औरंगजेबाने लावलेला निर्दयी जिझिया कर हा कसा होता? एकदा नक्की वाचा…
सध्या देशभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे. काही मोजक्याच लोकांचे म्हणणे आहे की त्या कबरीला फुलं वाहणे काहीही चुकीचे नाहीये. मात्र बहुतांश हिंदू व मुस्लिम लोक ह्या गोष्टीच्या विरोधात आहेत.
ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला, स्वकीयांचे राज्य निर्माण केले आणि हेच राज्य बुडवू पाहणाऱ्या औरंगजेबाला कसे आपण वंदन करू शकू? औरंगजेब कसा होता हे सर्व लोकांना माहिती आहेच.
आज काही मोजक्या लोकांची इच्छा नसली तरी इतिहास औरंगजेबाला निर्दयी, क्रूर, कपटी आणि वाईट असल्याचेच सांगतो.
ह्याचेच एक मोठे उदाहरण आहे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया कर. हा कर नेमका काय असतो, त्याचा इतिहास काय? औरंगजेबाने ह्या संबंधित काय केले व शिवरायांनी कोणती पाऊले उचलली आहे हे सारे काही आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
सर्वात आधी जिझिया कर काय होता हे पाहुयात. मुस्लिम राजवटी जसजशा जगात निर्माण होत गेल्या तसतशा काही कर्मठ मुसलमानांनी हा कर वापरात आणला. त्यांच्यानुसार मुसलमान सोडले तर सारे धर्म चुकीचे होते.
मुसलमान असणेच जगण्याचे सार आहे पण त्यासाठी ह्या काही कर्मठांनी मनाला वाटेल ते अत्याचार लोकांवर केले होते. मुसलमानेतरांना ह्या जगात जगण्याचा अधिकार नाही म्हणून केवळ दोन पर्याय दिले जायचे. एकतर धर्मांतर करावे किंवा मृत्यूस सामोरे जावे.
पण काही काळानंतर ह्या गोष्टी सांभाळणे व अंमलात आणणे कठीण गेले तेव्हा जन्म झाला जिझियाचा. हा कर केवळ हिंदूंवर नाही तर जे जे मुसलमानेतर आहे त्यांच्यावर लादला होता.
ह्यात कर घेऊन त्या उर्वरित धर्मियांना समाजामध्ये दुय्यम दर्जा दिल्या जायचा. त्यांनाच ‘जिम्मी’ असे म्हणतात. जिझिया कर केवळ पैश्यापुरता मर्यादित नसून त्यात अनेक गोष्टी होत्या.
जिझियाचे प्रारूप असे होते – मुसलमानेतरांनी धार्मिक स्थळे बांधायची नाहीत, जुने तुटलेले मंदिर पुन्हा बांधायचे नाही; मुसलमान लोक त्यांच्या यात्रेदरम्यान इतरांच्या मंदिरात राहू शकतील;
मुसलमान व्यक्ती गैरमुसलमानाच्या घरी ३ दिवस सहज म्हणून राहू शकतो; त्या तीन दिवसात त्याने केलेले काम गुन्हा मानला जाणार नाही;
मुसलमानेतरांनी कोणती सभा घेतली तर त्यात मुसलमान येऊ शकतात; इतरांनी आपल्या मुलामुलींची नावे मुसलमानांप्रमाणे ठेवायची नाहीत; इतरांनी मुसलमानांप्रमाणे कपडे घालायचे नाहीत; घोडा वापरायचा असेल तर त्याला लगाम व खोगीर लावायचे नाही;
धनुष्यबाण व तलवार चालवायची नाही; त्यांनी दारू प्यायची नाही व अंगठी देखील घालायची नाही; जुना पोशाख बदलायचा नाही; स्वतःचे सण उत्सव साजरे करायचे नाहीत;
इतकेच काय तर घरातील कोणाचे निधन झाले तर त्याचे प्रेत कब्रस्तानात आणायचे नाही; त्या व्यक्तीसाठी शोक करीत बसायचे नाही; हेरांना मदत करायची नाही व मुसलमान असणाऱ्या लोकांना स्वतःकडे नोकर म्हणून ठेवायचे नाही.
हा कर अकबराच्या काळात पण होता, त्याने तो काढून टाकला होता. त्याने तो कर हिंदूंच्या भावनेचा आदर करत काढला की बहुसंख्यांकांच्या दबावात काढला हा अभ्यासाचा विषय आहे. अकबराच्या दरबारात तसे अनेक लोक हिंदू होते.
त्यामुळे कदाचित अडचण आली असणार. शिवाय अकबर हिंदू मुसलमान असे भेद करत नव्हता असे काही जाणकार सांगतात. हा कदाचित त्याच गोष्टीचा परिणाम असू शकतो.
मात्र त्याचा पणतू औरंगजेब ह्याने हा कर पुनर्जीवित केला होता. ह्याच्या डोक्यात धर्मांधतेचे खुळ होतेच मुळी. तो स्वतःला आलमगीर म्हणवून घ्यायचा म्हणजेच आलम (संपूर्ण) दुनियचे राजा.
त्यात ‘आलमगीर जिंदा पिर’ अशी त्याची घोषणा सारे पगारी नोकर त्याच्या आनंदासाठी देत असायचे. ह्याने २ एप्रिल १६७९ ला हा कर लावण्यास सुरुवात केली होती. आचार्य गोपालदास ह्यांनी कर भरण्यास नकार दिल्याने त्यांना भर दरबारात ह्या औरंगजेबाने मारले होते.
शिवरायांना हे समजताच त्यांनी औरंगजेबास पत्र धाडले. काही इतिहासकार हे पत्र मानत नाहीत. मात्र त्यात शिवराय स्पष्टपणे औरंगजेबाला खडे बोल सुनावतात. तुम्ही हिंदूंवर कर लावला ह्याचा अर्थ तुमचा खजिना रिकामा झाला का?
असे म्हणत महाराजांनी औरंगजेबाला अकबराचे उदाहरण दिले. शिवाय एकाच देवाची आपण सारी लेकरे आहोत. कोणी बांग देतो तर कोणी घंटानाद करतो. ह्यांच्यात भेद केला तर त्या ईश्वराच्या निर्मितीवर डाग लावण्यासारखे आहे. असे ह्या पत्रात महाराजांनी म्हटले आहे.
पुढे मात्र हा कर औरंगजेबाच्या नातवाने जहाँदर शाह याने बंद केला. तसा ही ह्या कराचा फटका स्वराज्याला बसलाच नव्हता. त्यामुळे तो चालू असून बंद असल्यासारखाच होता.
मात्र ह्यातून औरंगजेबाच्या विकृतीचे दर्शन घडते. ह्याने केवळ हिंदूंना नाही तर मुसलमानांना देखील त्रास दिला होता. चक्क मुसलमानांच्या दाढीची लांबी मोजण्याकरिता ह्या औरंगजेबाने पगारी लोक ठेवले होते.
औरंगजेबाच्या कबरी पुढे डोकं टेकवणाऱ्यांवर त्या काळात अन्याय झाला असता तर कदाचित औरंगजेबाची कबर बांधायची माणुसकी सुद्धा कोणी दाखवली नसती.
पण आजच्या लोकांना औरंगजेब कसा होता हे माहित असून सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. आपलं यावर काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.