इतिहासताज्या बातम्या

शंभूराजांच्या आयुष्यातील ह्या आहेत पराक्रमी मोहिमा…

“आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आम्हास करणे आगत्य” अर्थात शिवरायांनी जे केले तेच आमचे कर्तव्य आहे असे शंभूराजे म्हणाले होते. पराक्रमी पित्याचा पराक्रमी पुत्र असणाऱ्या श्री संभाजी महाराज ह्यांची आज ३६५ वी जयंती. आजच्याच दिवशी पुरंदर किल्ल्यावर ह्या सूर्याचा जन्म झाला होता. १४ मे १६५७ रोजी शिव-सईला पुत्ररत्न प्राप्त झाले होते.

जिजाऊंचे थोरले चिरंजीव संभाजी ह्यांना अफझल खानाने दगा करून मारले म्हणून तेच नाव आवडीने ठेवण्यात आले. आजच्या लेखातून शंभू राजांनी केलेल्या काही लढाया आणि त्यातले थक्क करणारे पराक्रम आपण बघणार आहोत.

१) मोहीम जंजिरा :

शिवरायांनी सर्व शत्रूंवर वचक बसवला होता. त्यात हा जंजिऱ्याचा सिद्दी देखील होता. मराठ्यांना हा किल्ला काबीज करता आला नाही पण शिवरायांनी सिद्दीला पुरते धाकात ठेवलेले आपल्याला दिसते. पण शिवरायांच्या निधनानंतर ह्या सिद्दीने पुन्हा रयतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. शंभू राजांना ह्या सिद्दीला धडा शिकवायचाच होता.

मोठे सैन्य घेऊन छत्रपती संभाजी महाराज जंजिऱ्याजवळ पोहोचले. पण ह्या आधी कोंडाजी फर्जंद ह्यांना पाठवून ही मोहीम शंभूराजांना जिंकायची होती. दुर्दैवाने हा प्रकार सिद्दीच्या लक्षात आला नि त्याने कोंडाजी व इतर साथीदारांना मारले. त्यांचे तुकडे करून समुद्रात टाकले. ह्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आता स्वतः खासे छत्रपती शंभू महाराज आले होते.

शंभू राजांनी एक वेगळे धाडस इथे केले. चक्क समुद्रात पूल बांधायचे आदेश दिले. दगड, लाकूड, माती, कापड साऱ्या वस्तू वापरत हा पुल तयार होऊ लागला होता. पण तेव्हाच मोगलांच्या हसन अली खान ह्याने कल्याण भिवंडी इथे आक्रमण केले, जाळपोळ केली.

शंभू राजांना तिथे जाणे भाग होते. पण त्याच पूर्वी एका रात्री समुद्राला भरती आली आणि ह्या पुलाचे नुकसान झाले. शिवरायांनी आरमार निर्माण केले होते पण शंभूराजांनी तर थेट पूल बांधत लढाई करण्याचे सामर्थ्य दाखवले हे विशेष.

२) मोहीम बाणावार :

दक्षिणेत शंभूराजांनी मोहीम काढली होती, तेव्हाच बाणावारला लढाई झाली होती. मग्रूर असा चिक्कदेवराय लोकांना छळत होता. त्याने वकिलांचे कान नाक कापले होते. दूतास मारू नये हा नियम त्याने कधीच मोडला होता.

संभाजी महाराज जेव्हा दक्षिणेत उतरले तेव्हा कुतुबशहा आणि बसप्पा नाईक ह्यांनी राजांसोबत तह केला. ह्या साऱ्या फौज बाणावारला असताना चिक्कदेवरायाने अचानक हल्ला केला. त्याच्याकडचे बाण हे विशेष शस्त्र होते. कुतुबशहा व बसवप्पा नाईकने माघार घेतली मराठे देखील नंतर त्रिचनापल्लीला गेले.

तिथे एकोजी राजे येऊन शंभू राजांना सामील झाले. ह्या मोहिमेत स्वतः शंभूराजांनी बाण व चामडी चिलखत बनवले होते. अवघ्यांनी मिळून चिक्कदेवरायला धरले व पुढे खंडणी घेऊन सोडून दिले. दक्षिणेतला शंभूराजांचा हा एक मोठा पराक्रम होता.

३) फोंडा मोहीम :

एकदा पोर्तुगीजांनी मराठ्यांना त्रास देण्याकरिता फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केले होते. ह्या किल्ल्याला वेढा देत सर्व बाजूने पोर्तुगीजांनी तोफा लावल्या होत्या. तेव्हा किल्ल्यात येसाजी कंक व त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक होते.

नऊ दिवस किल्ल्यावर मारा सुरू होता. अखेर पोर्तुगीजांनी तोफांचा मारा करत किल्ल्याच्या भिंतीला खिंडार पाडले. पण मराठ्यांनी ताबडतोब लाकडी भिंत तिथे उभी केली. मराठे आता ह्या भिंतीच्या सहाय्याने लढत होते.

दुसऱ्याच दिवशी संभाजी महाराज जवळपास ८५० घोडेस्वार व १५०० पायदळ घेऊन इथे आले. मोठे युद्ध झाले आणि ह्यातून पोर्तुगीजांनी पळ काढला. दुर्दैवाने कृष्णाजी कंक हे जखमी झाले व पुढे ते निधन पावले.

४) गोवा मोहीम :

संभाजी महाराजांनी एक रात्री सांतु इस्तेव्हाव नावाचा पोर्तुगिजांचा किल्ला ताब्यात घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोर्तुगीज लोक पळू लागले. चर्च मधील घंटा वाजवण्यात आली पण रात्री काहीही करणे शक्य नव्हते.

दुसऱ्या दिवशी सकाळी व्हॉइसरॉय स्वतः सैन्यानिशी आला. पण त्याला मराठ्यांनी गनिमी कावा दाखवत माघारी पाठवले. तो पळून जात असताना शंभू राजे त्याच्या मागे लागले. मध्ये असणाऱ्या नदीचे पाणी वाढले होते.

इथेच राजांचा घोडा अडकला पण जीवावर खेळून खंडोजी बल्लाळ ह्यांनी शंभूराजांना सुखरूप बाहेर आणले. मराठ्यांना त्या दिवशी सारा गोवा प्रांत काबीज करायचा होता. हे धाडस केवळ श्री शंभू छत्रपतींमुळे मावळ्यांना लाभले.

शंभूराजे आयुष्यातली एकही लढाई हरले नाहीत हाच त्यांचा पराक्रम आहे. कसे जगावे हे शिवरायांनी शिकवले पण कसे मरावे हे शंभू राजांनी शिकवले. आपल्या शक्तीच्या जोरावर नि जिजाऊंच्या संस्कारांना लक्षात ठेवत शंभूराजांनी स्वराज्याचे रक्षण केले होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button