इतिहासताज्या बातम्या

लुटेत आलेल्या परस्त्रीलाही शिवरायांनी कसे वागवले?

कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांनी सन्मानाने मागे पाठवून दिली ही कथा आपण आजवर अनेकदा ऐकली असेल. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला. स्त्री म्हणजे मराठ्यांसाठी लक्ष्मीचे रूप, तिची विटंबना महाराष्ट्र देशी होणे शक्यच नाही.

ह्याच तत्वावर शिवरायांनी सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली. ही कथा ऐकताना महाराजांविषयी असणारा आदर अधिकच वाढतो.

पण नेमके काय घडले होते? कोणी त्या सुनेला धरून आणले होते? ही कथा सत्य आहे की निव्वळ एक दंतकथा? ह्या कथेमधील काही समज गैरसमज आपण आजच्या लेखामधून दूर करण्याचा प्रयत्न करूयात.

त्या वेळेस कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद होता. शिवरायांनी एकीकडे जावळी जिंकून चंद्रराव मोऱ्यास ठार केले होते व रायगड सारख्या किल्ल्याचे बांधकाम देखील चालू केले होते. खर्च प्रचंड येत होता पण स्वराज्यात नवनवीन मुलुख सामील करावेच लागणार होते.

विजापूरचा आदिलशाह शेवटचे श्वास मोजत असतानाच मोठा मुलुख स्वराज्यात सामील केलेला बरा असा निर्धार करत शिवरायांनी मोठा प्रांत स्वराज्यात जोडला होता. त्याच दरम्यान राजांना खबर लागली की कल्याणचा सुभेदार मोठा खजिना घेऊन विजापूरला निघाला आहे.

आता शिवरायांनी मोठी मोहीम आखली होती. काहीही करून हा खजिना मिळवायचाच होता. म्हणून महाराज काही विश्वासू लोकांना घेऊन कल्याणच्या मार्गाने निघाले होते. राजांनी एक तुकडी पुढे पाठवली होती तिचे नेतृत्व आबाजी सोनदेव करत होते.

एकीकडे हा कल्याणचा सुभेदार आपल्या कुटुंबियांसोबत घाट पार करत होता. त्यात मुलं आणि सुनाही होत्या. सर्व बाजूंनी घनदाट जंगल, तरी सुभेदार तिथून प्रवास करत होता.

काही काळ भयाण शांतता होती पण नंतर मात्र मराठ्यांनी हर हर महादेवच्या घोषणा देत विजापुरी फौजेवर हल्ला चढवला होता.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विजापुरी सैन्य पळून गेले होते आणि मराठ्यांच्या हाती हा शाही खजिना लागला होता. तो खजिना घेत आबाजींनी भिवंडी व कल्याण काबीज केले.

शिवराय कल्याणला आले तेव्हा त्यांचे मोठ्या जल्लोषात लोकांनी स्वागत केले. राजांपुढे सारा खजिना पेश करण्यात आला.

अत्यंत मौल्यवान हिरे, माणके, विविध रत्न, सोने रूपे त्या खजिन्यात होते. आबाजी सोनदेवांनी इशारा केला आणि काही मावळे एक मेणा घेऊन दरबारात आले.

कल्याणच्या सुभेदाराची सून त्या मेण्यातून बाहेर आली. लुटीदरम्यान तिला देखील अटक झाली होती. आबाजी सोनदेवांनी महाराजांना सल्ला दिला की, “ही एक अत्यंत रूपवान स्त्री आहे. त्यात ती सुभेदाराची सून आहे.

तिला आपण नाटकशाळेत ठेवावे.” राजांना हे ऐकून अत्यंत राग आला. त्यांनी असे करण्यास नकार दिला. तेव्हा आबाजी सोनदेव म्हणाले, “महाराज, अहो ह्या पातशहांनी आपल्या आया बहिणी नागवल्या, बाटवल्या. आपण ह्यांचा सूड घेतलाच पाहिजे.” राजांसमोर आता तुकोबांचे शब्द येऊ लागले होते परस्त्री रखुमाई समान.

महाराज म्हणाले, “आबाजी, अहो ह्या पातशहांनी ऐसें केले म्हणून तर आपण हे ईश्वरीय राज्य निर्माण करत आहोत. ह्या सुभेदाराच्या सुनेला उचित मान करून पुन्हा माघारी पाठवा.”

महाराजांचा आदेश निघाला होता, अगदी तसेच करण्यात आले होते. शिवरायांनी महिलेचा आदर केला होता. स्वराज्यात महिला देवासमान होत्या.

आता शिवरायांच्या तोंडी काही जणांनी एक वाक्य घातले आहे ते म्हणजे अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.

अर्थात महाराज तिला म्हणाले होते की. आमची आई तुझ्यासारखी सुंदर असती तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. पण हे वाक्य निव्वळ ढोबळ वाटते. कितीही कुरूप असली तरी मुलाला आपली आई प्रिय असते.

त्यात समकालीन असणाऱ्या परमानंदाने जिजाऊंचे वर्णन करताना अत्यंत सुंदर रूपवान असल्याचे म्हटले आहे. आपल्या आईची बरोबरी आपण कोणाबरोबरही करत नाही. केवळ तुम्ही आम्हाला आईच्या जागी आहात असे म्हटले जाते. हेच महाराजांना अभिप्रेत असावे.

ही कथा खरी की खोटी ह्यावर एकमत नाहीय. पण ऐतिहासिक बखरींमध्ये ह्या कथेचा उल्लेख येतो. कथा खरी असो वा खोटी पण महाराजांनी स्त्रियांचा आदर नेहमीच केला हे आपल्याला त्यांच्या चरित्रातून स्पष्ट जाणवते. ह्या कथे विषयी तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button