कसा आणि का झाला शिवराजाभिषेक?
शिवरायांनी अथक परिश्रमाने उभे केलेले हे स्वराज्य आज पूर्णत्वास गेले होते. ६ जून १६७४ चा तो दिवस म्हणजे या स्वप्नपूर्तीचा दिवस. या दिवशी रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला होता. आज ह्या सुवर्ण दिवसाला तब्बल ३४८ वर्षं पूर्ण झालीत. पण हा राजाभिषेक कसा झाला? का झाला? त्याचे निष्पन्न काय? हे सारे आपण आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत.
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला..! असेच काहीसे वातावरण आजच्या दिवशी रायगडावर होते. चारशे वर्षांच्या काळरात्री नंतर आज स्वराज्याचा सूर्य उगवणार होता. दाही दिशा ह्या शुभ प्रसंगाची वाट पाहत होत्या. पण ह्या राजाभिषेकाविषयी एक प्रश्न अनेकांना पडतो तो असा की हा राजाभिषेक का झाला?
आधीपासून संपूर्ण रयत जर शिवरायांना राजा मानत होती मग इतका भव्य सोहळा कशासाठी? तर ह्याचे उत्तर असे आहे की पोर्तुगीज इंग्रज व इतर व्यापारी लोक महाराजांसोबत व्यवस्थित व्यापार संबंध ठेवत नव्हते. त्यांच्यासाठी शिवराय लुटारू होते. मात्र हा राजाभिषेक झाल्यानंतर शिवराय अधिकृत रित्या छत्रपती अर्थात चक्रवर्ती सम्राट झाले होते. तसेच दुसरे कारण होते धर्म व न्याय महाराजांच्या अखत्यारीत येणार होते.
ह्या राजाभिषेकामुळे राजांना नवीन कायदे करता येणार होते. ह्यापूर्वी पण कायदे निर्माण होत होते पण ते आता सर्वांना मानावेच लागणार होते. आणि विशेष म्हणजे मराठी जनतेला आणि भारतीय अर्थात एतद्देशीय लोकांना हक्काचे सिंहासन मिळणार होते. ह्या बादशाही लोकांना धडक देणारे हे एकमेव सिंहासन होते. म्हणूनच हा राजाभिषेक सोहळा झाला होता.
शिवरायांनी आपला राजाभिषेक रायगडावर केला. हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. हा राजाभिषेक विधी करणारे गागाभट काशी वरून आले होते. काही इतिहासकारांचे मत आहे की महाराष्ट्रातील ब्राह्मण पीठाने राजांच्या राजाभिषेकाला विरोध केल्यामुळे गागाभटांना बोलावण्यात आले होते. भारताने इतक्या वर्षांपासून स्वदेशीचा राजा पाहिला नव्हता.
त्यामुळे राजाभिषेक विधी लुप्त झाली होती. म्हणून गागाभटांनी शिवराजाभिषेक प्रयोग नामक पोथी लिहिली. हा सोहळा एक दिवसाचा नव्हता. त्या काळातील व्यवस्थेनुसार राजांना क्षत्रिय होणे महत्वाचे होते. म्हणून राजांची मुंज करण्यात आली. शिवरायांचे घराणे तसे मूळचे क्षत्रियच. आईकडून यादवांचे व वडिलांकडून सिसोद्यांचे वंशज असणारे शिवराय क्षत्रियच होते.
पण ब्रह्मवृंदाचा असा समज होता की मुसलमानी राजवट आल्यामुळे केवळ दोन वर्ण उरलेले आहेत. ते म्हणजे शूद्र आणि ब्राह्मण. म्हणूनच त्या काळातील तथाकथित लोकांना शिवराय शूद्र वाटायचे. ह्यावर उपाय केवळ मुंज होती. गागाभटांनी शिवरायांच्या पूर्वजांची यादी तयार करून घेतली. शिवराय क्षत्रिय असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही मुंज करण्यात आली.
मुंज केल्याने त्या काळातील इतर ब्राह्मणांच्या मनातील संशय दूर झाला. आता मुंज झाल्यानंतर लग्न करतात म्हणून राजांनी सोयरबाईंसोबत पुन्हा विवाह केला. नंतर राजांची सुवर्ण तुला करण्यात आली. अनेक पूजा करण्यात आल्या असा हा कार्यक्रम सहा दिवस चालला.
प्रत्येकाला दिसते ते केवळ बत्तीस मण सुवर्णसिंहासन आणि राजांचे वैभव. पण राजाभिषेकापूर्वी सहा दिवास राजांनी केवळ धोतर परिधान केले होते. केवळ एक वेळ जेवण करून आणि खाली जमिनीवर झोपून नियमांचे पालन केले होते. ह्याचा अर्थ असा की राजाने सिंहासनावर बसण्यापूर्वी रयतेचे दुःख भोगावे.
म्हणजे नंतर तो राजा रयतेला वस्त्र, निवारा आणि अन्न पुरवतो. हे व्रत महाराजांनी पूर्ण केले आणि ६ जूनच्या पहाटे राजांचा राजाभिषेक झाला. सप्तसिंधूच्या जलाचा राजांच्या मस्तकावर अभिषेक करण्यात आला. पंचामृताचा अभिषेक झाला.
अष्टप्रधान मंडळ विविध कलश हातात घेऊन उभे होते. मोर्चेल, अब्दागिरी, चौरी, माही मरातब असे विविध राजचिन्हे घेऊन तिथे लोक उभे होते. राजांनी पोशाख परिधान केला आणि नगारखान्यातून राजदरबारात प्रवेश केला.
मोठी घोषणा देण्यात आली. राजांना आपल्या आयुष्यातील दिव्य प्रसंग आठवले. आईवडिलांचे स्वप्न आठवले. पुढे दिसत होते बत्तीस मण सुवर्णसिंहासन. राजे त्या सिंहसनावर आरूढ झाले. हाती राजदंड घेतला. आता स्वराज्य सार्वभौम राज्य झाले होते.
नंतर अनेकांना नजराणे देण्यात आले. गर्विष्ठ इंग्रजी माना आज झुकल्या ह्या शिवमंदिरी. नंतर राजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. राजांनी जगदीश्वराचे दर्शन घेतले. तो सोहळा स्वर्गीय होता. प्रत्येक माणसासाठी तो सोहळा आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण ठरला होता.
हा राजाभिषेक केल्यानंतर राजांनी स्वतःच्या नावे शिवराई व होन नामक चलन चालू केले. शिवराजाभिषेक शक ह्याच दिवसापासून सुरू झाला. राजाभिषेक केवळ धर्मासाठी किंवा सत्तेसाठी नव्हता. तो होता रयतेच्या कल्याणासाठी. “पोटच्या पोरी प्रमाणे रयतेचे गोमटे करा,“ असे राजांचे शब्द होते. अर्थात आपल्या मुली प्रमाणे रयतेला काय हवे नको ते पहा.
ह्यातूनच ह्या राजाभिषेकाचे मर्म आपल्याला समजते. इतक्या बिकट परिस्थितीत आणि सर्वत्र बादशाही राज्य असताना राजे छत्रपती झाले होते हे सामान्य कार्य नव्हते. सभासद बखर म्हणते, “या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा असता मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.” म्हणूनच हा शिवराजाभिषेक अत्यंत महत्वाचा ठरला.
जया शिवराय!