ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

खेलो इंडिया स्पर्धा गुणी खेळाडूंसाठी का आहे वरदान?

खेलो इंडिया उपक्रमाने गेल्या तीन वर्षांत भारतीय तरुणांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ मिळवून दिलं आहे. नुकतंच ४ जूनला खेलो इंडिया स्पर्धेचं उदघाटन झालं आहे.

यात महाराष्ट्राचे खेळाडू जोरदार प्रदर्शन करत आहेत. त्या निमित्ताने खेलो इंडियाची कशी सुरुवात झाली? खेळाडूंना याचा काय फायदा होतो? या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

खेलो इंडिया सोबत भारतीय ऑलिम्पिक जोडले गेले –

‘खेलो इंडिया स्कूल गेम्स’ म्हणून २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. त्या वर्षाच्या उत्तरार्धात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सुद्धा या उपक्रमात सामील झाले आणि २०१९ पासून खेलो इंडिया स्कूल गेम्सचे नाव बदलून खेलो इंडिया युथ गेम्स असे करण्यात आले तेव्हा या उपक्रमाला मोठे यश मिळाले. २०१९ चे हे खेळ पुण्यात झाले होते.

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या पहिल्या स्पर्धा २०२० मध्ये ओडिशा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. काश्मीरमधील लेह, लडाख आणि गुलमर्ग येथे खेलो इंडियाचे हिवाळी खेळाचे दोन सत्र आयोजित करण्यात आले होते.

त्याचवेळी, खेलो इंडिया हिवाळी खेळांचे पहिले सत्र २०२० मध्ये आयोजित करण्यात आले होते. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या दुसऱ्या सत्रात २० खेळांचा समावेश होता.

२०२२ मध्ये खेलो इंडिया मध्ये कोणकोणते खेळ समाविष्ट झाले?

वर सांगितल्याप्रमाणे २०२२ मध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये परंपरागत भारतीय खेळांपैकी गटका, कलारीपयट्टू, थांग -टा, मल्लखांब आणि योग या खेळांचा प्रथमतः समावेश करण्यात आला.

या खेळांमुळे खेळाडूंना होणारा फायदा –

या क्रीडा उपक्रमात भारतातील तळागाळातील पारंपरिक खेळ समाविष्ट केले आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये १७ वर्षांखालील शालेय विद्यार्थी आणि २१ वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित केली जातो.

दरवर्षी पारंपरिक क्रीडाप्रकारांमधील प्रतिभा शोधण्यासाठी, प्रत्येक खेळासाठी एक प्रतिभा शोध समिती असते, जी प्रत्येक खेळातील २ खेळाडूंची निवड करते. सर्वोत्तम १००० मुलांना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी ८ वर्षांसाठी ५ लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.

या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी –

यावर्षी नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुरुवातीच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी अव्वल होती.

पण आता हरियाणाचे खेळाडू प्रथम स्थानी आले. हरियाणाने ५२ सुवर्णांसह एकूण १३७ पदके जिंकली, तर महाराष्ट्राने ४५ सुवर्णांसह १२५ पदकांसह दुसरे स्थान पटकावले.

४ ते १३ जून दरम्यान झालेल्या या खेळांमध्ये ४७०० खेळाडूंनी २५ स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्यात २२६२ मुलींचा समावेश होता.

महाराष्ट्राच्या अदिती स्वामी हिने तिरंदाजीच्या गर्ल्स कंपाउंड प्रकारात महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.

महाराष्ट्राची जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिसने २०० मीटर बटरफ्लाय आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आणि टेबल टेनिस स्टार दिया चितळेने मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या लक्ष्य नारंगचा ४-३ असा पराभव केला.

मुलींच्या तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अदिती गोपीचंदने सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राची वेटलिफ्टर हर्षदा गरुड हिने युथ नॅशनल गेम्समध्ये महिलांच्या ४५ किलो वजनी गटात विक्रम मोडून नवा विक्रम रचला.

आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगात आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण ऑलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत आपली २००८ आणि २०२१ ही वर्षं सोडल्यास बाकी विशेष कामगिरी आजवर दिसली नाही.

परंतु खेलो इंडिया सारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंच्यातील प्रतिभा शोधून त्यांना प्रशिक्षण प्रोत्साहन दिल्यास जागतिक स्तरावर भारताचे नाव हे क्रीडापटू नक्कीच उज्ज्वल करतील.

दिगाज खेळाडूंनी सुरु केलेली परंपरा खेलो इंडिया मध्ये चमकदार कामगिरी केलेले प्रतिभाशाली खेळाडूही करतील. त्यामुळे खेलो इंडिया ही स्पर्धा खेळाडू आणि क्रीडा विश्वासाठी वरदानच ठरत आहे.

आपल्याला याबद्दल काय वाटतं? अशा खेळांमुळे तळागाळातील खेळाडूंना खरंच संधी मिळेल? किंवा त्यासाठी आणखी कोणते प्रयत्न झाले पाहिजे? आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button