इतिहासताज्या बातम्या

अशी बंद केली शंभू राजांनी गुलाम विक्रीची पद्धत…

संभाजी राजे म्हणताच धाडस, पराक्रम, शौर्य असे गुण पुढे दिसतात. आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य अर्थात शिवरायांनी जो मार्ग दाखवला तेच आम्ही करू असे संभाजी महाराज म्हणतात. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या पातशाह्यांविरुद्ध शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले तेच संभाजी राजांनी पुढे चालवले. त्यातलाच एक किस्सा म्हणजे संभाजी राजांनी केलेली गुलामांची सुटका. मानवतेचे दर्शन घडवणारे शंभूराजे कसे होते हे पाहुयात आजच्या लेखात.

स्वराज्यात अनेक कष्टकरी होते पण त्यांच्या घामाला आणि अश्रूंना किंमत नव्हती. कारण ते गुलाम होते. शंभूराजांनी त्यांच्या मालकांकडून त्यांना विकत घेतले आणि त्यांना मुक्त केले. त्याचे झाले असे की सिद्दीकडे असणारा जंजिरा किल्ला शिवरायांना जिंकायचा होता.

पण ते शक्य झाले नाही. संभाजी महाराजांनी जेव्हा ही मोहीम हाती घेतली तेव्हा एक सूत्र त्यांनी ध्यानी घेतले, ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. ह्याच तत्वावर संभाजी राजांनी अरबी लोकांसोबत मैत्री करायचे ठरवले. जंगे-ए-खान हा अरबी सैन्याचा सेनाधीश. त्याला बोलावून शंभूराजांनी ह्या मोहिमेस सुरुवात केली होती. जंजिऱ्याच्या सिद्द्यांना हरवायचे म्हणजे उत्तम नाव, होड्या, जहाज, गलबते लागणार.

शिवाय जहाजांवर नवीन तोफा हव्यात, तसेच जहावरून उत्तम बाण मारणे, भाला फेक करणे असे प्रशिक्षण मावळ्यांना देणे गरजेचे होते. ह्या अरबी लोकांना गलबताचे चांगले ज्ञान होते. त्यासाठी ह्या जंग-ए-खानाला संभाजी राजांनी बोलावले होते. तो आला तेव्हा त्याची भेट घेऊन शंभूराजांनी त्याच्या जवळ असणारी जहाजे पाहण्याचे ठरवले.

त्याने देखील राजांना जहाजं दाखवली. आतील बाजूस कसे समान ठेवावे, कुठे काय असावे, तोफा कशा ठेवाव्यात ह्या विषयी चर्चा चालू असताना संभाजी राजांची नजर एका कोपऱ्यात गेली. तिथे काही लोक बसले होते. त्यांचे हात सुताने बांधलेले होते.

संभाजी राजांनी जंग-ए-खानाला विचारता त्याने सांगितले की हे तर गुलाम आहेत. हे ऐकताच संभाजी राजांनी जंग-ए-खानाला आदेश दिला ह्यांना आधी सोडावे. गुलामगिरी आम्हास मान्य नाही. हे लोक घाम गाळून काम करतात आणि त्याचा मोबदला देखील तुम्ही त्यांना देत नाही.

जंग-ए-खानाने ही गुलाम मंडळी दुसरीकडून विकत घेतली होती. त्यासाठी त्याने त्याचे पैसे खर्च केले होते. आता ह्या गुलामांना कसे सोडावे हा विचार तो करत होता. तोच शंभूराजांनी त्याच्याकडून सारे गुलाम विकत घेतले आणि त्यांना मुक्त केले.

माणुसकीला काळिमा फासणारी पद्धत स्वराज्याची नाही असे म्हणत संभाजी राजांनी साऱ्यांना सोडून दिले. हे सिद्दी, सामान्य लोकांना समुद्री मार्गाने पळवून नेतात पुढे इंग्रजांना विकतात आणि ही इंग्रज मंडळी हेच लोक गुलाम म्हणून परदेशी विकतात. ही साखळी आता शंभुराजांना मोडून काढायची होती.

संभाजी राजांनी असेच एकदा इंग्रजांसोबत तह करून गुलामांची सुटका केली होती. २६ एप्रिल १६८४ ला राजांनी इंग्रजांसोबत तह करत गुलामांना सोडवले होते. न सोडल्यास दंड आकारण्याची भाषा केली होती. ‘इतकेच असेल तर तुमच्या देशातून गुलाम आणावेत,’ असे बोल शंभूराजांनी त्यांना सुनावले होते.

शिवरायांनी देखील गुलाम विक्रीला विरोध केला होता. तोच विरोध आता संभाजी राजे करत होते. नुसता विरोध नाही तर संभाजी राजांनी कायदा केला होता. स्वराज्यात गुलाम विक्री खरेदीवर बंदी होती. लहान मुलांकडून काम करून घेण्यास मनाई होती. ह्या सर्व गोष्टी बघता शंभुराजांना गुलाम विक्री विरुद्ध किती चीड होती हे कळते.

ह्यामुळेच स्वराज्यात गुलामांची कधीही खरेदी विक्री होत नव्हती. शिवरायांनी व संभाजी राजांनी ती कधी होऊ दिली नाही. असे होते माणुसकी धर्म पाळणारे मानवतावादी शंभूराजे. ही कथा वाचून तुमच्या मनात असलेला शंभू राजांविषयीचा आदर द्विगुणीत झाला असेल ना! काय वाटलं नेमकं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button