इतिहासताज्या बातम्या

सावरकर अंदमानच्या शिक्षेपासून हिंदुत्वाकडे का वळले? कारण जाणून व्हाल थक्क…

‘माझी जन्मठेप’ हे सावरकरांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या अंदमानमधील आयुष्याचा परिचय करून देते. आज देखील ते पुस्तक वाचताना अंगावर शहारा येतो. क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कार्य केले.

अनेकांना फाशीची शिक्षा व्हायची पण सगळ्यात मोठा त्रास होता इंग्रजांच्या हाती जिवंत लागण्याचा. इंग्रज आपल्यासोबत कोणते अत्याचार करतील ह्याचा नेम नव्हता. आणि हे अत्याचार जिथे चालायचे ते ठिकाण म्हणजे अंदमान.

इथेच काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. या लेखात आपण सावरकरांचे इथले आयुष्य, त्यांना झालेला त्रास, घडलेले प्रसंग, इथूनच सावरकर हिंदुत्वाकडे का वळले, याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत.

सावरकर लंडनमध्ये असताना त्यांनी देशभक्तीपर साहित्याची, शस्त्रांची आणि देशभक्तांची निर्मिती केली. यातूनच प्रेरणा घेत मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरे ह्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना मारले होते. ह्या घटना वेगवेगळ्या घडल्या पण सारा संशय मात्र सावरकरांवर आला.

त्यात सावरकरांच्या मोठ्या बंधूंना इंग्रजांनी अटक केली गेली आणि सावरकरांच्या नावाचे वॉरंट लंडनमध्ये निघाले. तिथेच ब्रायटनच्या किनाऱ्यावर सावरकरांनी ‘ने मजसी ने’ म्हणत भारत मातेची आठवण व्यक्त केली. पण अखेर इंग्रजांनी त्यांना अटक केली.

ती जहाजातून मारलेली जगविख्यात उडी आपल्याला माहितीच आहे. पुढे फ्रान्समधील अधिकाऱ्याला पैसे देऊन इंग्रजांनी सावरकरांना पुन्हा ताब्यात घेतले. उडी फसली होती पण कार्य अत्यंत महान होते.

अखेर सावरकरांना भारतात आणण्यात आले. आधी मुंबई आणि मग तिथून पुण्याला. त्यांच्या विरुद्ध खटला भरला गेला. इंग्रजांविरुद्ध साहित्य निर्मिती, शस्त्र निर्मिती आणि इंग्रज अधिकाऱ्याला मारण्यामागचे मास्टरमाइंड सावरकर आहेत, या आरोपांखाली सावरकरांना २५-२५ वर्षांच्या दोन शिक्षा झाल्या.

एकूण ५० वर्षांची ही जन्मठेप ऐकून सावरकर हसले. त्यांना वाटलं इंग्रज आपल्याला फाशीची शिक्षा देतील. पण त्यांना हसताना बघत इंग्रज म्हणाले, “अहो सावरकर तुम्ही पहिल्या २५ वर्षातच मरून जाल. उरलेली शिक्षा भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल.

सावरकर पुन्हा हसले आणि म्हणाले, “चला ह्या निमित्ताने तरी तुम्ही हिंदू धर्मातील पुनर्जन्मावर विश्वास ठेवला.” हे वाक्य आज हसायला लावतं पण तेव्हा सावरकरांच्या मनात काय चाललं असेल, कुणास ठाऊक. आपल्या पत्नीला ते भेटले आणि त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली.

रामाला वनवास झाला, पांडवांना अज्ञातवासात जावे लागले तसेच आपणही निराश न होता ह्या महान लोकांसारखेच संघटन करायचे, ह्या शिक्षेचा काहीतरी फायदा करून घ्यायचा, हे सावरकरांचे ठरले होते. अंदमानचे ते सेल्युलर जेल तीन मजली होते.

त्यात शेवटच्या मजल्यावर शेवटच्या खोलीत सावरकरांना ठेवण्यात आले. हातापायात बेड्या घेऊन तीन मजले चढणे सोप्पे काम नव्हते. शिवाय कैद्यांना एकमेकांसोबत बोलायची परवानगी नव्हती. पण सावरकर इतके विद्वान की, त्यांनी बेड्या वाजवत बेड्यांची लिपी तयार केली. आणि तिथेही देशभक्तांचे संघटन केले.

अंदमानात सर्व कैद्यांना नारळ सोलण्याची शिक्षा असायची. हाताने नारळ सोलायचे आणि त्याच्या सुतळ्या/दोऱ्या बनवायच्या. हातातून रक्त येईपर्यंत हे काम चालू राहायचे. तेलाच्या घाण्याला जुंपून बैलाप्रमाणे तेल काढायला लागायचे.

सावरकरांनी हे काम करत असताना वाळूवर बाराखडी शिकवत अशिक्षित कैद्यांना साक्षर केले. कधी कधी इंग्रज सावरकरांना खोलीत दिवसभर बंद करून ठेवायचे तेव्हा त्या खोलीत बाभळीच्या काट्याने त्यांनी भिंतींवर कमला नावाचे काव्य लिहिले. एक पद लिहावे ते पाठ करावे पुन्हा दुसरे लिहावे. ते पण अशा ठिकाणी जिथे मृत्यूचा देखील थरकाप उडावा.

सावरकरांचा पिंडच मुळी नेतृत्व करणारा होता. त्यांनी तिथे देखील लोकांचे संघटन केले. कैद्यांच्या जेवणात मेलेली गोम पाहताच सावरकरांनी उपोषण करायचे ठरवले. कोणीच काम करायचे नाही, जेणेकरून कमिशनर जेलमध्ये येईल. तेव्हा त्यास सर्वांनी अन्न बदलावे असे सांगावे, हे सावरकरांचे नियोजन होते.

सगळ्यांनी त्यांच्या नेतृत्वात ते कार्य केले. इंग्रजांनी काही लोकांना ह्या उपोषणामुळे विजेचे झटके दिले, अमानुष छळ केला पण सावरकरांनी त्या जेलरला कायदा सांगितला, “आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतोय, तुझी तक्रार केली तर नोकरी घालवून बसशील.” ह्याच त्यांच्या निश्चयामुळे अखेर इंग्रजांवर परिणाम झाला आणि त्यांना कैद्यांच्या अन्नात सुधार करावाच लागला.

अंदमानात अन्यायाला सीमा नव्हती. कधीकधी सावरकरांच्या मनात यायचे, ह्या कामापेक्षा मेलेले बरे. डोळ्यापुढे अंधार यायचा पण पुन्हा भारतमातेचे ते समृद्ध चित्र दिसायचे. आपण मेलो तर देशाचे काय, हा सवाल त्यांना त्रस्त करायचा. इथेच सावरकरांनी हिंदुत्व जाणले.

त्यावेळी मुसलमान कैद्यांमध्ये जी चर्चा होती ती भारत फाळणीची होती. मुसलमानांना भारतावर स्वतःचे राज्य हवे होते. सावरकरांनी ओळखले होते की, इंग्रज आज ना उद्या जातील पण ह्या मुसलमानांचे काय, जे देश तोडायला निघाले आहेत? म्हणून त्यांनी हिंदुत्वाची कास धरली. आता हे त्या काळच्या मुसलमानांकरिता सावरकरांचे विचार होते, हे समजून घ्यायला हवे.

शिवाय पाकिस्तानात असणारे कर्मठ मुसलमान त्याकाळी भारतात होते त्यामुळे सावरकर कुठेही सांप्रदायिक वाद उभा करत नव्हते. केवळ कर्मठ असणाऱ्या मुसलमानांना त्यांनी दिलेले हे उत्तर होते.

हे सर्व वाचल्यावर आपल्याला कळेल की, सावरकरांनी शिक्षेचाही योग्य वापर करून घेतला. मृत्यूला देखील न घाबरवणारे सावरकर खरोखर मृत्युंजयी ठरले. ‘त्यांनी माफीनामा लिहिला, ते माफीवीर होते’, असे लोक म्हणतात पण त्याला काहीएक अर्थ नाही.

ती त्यांची एक युक्ती होती. ज्यांना हे कार्य सोपे वाटते त्यांच्यासाठी आज देखील अंदमानच्या खोल्या रिकाम्या आहेत. तिथे जाऊन काहीवेळ बसावे आणि केवळ १० मिनीटे कोलू फिरवून बघावे म्हणजे क्रांतिकारकांची केलेल्या त्यागाची थोडीतरी किंमत कळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button