इतिहासताज्या बातम्या

शंभूपुत्र थोरले शाहू महाराज ‘असे’ होते मुत्सद्दी! एकदा नक्की वाचा…

ज्यांच्या राजकारणातील मुत्सद्दीपणामुळे सारा हिंदुस्थान एका छत्राखाली आला, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा सूड ज्यांनी मोगलांच्या तख्ताधिशाला मारून पूर्ण केला. ज्यांनी तीन पेशव्यांना घडवले असे १८ मे १६८२ रोजी जन्मलेले स्वराज्याचे चौथे छत्रपती शंभूपुत्र शाहू महाराज ह्यांची आज ३४० वी जयंती.

आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी छत्रपती शाहूंच्या कार्याकडे दुर्लक्ष केले. केवळ मोगलांच्या कैदेत राहणारे आणि पेशवाई सुरू करणारे शाहू सर्वांना माहिती आहेत.

पण त्यांची बनवलेली ही प्रतिमा चुकीची आहे. कसे होते खरे शाहू, त्यांच्या मुत्सद्दीपणामुळे कोणत्या महत्वाच्या गोष्टी घडल्या. हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिला. तेव्हा येसूबाई साहेबांनी राजाराम महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबाला गडउतार होण्यास सांगितले. पण दुर्दैवाने येसूबाई व सात वर्षांचे शाहू मोगलांच्या कैदेत अडकले.

त्यांना नंतर दिल्लीला नेण्यात आले. महाराष्ट्रात ताराबाई राणीसाहेबांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवले होते. स्वराज्य बरखास्त झाले होते पण झुकले नव्हते. अनंत अडचणींचा सामना मराठ्यांनी केला होता. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुअज्जम हा दिल्लीकडे निघाला होता. तेव्हाच १७०७ मध्ये शाहू महाराजांची सुटका झाली. तेव्हा त्यांचे वय पंचवीस होते.

ते सुटले मात्र येसूबाईसाहेबांची सुटका अद्याप झालेली नव्हती. नंतर शाहू महाराष्ट्रात येताच ताराबाई राणीसाहेब आणि शाहू असे दोन गट पडले कोल्हापूर आणि सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. इथूनच सुरू झाला प्रवास छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा.

येसूबाईंची सुटका व शंभूराजांचा सूड घेणारे छत्रपती शाहू :

१७१८ मध्ये शाहू महाराजांनी मराठा सरदार तयार केले. दाभाडे, बाळाजी विश्वनाथ अशा उमद्या लोकांना सोबतीस १७००० ची फौज देऊन शाहू महाराजांनी दिल्लीला पाठवले.

तेव्हा फर्रुख्शियार हा बादशाह होता. येसूबाई मोगलांच्याच कैदेत असल्यामुळे मराठ्यांना आघाडीवर मोहिमा करता येत नव्हत्या. म्हणूनच मराठ्यांनी दिल्लीला वेढा घातला.

आता फर्रुख्शियार ह्याच्या विरोधात असणाऱ्या लोकांना शाहू महाराजांनी साताऱ्यात बसून जवळ केले होते. हसन हुसेन ह्या बंधूंना शाहू महाराजांनी मराठ्यांचा व फर्रुख्शियारचा मध्यस्थी नेमले. फर्रुख्शियारला अनेक संधी देण्यात आल्या मात्र त्याने ठरलेल्या सर्व बैठकी बाद केल्या.

अखेर शाहूंच्या आज्ञेप्रमाणे हसन हुसेन बंधूंनी फर्रुख्शियार ह्यास तख्तावरून खाली खेचले, साऱ्या किल्ल्यात मराठ्यांचे सैन्य जमा झाले होते. तेव्हा फर्रुख्शियारचे डोळे फोडण्यात आले व पुढे त्याचे मुंडके मारून त्यास यमसदनी धाडण्यात आले.

शाहू महाराजांनी साताऱ्यात बसून शंभूराजांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. पुढे त्यांनी येसूबाई साहेबांना देखील मुक्त केले व सर्व मंडळी महाराष्ट्र देशी परतले. चक्क एकाच वर्षात शाहू महाराजांनी दिल्लीचे तीन बादशाह एका मागोमाग बदलले होते.

ताराबाईंना आधार देणारे शाहू महाराज :

ह्यात शाहू महाराजांचे मन किती उदार होते हे दिसून येते. जेव्हा महाराष्ट्रात दोन गाद्या निर्माण झाल्या तेव्हा ताराबाई राणीसाहेबांना कोल्हापूर व शाहूंना सातारा मिळाले.

अर्थात स्वराज्यातील इतर प्रांतांची देखील वाटणी झाली. पण पुढे ताराबाई ह्यांना त्यांच्याच सवतीने अर्थात राजसबाई ह्यांनी कट करून अटकेत टाकले.

राजसबाईंनी स्वतःच्या पुत्राला संभाजी दुसरे ह्यांना छत्रपती केले व ताराबाई आणि ताराबाईंचा पुत्र शिवाजी दुसरे ह्यांना अटकेत टाकले.

शिवाजी दुसरे त्या दरम्यान वारले पण ताराबाईंना शाहू महाराजांनी अखेर पर्यंत आश्रय दिला. अगदी आईप्रमाणे त्यांची सेवा केली व दरबारी कामकाजात त्यांचा सल्ला घेत राज्य केले.

शाहू महाराजांचे प्रशासन :

शहाजी महाराजांनी व जिजाऊंनी स्वराज्य उभारणी केली. शिवरायांनी निर्मिती केली, संभाजी महाराजांनी रक्षण केले तसेच ताराबाई व राजाराम महाराजांनी देखील स्वराज्याच्या पडत्या काळात सर्वांना सावरले. हीच परंपरा शाहू महाराजांनी पुढे नेली.

त्यांच्याकडे सुटकेनंतर जमिनीचा छोटा प्रांत होता. तिथून अफगाण पर्यंत मराठ्यांचे साम्राज्य निर्माण करणारे केवळ शाहू महाराज होते. स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर शाहू महाराजांनीच केले. जवळपास ७५० पेक्षा जास्त सरदारांची फळी शाहू महाराजांनी निर्माण केली.

तसेच ३ पेशवे त्यांनीच नियुक्त केले. बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या नंतर बाजीराव व नंतर नानासाहेब असे हे पेशवे. बाजीरावांचे कार्य आहेच मोठे पण शाहूंनी बाजीरावांच्या उदयापूर्वीच मराठा साम्राज्य मोठे केले होते.

बाजीराव पेशवे व कान्होजी आंग्रे मोहिमेस असताना शाहू महाराज सतत त्यांना नियोजन व मोहिमेच्या सुत्रांबद्दल विचारत होते. अर्थात त्यांचे प्रशासनामध्ये चांगलेच लक्ष होते.

शाहू महाराज बायकांमध्ये राहिले, ते हळव्या मनाचे होते, त्यांनी पेशव्यांना स्वराज्य देऊन टाकले असे काहीही आरोप लोक करत असतात. पेशवाईचा कहर उत्तर काळात माजला. पण शाहू महाराजांचे वर्णन पोर्तुगीजांनी योग्य केले.

ते म्हणतात की शाहू महाराजांच्या अखत्यारीत अत्यंत कमी प्रांत होता. पण नंतर मात्र त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले.

जिथे जिथे शाहूंच्या घोड्यांच्या टापा पडल्या तिथे तिथे हिंदुस्थानाचा सीमा आखल्या गेल्या व खऱ्या हिंदुस्थानचा नकाशा तयार झाला.

हे पोर्तुगीजांनी केलेले वर्णन शाहू महाराजांच्या पराक्रमाबद्दल सारे काही सांगून जाते. इतिहासाच्या या पाऊलखुणा आपण जपल्या पाहिजेत. पहिल्या छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास सर्वांसमोर आला पाहिजे. त्यांच्या स्मृतीस शतश: अभिवादन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button