हे आहेत आचार्य अत्रेंचे भन्नाट किस्से…
महाराष्ट्राला विनोदाचीही मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राला विनोदाचा वसा ज्यांनी दिला त्यांच्यापैकी आचार्य प्र.के.अत्रे हे नाव खूपच मोठं आहे.
अभिजात विनोद, प्रसंगनिष्ट विनोद, शब्दनिष्ट विनोद, कल्पनानिष्ट विनोद, विरोधाभासातून निर्माण होणारा विनोद, कलाटणी किंवा कडेलोटी विनोद, अतिशयोक्तीतून विनोद, विसंगतीतून विनोद असे हे विनोदाचे प्रकार आहेत.
आचार्य अत्रेंचे किस्से या प्रकारांसाठी वानगीदाखल देता येतील. आज आचार्य अत्र्यांची आठवण येण्याचं कारण म्हणजे आज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृतिदिन. १३ जून १९६९ रोजी अत्रे गेले तरी आज ५३ वर्षांनंतर सुद्धा त्यांचे वोनोड हास्याची एक लकेर देऊन जातात.
आचार्य अत्रे यांची खासियत म्हणजे हजरजबाबी आणि त्वरित विनोद. आज त्यांच्या स्मृती जागवताना त्यांच्या या अफलातून किश्यांची आठवण आवर्जून येते. त्यातीलच काही आता जाणून घेऊ.
◆ पुण्याच्या अँपी थिएटर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘कळ्यांचे नि:श्वास’ या मालतीताई बेडेकरांच्या पुस्तकावर चर्चा होणार होती ज्यात विद्यार्थ्यांसाठी आचार्य अत्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आचार्य अत्रे यांनी व्याख्यानास सुरुवात केली आणि ‘सभ्य गृहस्थ हो!’
असे म्हटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्यांने ‘ओऽऽओ’ असा जोरदार प्रतिसाद दिला. त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, ‘तुम्हाला नाही. मी सभ्य गृहस्थांना उद्देशून म्हटले होते.’ अशी हजरजबाबी, तात्काळ, सत्वर विनोदाची अनेक उदाहरणे खूप देता येतील.
◆ वक्त्याला बुचकळ्यात टाकणारे काही प्रेक्षक तसेच बेरकी असतात. एका सभेत एका श्रोत्याने काय हो, गाढवाच्या पाठीवर किती केस असतात? असे आचार्य अत्रे यांना विचारताच, “या व्यासपीठावर, तुमच्या पाठीवरचे मोजून सांगतो” म्हटल्यावर तो प्रेक्षक पळून गेला.
◆ आचार्य अत्रे पुण्यामध्ये राहत असताना एकदा काँग्रेसमधील तत्कालीन ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ त्यांना म्हणाले, “तुमच्या साहित्य संमेलनाला मी कधी येत नाही. मी साहित्य संमेलनाला का येत नाही विचारा.”
अत्रे : का बुवा येत नाही?
काका: तुमच्या त्या साहित्य संमेलनात सगळे डँबिस लोक असतात.
अत्रे : मग तेवढ्यासाठी तुम्हाला न येण्याचे कारण काय? इतक्या डँबिस लोकांमध्ये अजून एक आला तर बिघडलं कुठं?
◆ एकदा आचार्य अत्रे फर्ग्युसन कॉलेजची ड्युटी संपल्यावर सायकलवरुन घरी येण्यास निघाले. सायकल जेमतेमच होती. ब्रेक नाही, सीट कडक. आचार्य अत्रे सायकलवर बसून काव्य करण्याच्या तंद्रीत फर्ग्युसनच्या उतारावरुन लकडी पुलावरुन निघाले.
लकडी पुलाजवळ स्मशानभूमी आहे. राम बोलो, भाय राम राम बोलो, भाय राम असे बोलत एक स्मशानयात्रा चालली होती. आचार्य अत्रे त्यांच्या नादात होते. त्यांचा धक्का खांदेकऱ्यांना लागला व ताटीवरील प्रेत खाली पडले.
त्यावर “अहो, काही समजते की नाही? वेळ काय, प्रसंग काय? असे म्हणून खांदेकरी अत्रेंवर ओरडू लागले. त्यावर अत्रे, ‘ज्याला लागले तो काही बोलत नाही आणि तुम्ही काय ओरडताय,’ असे म्हटल्यावर गंभीर प्रसंगात देखील खांदेकरी हसू लागले.
◆ धिप्पाड शरीरयष्टीचे अत्रे एकदा पुण्याच्या पर्वतीवर पायऱ्या चढून चालले होते. थोड्याच वेळात त्यांना दम लागला आणि ते धापा टाकू लागले. हे पाहून एका पंचाहत्तर वर्षाच्या धडधाकट म्हाताऱ्याने त्यांना डिचवले,
अहो, काय हे अत्रे? चार वेळा पायऱ्या चढून उतरतोय अजुनही दोन वेळा चढून दाखवीन. काय द्याल मला? त्या म्हाताऱ्याचा आगाऊपणा झटकन उतरवीत अत्रे उत्तरले, “हा, देईन ना खांदा!” त्यावर आजुबाजूचे हसू लागले.
◆ स.का. पाटील संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक होते. ह्या सदोबा पाटलांची चेष्टा करण्याची एकही संधी आचार्य अत्रे सोडत नसत. ते नामदार होते. त्यांचा उल्लेख नेहमी नामदार सदोबा कान्होबा पाटील असा लांबलचक करण्याऐवजी नामदार स. का. पाटील असा करीत.
आचार्य अत्रे ‘नासका पाटील’ असा नेहमी उल्लेख करीत. सदोबा पाटलांनी मुंबई मराठी जनतेला मिळणार नाही अशी गर्जना केली होती. त्यामुळे आचार्य अत्रे यांचा सदोबांवर राग होता. आचार्य अत्रे एकदा म्हणाले,
“१३ ऑगस्टला मी जन्मलो. म्हणजे १३ ऑगस्टला विनोद जन्मला. १५ ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. १५ ऑगस्टला भारत जन्माला आला. या दोन चांगल्या गोष्टी झाल्या. पण १४ ऑगस्टला सदोबा पाटील जन्माला आले. दोन चांगल्या गोष्टीमध्ये एखादी वाईट गोष्ट होणारच.”
असे अत्र्यांचे एक से एक किस्से आहेत. आजही त्यांचे किस्से, त्यांचं साहित्य, त्यांची नाटकं यांच्यावर मराठी जन तितकंच प्रेम करतात. त्याच्या किश्श्यांतूनच नाही तर त्याच्या एकूणच साहित्यातून आणि चित्रपटातून नेहमीच वाचकांचं,
प्रेक्षकांचं ज्ञानरंजन आणि मनोरंजन केलं आणि आज त्यांच्या मागे सुद्धा त्यांच्या विपुल संपदेचा आपण लाभ घेतच आहोत. सतत विनोदाची मुक्त उधळण करणाऱ्या विनोद सम्राट आचार्य अत्रेंच्या स्मृतींस आजच्या दिवशी सादर वंदन!.!.!