हसत राहा, आनंदी आरोग्य राखा…
“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” चला, हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे हा प्रश्न सतत विचारताना दिसतात.
याचा अर्थ आपण केवळ या कार्यक्रमातल्या विनोदांवर हसायचं असं नाही तर आयुष्यभर सतत हसत राहायला हवं. कारण हसण्याचे खूप फायदे आहेत. तेच फायदे आपण लेखातून पाहणार आहोत.
प्राणवायूचे प्रमाण वाढते:
मोकळेपणाने हसत राहिल्यामुळे आपले शरीराला मोठा श्वास घेऊन आणि सोडण्याची सवय लागते. यामुळे शरिरात ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतला जात असून त्यामुळेच ऑक्सिजन पातळी योग्य प्रमाणात राहत असते. हे एका संशोधनातून असं समोर आले आहे.
रोग प्रतिकारकशक्ती कायमच चांगली ठेवण्यासाठी लोक कायम प्रयत्न करतात. पण आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे का हसण्यामुळेही प्रतिकारकशक्ती वाढते.
यामुळेच रोगांविरूद्ध लढण्यासाठी शरीर सामर्थ्यवान होते. हसण्यामुळे शरीरात विविध जंतू-संसर्गाला प्रतिबंधित करणाऱ्या पेशी वाढतात.
हसण्याचा फायदा अशा प्रकारे होतो, की आपल्या शरीरात एंडॉरफिन संप्रेरक म्हणजे हॉर्मोन तयार होते, व हे हॉर्मोन स्रवले जाते.
याचा परिणाम असा होतो की या संप्रेरकामुळे आपल्याला ताजंतावानं झाल्यासारखं वाटतं. म्हणून आपण आनंदी, सकारात्मक राहतो.
खूप हसण्याचा परिणाम आपल्या रक्ताभिसरणावर होत असतो. शास्त्रज्ञ हे सांगतात, की उस्फूर्तपणे हसणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रित राहतो.
हसण्यामुळे वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन स्त्रवल्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो. कारण स्नायूंवर येणार ताण हा वेदना निर्माण करतो.
हसण्याने कॅलरीजही बर्न होतात, ही गोष्ट कदाचित कित्येकांना माहीत नसावी. जर आपण दिवसातून १० ते १५ मिनिटे हसत असू तर तुम्ही सुमारे ४५-५० कॅलरीज जाळू शकतो.
त्यामुळे जर आपल्याला कॅलरीज बर्न करून वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर दररोज १५-२० मिनिटे या ना त्या कारणाने हसण्याचा व्यायाम केला पाहिजे.
रात्री चांगली झोप हवी असेल तर हसण्याचा उपाय कामी येतो. एका अभ्यासात हेच सांगितलं गेलं आहे की, खूप हसल्यानंतरच्या काही क्षणांमध्ये मेंदूचा भाग जिथे विद्युत रासायनिक प्रक्रिया घडून येते
आणि झोपेला निमंत्रण मिळतं. जेव्हाही आपल्याला रात्री झोप येत नाही, तेव्हा मस्त एखादा कॉमेडी सिनेमा किंवा युट्युबवरचे विनोदी व्हिडीओ पाहावेत. यामुळे लवकरच चांगली झोप येऊ शकते.