विकासासाठी महत्वाचा महामार्ग ठरणारा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग आहे तरी कसा?
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याच्या नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. (How about the Nagpur to Mumbai Samruddhi Highway, which is an important highway for development?)
मोठं अंतर काही तासांमध्ये पार करता येणार असल्यामुळं रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे. मात्र नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांना जोडणारा रस्ता नाही, किंवा मुंबई ते नागपूर हे सातशे एक किलोमीटर अंतर अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचणार एवढेच या महामार्गाचे महत्त्व नाही.
तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अर्थपूर्ण रीतीने जोडला जाणार हे त्याचे महत्त्व आहे. तुम्हीही या वाटेनं येत्या काळात प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर सर्वप्रथम विकासासाठी महत्वाचा महामार्ग ठरणारा समद्धी महामार्ग आहे तरी कसा? तिथं तुम्हाला किती टोल भरावा लागणार आणि याचे वैशिष्ट्ये काय आहेत ? हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विदर्भ, मराठवाड्यातील मागास भागांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना समोर आणण्यात आली. पण खर सांगायचं तर दहा जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा मराठवाडा विदर्भ आणि खानदेश येथील जनजीवनात समृद्धी आणणारा महामार्ग असेल असं स्वप्न विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचं होतं.
देशमुखांनीच मुख्यमंत्री असताना या महामार्गाची कल्पना पहिल्यांदा मांडली आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्यक्षात आणली. ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
७०१ किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग असून. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचे अंतर १७ तासांवरून ७ ते ८ तासांवर येणार आहे. महामार्ग हा सहा पदरी असून मार्ग वर १५० कि.मी. वेगाने वाहन क्षमता असणार आहे. सध्या नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण झाला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून येत्या ११ डिसेंबर ला नागपूर येथून करण्यात येणार आहे.
उर्वरित १८१ कि.मी. महामार्ग हा पुढच्या ६ महिन्यात पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.आणि महत्वाचं सांगायचं झालं तर हा देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ११ लाख वृक्ष असणार आहे..राज्यातील १० जिल्ह्यातील, २६ तालुक्यातील ३९१ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.
महामार्गाला राज्यातील १४ जिल्हे पोर्टने जोडले जाणार तर. प्रतिदिवशी ३० ते ३५ हजार वाहने धावणार आहेत. या महामार्गामुळे अनेक पर्यटन स्थळं परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे आपोआपच पर्यटनाला चालना मिळेल. यामध्ये प्रामुख्याने लोणारचं सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव ,सेवाग्राम, शिर्डी दौलताबादचा किल्ला बीबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळं महामार्गाच्या नजीक येणार आहेत.
या मार्गावर ९ ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा आणि २० इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे. १८ कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार आहे. या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात १००० नवीन शेततळी उभारले जाणार आहेत.
समृद्धी महामार्गावर टोलनाक्यांमुळे वाहनांची गती रोखते असा अनुभव आहे.
हे लक्षात घेऊन नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर कुठल्याही प्रकारचे टोलनाके असणार नाहीत. मात्र या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या शहरांसाठी आगमन निर्गमन द्वारे आहेत. त्या ठिकाणी टोलनाके तयार करण्यात आले आहेत,असे एकूण २४ टोल नाके असणार आहेत. तर मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीच्या टप्प्यावरून पाच तासात प्रवास करण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना ९०० रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.
टोलसाठी नियमानुसार १.७३ रुपये प्रति किमी असे दर निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजे जितका प्रवास तितका टोल या तत्त्वावर टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यानुसार ५२० किमीच्या मार्गात १९ टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके १९ एक्झिट पॉइंटवर आहेत. आता काही भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी अंडरपासची देखील सोय करण्यात आली आहे.
कारण समृद्धी महामार्ग हा ३ अभयारण्यातून जाणार आहे. काटेपुर्णा , कारंजा , तेन्सा..म्हणून असे एकूण २०९ भुयारी मार्ग समृद्धी महामार्गवर आहेत. ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्री टेलिफोन बुथ प्रत्येक ५ कि.मी. अंतरावर असणार आहे. तसेच या संपूर्ण महामार्गाभोवती आर्थिक गतिविधीमुळे लाखो रोजगारहि निर्माण होण्याची शक्यता आहे.