हा आहे वैभवशाली जळगावचा गौरवशाली इतिहास…
महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथला इतिहास मोठ्या प्रमाणात प्रकाशात आलेला नाही. अर्थात आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आणि गावांचा इतिहास वाचणं ही आपली जबाबदारी असते.
या जिल्ह्यांमध्ये जळगाव असाच एक जिल्हा आहे जिथे थोरामोठ्यांचा जन्म झाला. जिथे इतिहास घडला पण आपण तो विस्मृतीत गेला.
आजच्या लेखातून ह्याच जळगाव मधील इतिहासाची आपण उजळणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं इथे काय घडलं? इथे कोणाचे राज्य होते? इथे किल्ले किती? मंदिरं कोणती होती? इथे कोणती घराणी नांदत होती? वाडे कसे होते? हे सर्व पाहुयात आजच्या लेखात.
जळगावला महाराष्ट्रात पूर्व खानदेश देखील म्हणतात. खानदेश हे नाव कसे पडले? ह्यावर मतमतांतरे आहे. काही इतिहासकारांच्या मते इथे मुसलमानी राजवट असताना खान ह्या पदवीमुळे ह्या प्रांताला खानदेश म्हणतात. तर महाभारतात असलेल्या उल्लेखाप्रमाणे खांडववन हा प्रांत होता ज्याचा अपभ्रंश खानदेश झाला.
ह्या नावामागे अजून एक कथा अशी आहे की भगवान कृष्णाच्या नावामुळे ह्याला खानदेश म्हणतात. अर्थात कृष्णाला कान्हा म्हणतात म्हणून कान्हादेश आणि त्याचाच अपभ्रंश खानदेश आहे. कथा वेगवेगळ्या असल्या तरी जळगाव मधील लोक अभिमानाने जय खानदेश म्हणायला विसरत नाही.
जळगाव अत्यंत समृद्ध असल्याने इथे अनेकांनी राज्य केले. पहिल्या तीन शतकांमध्ये तर इथे बौद्ध धर्मियांचे राज्य होते. नंतर इथे सातवाहनांनी राज्य केले.
हे सातवाहन अत्यंत पराक्रमी होते. ह्यांच्या नंतर चालुक्य आणि मग यादव अशी घराणी इथे राज्य करू लागली. अल्लाउद्दीन खिलजीने देखील हा प्रांत काबीज केला होता.
आणि तेव्हा पासून मुसलमानी आक्रमणे जळगाववर होत गेली. नंतर हा प्रांत निजामाच्या हाती होता त्यानंतर मात्र मराठ्यांचे राज्य आले व जळगाव मराठ्यांकडे गेले.
छत्रपती शाहू महाराजांनी दुर्गाजीराव भोईटेंना जळगाव प्रांत दिल्यानंतर भोईटे घराण्यानेच जळगाव शहर वसवले. त्यांचे वंशज तुळाजीराव भोईटे यांनी जळगावची भरभराट केली.
जळगाव जिल्ह्यातील प्राचीन मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहेत. ह्यात पद्मालय मंदिर अत्यंत सुंदर आहे. पद्म अर्थात कमळ आणि आलय म्हणजे निवास किंवा जागा.
ह्या मंदिराच्या बाहेर एक कुंड आहे त्यात मोठ्या प्रमाणात कमळाची फुलं फुलतात. ह्या फुलांमुळे मंदिराला वेगळीच शोभा येते.
असे म्हणतात की, हे मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले होते. नंतर अनेकदा ह्याचा जीर्णोद्धार झाला. ह्याविषयी एक पौराणिक कथा सांगण्यात येते. एकदा भीमाने बकासुराला मारल्यानंतर तहान लागली म्हणून एक तळे खोदले.
तेच तळे आज भीम कुंड म्हणून ओळखले जाते. उनपदेव म्हणून एका स्थळी गोमुखातून गरम पाणी येते. इथे गरम पाण्याचे झरे आहेत, हे आश्चर्य असले तरी इतिहासात ह्याचे उल्लेख सापडतात.
ह्याच प्रमाणे सुनपदेव आणि निझारदेवला देखील गरम पाण्याचे झरे आहेत. संत मुक्ताबाई आणि मनू देवीचे जळगावमध्ये मोठे मंदिर आहे. असा मंदिरांचा इतिहास जळगावने चांगला जपला आहे.
अमळनेरचा किल्ला इथे प्रसिद्ध आहे. जवळच तटबंदी व बुरुज आहेत. आताच्या काळात शहरीकरण झाल्याने किल्ल्याचे ऐतिहासिक दृश्य नजरेस पडत नाही.
चौगावचा किल्ला अत्यंत चांगल्या स्थितीत बघायला मिळतो. किल्ल्यावरचे द्वार, बालेकिल्ला, तळे, तट बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. कन्हेरगड, बहादरगड, पारोळा असे विविध किल्ले जळगाव जिल्ह्यात आहेत.
छत्रपती शाहू महाराजांनी भोईटे घराण्याला जळगाव प्रांत दिल्यानंतर त्यांच्यातील तुळाजीराव भोईटेंनी जळगाव शहर वसवले. इथे भोईटेंची गादी होती.
आज देखील भोईटे गढीमध्ये एक मोठा आणि प्रशस्त वाडा आहे. ह्यालाच भोईटेंची गादी म्हणतात. जळगावमध्ये ह्याच प्रमाणे पवारांची गढी देखील आहे. नगरदेवळामध्ये नगरदुर्ग म्हणून ह्या पवारांची गढी आहे.
जिथे साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, प्रतिभाताई पाटील, उज्वल निकम ह्यांच्या सारखे महानतम लोकांचा जन्म झाला त्या जळगावच्या भूमीचा इतिहास खरंच थोर आहे.
हा इतिहास जतन करून ठेवला तरच आपली संस्कृती अबाधित राहील. तुम्हाला जळगाव विषयी आणखी काही माहिती आहे का? तुम्हाला आणखी कोणत्या राज्याविषयी वाचायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा.