गंमत त्यात अनुभवायला मिळते.

अपूर्वाई

हे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले. पुलंनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. याबद्दल पु.ल. स्वतः म्हणतात, “मी स्वत: प्रवासवर्णन ह्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धास्ती घेतली आहे.

आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र लिहायचे नाही असा फार लहानपणीच संकल्प सोडलेला होता. जरासा विचार केल्यावर लक्षात आले की, मी दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेले आहेत. कारण ह्या दोन-अडीचशे पानांत मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझेच वर्णन अधिक आहे.”

आपुलकी

बालगंधर्व, कवी गिरीश, अनंत काणेकर, शरद तळवलकर आदी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती ज्यांनी मराठी मनांना साद घालण्याचं काम केलं. त्यांची पु.लं.च्या लेखणीतून रेखाटलेली व्यक्तीचित्रे आपल्याला ‘आपुलकी’मधून वाचायला मिळतात.

उरलंसुरलं

पु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह! पु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचक वर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.’

काय वाट्टेल ते होईल!

अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्ज आणि हेलन पापाश्विली या एका जॉर्जियन जोडप्याची Anything Can Happen ह्या आत्मकथेचा पुलंनी केलेला अनुवाद म्हणजे ‘काय वाट्टेल ते होईल!’ हे पुस्तक.

“सर्वांनी एकत्र बसून जेवावं, खावं, प्यावं, भेदाभेद भ्रम अमंगळ असं वागावं, आनंदात रहावं हा मूलमंत्र देणारं हे पुस्तक आहे.

हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो. दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत.

हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणार्‍यांसाठी केले आहे,” असं पुलं आपल्या प्रस्तावनेत म्हणतात. हे पुस्तक अनुवाद वाटतच नाही इतक्या सोप्या व ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे.

बरं या पुस्तकांची उजळणी करण्याचं कारण हे की कायम हसवणाऱ्या पुलंनी २२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आणलं.

१२ जून ही पु.लं.ची पुण्यतिथी. ते शरीररूपाने आपल्यातून निघून गेले असले तरी २२ वर्षानंतर सुद्धा पुस्तकांमधून, त्यांच्या फेसबुक, युट्युबवर असणाऱ्या विविध व्हिडीओजमधून ते आपल्याला सतत भेटतात. आजच्या या स्मृतीदिनी पुलं नावाच्या भाईंना सादर वंदन!.!.!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button