या ५ गोष्टी तुम्हाला माणूस म्हणून यशस्वी बनवतील!
अगदी छोट्या – छोट्या गोष्टी, कृती केल्याने आपण आपलं आयुष्य समृद्ध करु शकतो. अर्थातच या कृती करण्याची इच्छा आणि क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. अनेकदा आपला अहंकार, मीपणा, स्वकेंद्रीत वृत्ती आपल्याला समृद्धतेपर्यंत पोहोचू देत नाही.
एक संकुचित चौकट आपलाच स्वभाव आपल्याभोवती निर्माण करतो. पण ही चौकट सोडून खरंच जर आपल्याला आयुष्य समृद्ध करायचं असेल तर काही उपाय त्यासाठी केले पाहिजेत. काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या, याविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.
१. नम्रता आणि आत्मविश्वास यांच्यात संतुलन असावं
प्रत्येक माणसात नम्रता आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. या दोन गुणांच्या आधारावर माणूस आयुष्यात हवं ते साध्य करु शकतो इतकी ताकद या गुणांमध्ये आहे.
पण हे दोन्ही गुण सोबत बाळगणं आणि त्यांचं संतुलन राखणं मात्र अनेकांसाठी आव्हानासमान होऊन बसतं. ज्या माणसात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असतो तो बऱ्याच अंशी स्वतःच्या प्रेमात असतो.
स्वतःला चांगलं समजताना अनेकदा त्याच्यातला नम्रपणा दूर होतो आणि अहंभाव जागृत होतो. मग त्याचं व्यक्तिमत्व कितीही प्रभावी असलं तरी त्याच्या अहंपणामुळे तो त्याचंच नुकसान करुन घेतो.
त्यामुळे नम्रता आणि आत्मविश्वासामधली बारीकशी रेष जपत या दोन्ही गुणांचं संतुलन राखणं आपल्याला समृद्ध करु शकतं.
२. जोखीम घ्या. “काय चूक होऊ शकते”, असा विचार न करता, “काय बरोबर होईल?” याचा विचार करा
जोखीम घेतल्याशिवाय आपण आयुष्यात काहीही उंच, मोठं असं करु शकत नाही. काही साध्य करायचं असेल, एखादी मोठी व्यक्ती म्हणून आपल्याला नाव कमवायचं असेल तर जोखीम घेतलीच पाहिजे.
अनेकदा जोखीम घेतली तर आपलं नुकसान होईल या विचाराने अनेकजण स्वतःचा कम्फर्ट झोनच सोडत नाही. त्याच त्या गोष्टी कम्फर्ट झोनमध्ये अडकून करत राहतात.
त्यातच आयुष्य संपून जातं. त्यामुळे जोखीम घ्यावी आणि कोणताही नकारात्मक विचार त्यामध्ये आणू नये. काय चूक होऊ शकतं यापेक्षा काय बरोबर होऊ शकतं याचा विचार करावा. सकारात्मक विचाराने घेतलेली जोखीम नक्कीच आपल्याला चांगल्या मार्गावर नेऊन पोहोचवेल.
३. आयुष्यात कृतज्ञतेची ठाम जागा असणं अतिशय गरजेचं आहे
प्रत्येक यशस्वी माणूस कृतज्ञतेचं महत्त्व आपल्याला सांगत असतो. कोणत्याही तक्रारीशिवाय, आनंदाने जगण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे.
म्हणजे काय करायचं तर, आपल्याकडे जे – जे काही चांगलं आहे, त्या सगळ्याप्रती आभार मानायचे. जे नाही त्यामध्ये स्वतःला अडकवायचं नाही. चांगल्या गेलेल्या प्रत्येक दिवसाप्रती कृतज्ञतेची भावना मनात ठेवायची.
ही एक छोटीशी कृती आपल्याला मानसिकदृष्ट्याही आनंदी ठेवते आणि आयुष्यात समाधान आणते. अर्थात, या कृतीचं रुपांतर आपल्याला सवयीमध्ये करावं लागेल.
आयुष्यात कशालाही नावं ठेवण्याची सवयही कृतज्ञतेमुळे नाहीशी करता येईल आणि त्यामुळे आयुष्य निश्चितच समृद्ध होईल.
४. आवडत्या आणि नावडत्या भावनांमधील संतुलन
रोजच्या जगण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतात. अनेक भावना आपल्या मनात निर्माण होत असतात. या कधी चांगल्या, आपल्याला आवडणाऱ्या असतात तर कधी आपल्याला नावडणाऱ्या असतात.
पण भावना आवडत्या असो वा नावडत्या असो, त्यांचं संतुलन आपल्याला राखता आलं पाहिजे. आवडत्या भावनांनी आपण हुरळून जाता कामा नये आणि नावडत्या भावनांनी सतत दुःखात अडकून पडताही कामा नये. त्याचं संतुलन आपल्याला राखता आलं तर आयुष्याची मजा कित्येक पटींनी वाढू शकेल.
५. स्वतःला आणि लोकांना माफ करायला शिका
माफ करणं, क्षमाशीलता हे गुण समृद्ध आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या गुणांमुळे मानसिक शांतता, स्थैर्य राखणं आपल्याला सोपं जातं. कोणाशीही संबंध बिघडत नाही आणि बिघडले तर माफी मागून त्यात सुधारणाही आपल्याला करता येते.
याबरोबरच स्वतःकडून काही चूक झाली, स्वतःच्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकलो नाही तर स्वतःला माफ करणंही आपल्याला जमलं पाहिजे. स्वतःला दोष देणं हे सगळ्यात त्रासदायक ठरु शकतं याची जाणीव ठेवून आपण स्वतःलाही माफ करण्यास शिकलं पाहिजे.
या पाचही गोष्टी माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठेही वाहवत न जाता, गरज असेल तिथे माघार घेत, आत्मविश्वासाची ताकद वापरत आयुष्य आपण जगलो तर त्याचा आनंद कितीतरी पटींनी जास्त असेल. अशा समृद्ध आयुष्यासासाठी या पाच गोष्टी आपण फॉलो केल्याच पाहिजेत.