इतिहासताज्या बातम्या

शंभूराजे – दिलेरखानाची मैत्री होती एक राजकीय चाल!

दिलेरखानाला संभाजी महाराज जाऊन मिळाले होते, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण ह्या भेटीमागचे राजकारण काय होते? शंभुराजे खरोखर चिडून दिलेरखानाला जाऊन मिळाले होते की त्यामागे ही स्वराज्य हित होते? आजच्या लेखात ह्या दिलेरखान भेटीमागच्या राजकारणावर आपण प्रकाश टाकणार आहोत. ही भेट स्वराज्य हिताची कशी ठरली ते पाहुयात.

ह्या घटनेची पार्श्वभूमी आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावी लागेल. रायगडावर जेव्हा मंत्रीमंडळाने निर्णय घेत शंभुराजांना लांब ठेवण्यास शिवाजी महाराजांना सांगितले तेव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी शंभुराजांना श्रुंगारपूरला पाठवले होते. आता शिवरायांनी मंत्र्यांचे ऐकून नाही तर एका मोठ्या मोहिमेसाठी शंभुराजांना श्रुंगारपूरला पाठवले होते.

पण ही पाठवणी सरळ पद्धतीने न होता भांडण करून झाली. अर्थात हे नाटक होते. शंभुराजे आणि शिवराय भांडले म्हणजे सर्वांनाच त्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येणार होते. शिवराय आणि शंभूराजे यांच्यात हा तथाकथित बेबनाव झाला आणि शंभुराजे आपल्या सासुरवाडीला अर्थात श्रुंगारपूरला आले.

नंतर शिवराय देखील दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेत गेले. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की औरंगजेबाने आपल्या दिलेरखान नामक सरदाराला दक्षिणेत पाठवले होते. ह्याला काहीही करून थांबवणे महत्वाचे होते. इथूनच सुरू झाला गनिमी कावा..!

संभाजी महाराज श्रुंगारपूरला असताना दिलेरखानाचे त्यांना पत्र आले. अत्यंत मैत्रीपूर्वक लिहिलेले ते पत्र शंभुराजांना विनवित होते की, “राजे तुम्ही आम्हाला सामील व्हा आम्ही तुमचा योग्य आदर सत्कार करू. तुम्हाला होणारे त्रास इथे कमी होतील.” हे पत्र आले पण शंभुराजांनी पत्राकडे दुर्लक्ष केले. नंतर अनेक पत्रं येऊ लागली अखेर शंभुराजांनी ह्या मैत्रीला धुडकावले.

पण दिलेरखानाला काहीही करून शंभूराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचे होते. नंतर काही दिवसांनी शंभूराजांनी कलशाभिषेक करवून घेतला. शिवरायांच्या निरोगी व सुखी आयुष्यासाठी हा शाक्त पद्धतीचा अभिषेक शंभूराजांनी केला होता. हा अभिषेक मंत्र्यांना सहन झाला नाही. त्यांनी शिवरायांना पत्र धाडले. शंभुराजे स्वतःचा राजाभिषेक करवून घेतायत अशी अफवा पसरवली.

नंतर शंभुराजांनी तरुणांसाठी आखाडे उभे केले तर त्यांच्यावर फौज उभी केल्याचा आरोप झाला. दिलेरखानही हे सारे पाहत होता. त्याने पुन्हा पत्र धाडले तेव्हा शंभूराजांनी त्यास स्पष्ट सांगितले की, “आमचे आबासाहेब परमुलुखी असल्याने आम्ही येऊ शकणार नाही, तुमच्या मैत्रीबाबत आम्ही नंतर नक्की विचार करू.”

शिवराय नंतर महाराष्ट्रात आले. आता शंभुराजांची भेट घेण्याऐवजी शिवरायांनी शंभुराजांना थेट सज्जनगडावर जाण्यास सांगितले. तिथे रामदास स्वामी नव्हते. त्यामुळे शंभुराजांना सुधारण्यासाठी इथे पाठवले होते हे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. आता शिवराय महाराष्ट्रात आले म्हटल्यावर दिलेरखान आणि विजापूरचे सिद्दी मसूद व सर्जा खान एकत्र येणार होते हे स्पष्ट होते.

हे एकमेकांना सामील झाले तर स्वराज्याला धोका होता. आताच दक्षिणेतील युद्धाने थकून आलेले सैनिक कसा सामना करणार होते. ह्याचाच विचार करता शिवरायांनी हे राजकारण केले होते. आता हे स्पष्ट आहे की शंभूराजांना मोगलांना सामील व्हायचेच होते तर शिवराय दक्षिणेत असतांनाच व्हायला पाहिजे होते.

अखेर संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या गुप्त आदेशानुसार दिलेरखानाला सामील झाले. तिथे शंभूराजे असल्यामुळे दिलेरखान आणि सिद्दी मसूदची होणारी मैत्री होता होता राहिली. ज्याचा फायदा स्वराज्याला झाला. पुढे संभाजी राजांना ह्या दिलेरखानाने बहादूर गडावर ठेवले. अकरा महिने झाले तरी हाती काहीही लागत नाही म्हटल्यावर औरंगजेबाने दिलेरखानाला जाब विचारला. तेव्हा मात्र शंभुराजांना स्वराज्यावर हल्ला करावा लागला.

भुपालगड जिंकून शंभूराजांनी दिलेरखानास दिला. जो मराठ्यांनी पुन्हा १४ दिवसात जिंकला. असे चाललेले पाहून औरंगजेबाने शंभुराजांना कैद करण्याचे फरमान धाडले. तेव्हा शिवरायांनी शंभुराजांची तिथून सुटका करवून घेतली. आता शंभूराजे जर फितूर झाले असते तर शिवरायांनी त्यांना सोडवले असते का? त्यात नंतर शिवरायांनी शंभुराजांची भेट देखील घेतली होती. जो राजा फितुरांना शासन करतो.

ज्याच्या न्यायव्यवस्थेसमोर नातीगोती गृहीत धरली जात नाही. तो राजा शंभुराजांना केवळ मुलगा म्हणून माफ कसा करेल? त्यात शिवरायांना राजाराम नावाचे दुसरे पुत्र होते. मग शंभुराजांना जवळ करण्याचे कारण काय? ह्याचे उत्तर एकच की शंभुराजे फितूर नव्हतेच ते केवळ एक राजकारण होते.

मावळ्यांना आराम मिळवा, सिद्दी मसूदची आणि दिलेरखानाची मैत्री तोडावी आणि औरंगजेबाचा मुलगा शाहआलम यास फितूर करणे हाच ह्या राजकारणाचा उद्देश होता. आता जे संभाजी महाराज दिलेरखानाला फितूर झाले ते लगेच दहा वर्षांनी इतके महान बलिदान कसे देतील? असे काही प्रश्न स्पष्टपणे ह्या राजकारणाची कोडी उलगडण्यास मदत करतात.

अशीच खेळी शिवरायांनी नेतोजी पालकरांना खेळायला लावली होती. अगदी तेच शिवरायांनी शंभुराजांना करायला लावले होते. पण इतिहासकारांनी अनेक घटनांचा विपर्यास केला. शंभूराजांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या बायका देखील काही कारस्थानी इतिहासकारांनी उभ्या करून त्यांच्यावरून शंभूराजांच्या शीलावर शिंतोडे उडवले गेले.

मात्र त्यांच्या विरोधात खेळलेली खेळी लवकरच लक्षात आली आणि शंभुराजे प्रत्येक आरोपातून निर्दोष मुक्त होत गेले. शिवरायांनीही आपल्या या मुलावर विश्वासाने स्वराज्याची मोठी भिस्त ठेवली. शंभूराजांनी ती निष्ठेने पार पाडली. म्हणून तर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button