ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

‘ह्या’ तंत्राने तात्काळ नदीचे पाणी स्वच्छ करा…

जंगल सफारी करताना, रानोमाळ भटकताना, पायवाटा शोधताना तहान तर लागणारच आणि अशावेळी जर तुमच्या जवळील पाणी संपलेलं असेल तर तुमची फजिती झालीच म्हणून समजा. पण आज मी तुम्हाला असे तंत्र सांगणार आहे, ज्यामुळे नदीचे पाणी शून्य मिनिटात स्वच्छ होईल आणि तुमची तहान भागेल.

एकदा मी माझ्या मित्रांसमवेत महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात, रानोमाळ भटकत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. आमची भटकंती वाढतच गेली. आमच्याकडील पाणी संपलेले होते. तेव्हा आमच्यातील दर्शनला तहान लागली. पाण्याच्या शोधार्थ आमची भटकंती सुरू होती.

तितक्यात आम्हाला दिसली जवळून घाटातून जाणारी सावित्री नदी! नदीचे पाणी वाहते पण गढूळ होते. त्यामुळे पाणी कसे प्यावे हा विचार आम्ही करतच होतो. आमची ही चलबिचल बघून शेजारीच थांबलेल्या एका काकांनी नदीचे गढूळ पाणी स्वच्छ करण्याचे एक तंत्र सांगितले.

काय आहे पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र?

नदीच्या काठावरच, थोडेसे अंतर सोडून एक लहान खड्डा करायचा. या खड्ड्याला आदिवासींच्या भाषेत विहीरा असेही म्हणतात. त्या विहीरामध्ये नदीचे पाणी आपोआप येते. नदी किनारी केलेल्या खड्ड्यात नदीचे पाणी साचते. त्यातील गाळ आपोआप तळाला जातो आणि पाणी स्वच्छ होऊन ते पिण्यायोग्य बनते.

तेव्हा पाणी पिण्यासाठी पळसाचे तीन पाने घेऊन त्यापासून ग्लासच्या आकाराचे एक साधन बनवायचे. त्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून एका काडीने त्याला घट्ट बसवा. पाणी पिण्याच्या या साधनाला टोपा किंवा डोमले असेही म्हणतात. त्या पानापासून बनलेल्या टोपात खड्ड्यात साचलेले पाणी घ्या आणि तुमची तहान भागवा. हे पाणी स्वच्छ आणि नितळ असते.

आम्ही ते पाणी प्यायले. पाणी खरंच खूप गोड होते. नदीचे पाणी वाहते असल्याने त्यात क्षार नसतात. तुम्ही भटकंती करत असताना सोबत काचेची बॉटल सुद्धा ठेऊ शकता. काचेच्या बॉटलला पाच सहा तास उन्हात ठेवल्याने सुद्धा पाणी शुद्ध होते.

या नैसर्गिक जुगाडाची गरज काय आहे?

खूपदा आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जातो. सोबत नेलेले एक दोन बॉटल पाणी कधी संपेल हे काही सांगता येत नाही आणि रानावनात पाण्याची उपलब्ध सुविधा म्हणजे नदी आणि ओढेच! त्यामुळे जंगलात ऐनवेळी तहान लागल्यानंतर ओढा, नदीकाठी हा नैसर्गिक जुगाड खूप महत्वाचा आहे.

स्वच्छ केलेल्या पाण्यातील जीवाणू नष्ट झाले असं होतही नसेल परंतु रेतीतून गाळलं गेल्यामुळे तहान भागवण्यासाठी पाणी स्वच्छ होत हे मात्र नक्की. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सोबत तुरटीचा खडा, पाणी स्वच्छ करायच्या गोळ्या जवळ ठेऊ शकता.

तेव्हा तुम्ही सुद्धा ट्रेकिंग अथवा जंगल सफरीवर जाणार असाल तर नदीचे पाणी पिण्याचा हा प्रयोग करून निसर्गाची किमया अनुभवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button