इतिहासताज्या बातम्या

भारतावर या ‘तीन’ साम्राज्यांचा होता एकछत्री अंमल!

भारत एक अतिप्राचीन संस्कृती असलेला देश. भारताचे वैशिष्ट्य त्याच्या वैविध्यात आहे. एक परंपरा, एक भाषा, एक सण, एकच देव, एक रंग, एक पद्धत ह्या देशात नाही. ह्या वैविध्यामुळे इथे राज्य करणारे राजे देखील अनेक होऊन गेले. एक हाती सत्ता किंवा एकछत्री साम्राज्य क्वचितच ह्या देशात टिकले. इंग्रज आणि मोगलांनी भारतावर राज्य केलेच परंतु असे कोणते एतद्देशीय साम्राज्य होते ज्यांची भारतावर एकछत्री सत्ता राहिली ते पाहुया आजच्या लेखात.

१) मौर्य साम्राज्य :

मौर्य साम्राज्य हे चंद्रगुप्त मौर्य ह्यांनी स्थापन केले होते. साधारण ३२५ ते १८५ इसविसन पूर्व हा ह्या साम्राज्याचा काळ होता. नंद साम्राज्यामध्ये वाढणाऱ्या भ्रष्टाचाराला उत्तर देण्यासाठी चाणक्यांनी हे व्रत हाती घेतले होते. त्यांच्याच मार्गदर्शनात चंद्रगुप्त मौर्य ह्यांनी हे राज्य स्थापन केले. चाणक्यांची नीती आणि चंद्रगुप्ताचे सामर्थ्य ह्या साम्राज्यात होते.

पाटलीपुत्रला राजधानी बनवत हे राज्य निर्माण झाले होते. हेच पाटलीपुत्र आज आपण पटना म्हणून ओळखतो. बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत आणि पाकिस्तान अफगाणिस्तान पासून आंध्र प्रदेश पर्यंत हे साम्राज्य विस्तारले होते. ह्या साम्राज्यातले चंद्रगुप्त, बिंदूसार आणि अशोक हे सम्राट प्रसिद्ध आहेत. धर्माचा विचार करता चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला व अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला.

त्याच पद्धतीने ह्या राज्याचा स्तूप, लेण्या, विहार बांधण्यात आली. ह्या राज्याची प्रशासन पद्धत केंद्रीय पद्धतीची होती. अर्थात सारे सूत्र राजाकडून हलायचे. राज्यात कर अत्यंत जास्त प्रमाणात लावला गेला होता. मौर्य साम्राज्याचा व्यापार हा बाहेरच्या राज्यात देखील चालायचा. इतके महान असणारे हे साम्राज्य अंर्तकलहामुळे अस्ताला गेले. भ्रष्ट्राचारामुळेच हे राज्य संपले.

२) गुप्त साम्राज्य :

श्री चंद्रगुप्त ह्यांनी स्थापन केलेले हे गुप्त साम्राज्य इसविसन ३२० ते ५५० पर्यंत भारतात राहिले. ह्या राज्याची वैशिष्ट्ये होती कला, चित्र, साहित्य, विज्ञान इत्यादी विषयांमधील प्रगती. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे कालिदास ह्याच काळात होऊन गेले. जसा मौर्य साम्राज्यात बौद्ध धम्माचा प्रचार झाला तसा गुप्त साम्राज्यात हिंदू धर्म मोठा झाला.

मथुरा सारखी अनेक मंदिरे ह्या काळात बांधण्यात आली. मौर्यांच्या तुलनेत हे साम्राज्य कमी काळ होते. अर्थात सीमाभाग कमी असलेले हे साम्राज्य होते. तसेच ह्यांचे प्रशासन हे केंद्रीय नसून विभागलेले होते. जनतेकडून कर देखील कमी आकारण्यात यायचा. ह्या साम्राज्याचा व्यापार तसा भारतापुरताच मर्यादित राहिला. अखेर हे साम्राज्य बाहेरील आक्रमणामुळे अस्ताला गेले.

३) मराठा साम्राज्य :

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलले स्वराज्य ६ जून १६७४ ला सार्वभौम साम्राज्य झाले. पुढे संभाजी महाराजांनी इथे राज्य केले. राजाराम महाराजांनंतर शाहू महाराज छत्रपती झाले आणि तेव्हा पेशवाईचा उदय झाला. पेशवेपद आधीपासून होते पण बाजीरावांपासून पेशवाई मोठी झाली असे म्हणता येईल. हे साम्राज्य १८१८ पर्यंत राहिले.

हिंदू धर्म ह्या साम्राज्यामध्ये दिसला. शिवाय ह्या साम्राज्यात केंद्रीय व विभागीय अशा दोन्ही पद्धती दिसतात. छत्रपती हेच साम्राज्याचे मालक होते. पण तरी पुण्यात पेशवे, इंदोरला होळकर, ग्वाल्हेरला शिंदे असे हे साम्राज्य विस्तारले होते.

कर प्रणाली तशी पेशव्यांच्या काळात बरी होती पण इतर प्रांतातून गोळा केलेल्या चौथाईमुळे पानिपतावर मराठ्यांसाठी कोणीच धावून गेले नाही. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ह्या साम्राज्यात जातीयवाद अत्यंत टोकाला गेला. अंतर्कलह चालूच होते पण इंग्रजांचे देखील संकट ह्या साम्राज्यावर कोसळले. १८१८ ला हे साम्राज्य अस्ताला गेले.

अशी ही काही महत्त्वाची साम्राज्ये भारतात होऊन गेली. या व्यतिरिक्त अनेक साम्राज्ये उत्तर आणि दक्षिणेत झाली. पण ती साम्राज्ये एका विशिष्ट भूमर्यादे पलीकडे पोहोचली नाहीत. तुम्हाला अशा कोणत्या साम्राज्याविषयी माहिती असल्यास आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button