ही आहेत कोल्हापूरातील ‘दहा’ अपरिचित ऐतिहासिक स्थळं
कोल्हासुराचा वध करून अंबाबाई जिथं स्थिरावली ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर अध्यात्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. कोल्हापूरला बघण्यासारखं खूप काही आहे.
ऐतिहासिक गोष्टी धरल्या तर पन्हाळगड, विशाळगड, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबाचा डोंगर, शाहू पॅलेस इत्यादी गोष्टी लोक पाहायला येत असतात. पण अनेक ऐतिहासिक स्थळं अशी आहेत ज्या विषयी जास्त माहिती नसल्यामुळे पर्यटक तिथे जात नाही. या लेखामधून आपण कोल्हापुरातील अशाच दहा ऐतिहासिक स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.
कोल्हापुरात प्राचीन इतिहासाला देखील खूप महत्व आहे. रामलिंग हे त्याचेच उदाहरण आहे. हातकणंगले तालुक्यात हे प्राचीन मंदिर आहे. ह्या मंदिरामागची आख्यायिका अशी आहे की राम जेव्हा वनवासासाठी दक्षिणेत आले तेव्हा इथे येऊन त्यांनी महादेवाचे एक लिंग स्थापन केले.
त्याचेच नाव ह्या जागेला पडले. तसेच रामाने स्वतःकडील बाणाने इथे पाण्याचे झरे निर्माण केले. इथे शंभर वर्षापासून एक अग्निकुंडात अग्नी पेटती आहे. मंदिरात शिव, पार्वती, गणपती, वीरभद्र, विठ्ठल रुख्मिणी इत्यादी देव आहेत.
लक्ष्मी तलाव किंवा राधानगरी धरण हे राजर्षी शाहू महाराजांनी बांधले होते. भोगावती नदीवर हे धरण बांधल्याने कोल्हापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला होता. चांगले दगड, चुना आणि शिसं वापरून हे धरण बांधले होते. ह्याचे वैशिष्ट्य असे की ह्याला स्वयंचलित दरवाजे आहेत. आजही आपल्या देशातील धारणांना स्वयंचलित दरवाजे नाहीत.
पण शाहूमहाराजांच्या ह्या निर्णयामुळे धरण पूर्ण भरताच दरवाजे आपोआप उघडतात आणि त्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरु होतो. मग पाण्याचा स्तर कमी झाला की हे दरवाजे पुन्हा बंद होतात. यामुळे या धरणामुळे कोल्हापूरकरांना कोणताही धोका नाही आणि आज शंभर वर्षं हे धरण उभं आहे.
कोल्हापूर म्हटलं की किल्ले आलेच आणि किल्ल्यात पहिले नाव निघते ते पन्हाळगडाचे. पण कोल्हापुरात इतरही किल्ले आहेत. त्यातलाच एक म्हणजे रांगणा किल्ला. पूर्वी हा किल्ला अनेक राजवटींकडे होता. अनेक लढाया झाल्या आणि तो किल्ला आदिलशाहीत गेला.
शिवाजी महाराजांनी आपल्या राघूबा पंडित नावाच्या माणसाला धाडून किल्ला स्वराज्यात सामील करण्यास सांगितला. नंतर पुन्हा आदिलशाही सैनिकांनी किल्ल्यावर हल्ला केला. शिवराय आग्ऱ्यात असल्यामुळे स्वतः जिजाऊ आऊसाहेबांनी मोहीम काढून हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता. इतर किल्ल्यांना पाहण्यासाठी चढावे लागते. मात्र रांगणा पाहण्यासाठी आपल्याला डोंगर उतरून जावे लागते.
हा वाडा श्री महालक्ष्मी मंदिरा जवळच आहे. ह्या वाड्याचे महत्व अनेकांना माहिती नसल्याने इथे पर्यटक किंवा भक्तजन जात नाही. भोसल्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. पण कोल्हापुरात महालक्ष्मी असल्याने करवीर मधील भोसल्यांनी लक्ष्मीचा मान करत इथे भवानी मंदिर देखील बांधले.
हा राजवाडा पूर्वी कोल्हापूरच्या राजघराण्यातील लोकांसाठी बांधला होता. इथूनच न्यायनिवाडे व्हायचे. ह्या वाड्या बाहेरच भवानी मंडप आहे अर्थात प्रवेश द्वार. हा वाडा स्वातंत्र्य चाळवळी दरम्यान पण कामाला आला.
कोल्हापुरातील अजून एक अपरिचित किल्ला म्हणजे गगनगड. हा किल्ला गगनबावडा गावात आहे. कोकणात उतरलेला माल ह्या किल्ल्याजवळून जायचा म्हणून ह्या किल्ल्याला महत्व होते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला होता. गगनगिरी महाराज इथे तपश्चर्या करण्यासाठी यायचे म्हणून किल्ल्याचे महत्व धार्मिक दृष्टीने वाढले. किल्ल्यावर बुरुज, तोफा आणि मंदिरे देखील आहेत.
शालिनी ह्या कोल्हापूरचे छत्रपती दुसरे शहाजी ह्यांच्या कन्या होत्या. त्यांच्या नावाने हा राजवाडा बांधण्यात आला होता. नंतर ह्याचे तीन तारांकित हॉटेल बनवण्यात आले. पण नुकसान झाल्यामुळे हा वाडा आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे.
हा किल्ला दुसऱ्या भोज राजाने बांधला होता. आदिलशाहीकडून शिवरायांनी हा किल्ला जिंकला. ह्यावर हेमाडपंथी भैरवनाथाचे मंदिर आहे. दीपमाळा आहेत आणि दूधसागर तलाव देखील आहे.
सतीच्या विरहाने महादेव ह्या ठिकाणी आले आणि त्यांच्या रागामुळे ह्या स्थानाला कोपेश्वर म्हणतात. विष्णू समजूत काढण्यास आले म्हणून त्यांना धोपेश्वर म्हणतात. अशी आख्यायिका आहे. हे मंदिर सुंदर आहे. ह्याचे खांब अतिशय सुंदर आहेत. यादवांनी व शिलाहारांनी हे मंदिर बांधले होते.
शाहू महाराजांनी रोममधील ऑलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहिल्यानंतर त्यांना कुस्तीसाठी असे मैदान निर्माण करण्याची इच्छा झाली. जवळपास ३० हजार लोक भारतीय बैठकीत इथे बसू शकतात आणि कोणत्याही कोपऱ्यातून कुस्ती दिसते हेच ह्या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.
हे मंदिर गणपतीचे असून ह्या मंदिरात एकही खांब नाहीये. बिना खांबाचे मंदिर म्हणून बिनखांबी मंदिर असे मंदिराचे नाव आहे. आतमध्ये सुंदर गणपतीची मूर्ती आहे. कोल्हापुरात हे मंदिर प्रसिद्ध आहे.
अशा ह्या कोल्हापुरातील १० अपरिचित ऐतिहासिक जागा होत्या. कोल्हापुरात गेल्यावर इथे जायला विसरू नका.