ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

हवामान खात्याचा अंदाज का चुकतो?

जूनचा महिना आला की शेतकऱ्यांच्या आणि सामान्य व्यक्तीच्या नजरा आभाळाकडे लागतात. वरुणराजा कधी बरसतो याकडे शेतकरी नजर लावून बसतात. त्यासाठी हवामान खात्याचा अंदाज महत्त्वाचा ठरतो.

पण पुष्कळदा हवामान खात्याचा अंदाज चुकीचा लागून शेतकरी त्रस्त होतो, सामान्य माणूस हवालदिल होतो. त्यामुळे हवामान अंदाजावर कितपत विश्वास ठेवायचा आणि तो घरबसल्या कसा बघायचा याची माहिती घेणार आहोत.

१) शेतकऱ्याचे नुकसान होते मग त्यांनी काय करायला हवे?

पुष्कळ वेळेस भरवश्याच्या म्हशीला टोणगा म्हणतात तसे हवामान खात्यांचा अंदाज चुकतो. यंदा बी बियाणे घेऊन ठेवायचे की नाही, खताच्या किती बॅगा लागतील याचा सारा हिशेब शेतकरी हवामान खात्याकडे पाहून करतो. मात्र त्यांचा अंदाज चुकल्याने शेतकरी गोंधळात पडतो, नुकसान झाल्याने त्रस्त होतो.

अशावेळी शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून सुरुवातीचे एक-दोन पाऊस झाल्याशिवाय पेरणीला हात घालू नये.

बियाणे आणि इतर खरेदी आधीच केल्यास व नंतर पावसाने दगा दिल्यास अतोनात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याने थोडे सबुरीने पावले उचलण्याची गरज आहे.

२) का चुकतो वेधशाळेचा अंदाज?

कधी कधी अशी शंका उपस्थित होते की कोणत्या बाबा लोकांचा मंत्र फुंकून तर हवामानखाते अंदाज सांगत नसेल. कारण पुष्कळ वेळा त्यांच्या अंदाजात प्रचंड तफावत दिसून येते.

२०१९ वर्षी हवामान खात्याने पाऊस कमी पडेल असे सांगितले असताना सरासरी १० टक्के पाऊस जास्तच पडला. पण हवामानाचा अंदाज सांगायला वेधशाळा का चुकत आहेत, त्यावर आपण प्रकाश टाकूया.

यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात सामान्यपणे पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

तर स्कायमेट या संस्थेने जून ते सप्टेंबर या काळात समाधानकारक पाऊस पडेल असे सांगितले आहे. दरवर्षी सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो.

तर यावर्षी ९०७ मिमी पडू शकतो असा अंदाज आहे. मुळात ही शक्यता खरी होईलच याची कोणतीही पोचपावती कोणाकडे नाही. कारण आपल्याकडील हवामानाचे अंदाज दीर्घ मुदतीचे आणि दीर्घ भूभागाचे असतात.

त्यातून पावसाची काढलेली सरासरी काहीच उपयोगाची नसते. आपल्याकडील वेध शाळांना छोट्या मुदतीचा आणि छोट्या भूभागाचा हवामान अंदाज सांगता येत नाही.

हवामान बदलाच्या काळात स्थानिक पातळीवर हवामानाचा अंदाज देण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या देशात पाऊस पडण्याच्या दोन तास आधी पाऊस येणार आहे असे सांगितले जाते.

परंतु ती प्रगत यंत्रणा भारतात उपलब्ध नाही आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी उपकरणे किंवा मॉडेल याची आपल्याला गरज आहे.

काही तज्ज्ञांच्या मते हवामान विभागाचा अंदाज हा अत्यंत ढोबळ असतो. भारतात सरासरी किती पाऊस पडेल याचा अंदाज तर यांना सांगता येतो परंतु महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यात किती पाऊस पडेल हे अंदाजात सांगितले जात नाही.

त्यामुळेच शेतकरी पावसाबद्दल अधिक गोंधळात पडतात. देशात चांगला पाऊस पडेल असे सर्वजण म्हणतात पण एखादा सोयाबीन, ज्वारी उत्पादक शेतकरी जर असेल तर पट्ट्यात किती पाऊस पडेल याचा सुद्धा अंदाज सांगितला जात नाही.

ज्यावेळी हवामान विभाग देशासाठी पूर्वानुमान वर्तवते तेव्हा दक्षिण भारत, ईशान्य भारत, मध्य भारत असे भाग गृहीत धरले जातात.

या अंदाजात अनेक कमी अधिक स्वरूपात एरर असता. त्यामुळे काही तज्ञांच्या मते जगात कोणतेच हवामान खाते अचूक अंदाज सांगू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भारतीय हवामान विभाग केंद्र स्थापन करण्याची गरज आहे.

३) हवामानाचा अंदाज कसा बघायचा?

हवामान अंदाज पाहणे आता केवळ काही सेकंदामध्ये शक्य आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा देशातील हवामानाचा मुख्य स्तोत्र मानला जातो. स्कायमेट ही सुद्धा हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्थासुद्धा हवामान बदल सांगते.

भारतीय हवामान विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर दररोज संध्याकाळी देशातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती दिली जाते. भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी विभागाच्या तसेच स्कायमेट या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते.

कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तिथेही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.

संकेत स्थळावर विविध भागांमध्ये ही माहिती दिली जाते.

संकेतस्थळावर हवामान बघताना तेथील आयकॉनमध्ये मोठी आपत्ती, वादळ काही येणार असेल तर तिथे वॉर्निग नावाचे सेक्शन दिसते. कुठे कुठे पाऊस पडेल, किंवा कुठे वातावरण सौम्य राहील, तापमान काय असेल, पावसाची शक्यता याबद्दल तारीख आणि विभागनिहाय माहिती दिलेली असते.

संकेतस्थळावरील नाऊकास्ट या सेक्शनमध्ये पुढच्या काही तासांत हवामानासंबंधी काही इशारा आहे का, याची जिल्हानिहाय आणि केंद्रानिहाय माहिती दिलेली असते.

तुमच्या राज्यातील तुमच्या जिल्ह्यात गेल्या काही तासांत किती पाऊस झाला, याची नोंद रेनफॉल इनफॉरमेशनमध्ये या आयकॉनमध्ये दिलेली असते. दिवसभरातील हवामान आणि पुढच्या काही तासांतील हवामानाचा अंदाज याचीही माहिती येथे सांगितली जाते.

तेव्हा कुठे प्रवासाला जात असताना वरील हवामान खात्याची माहिती घेऊनच पुढील नियोजन बनवा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button