ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

सगळे चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? काय आहे यामागचं कारण…

“शुक्रवार येतोय गड्या, कुठला चित्रपट रिलीज होणार आहे बघून ठेव जरा आणि तिकीट पण काढून ठेव.” माझ्या मित्राला मी सांगत होते. आमच्या ऑफिसमध्ये शुक्रवार म्हटलं की, सगळ्यांची वीकेंडचा प्लॅन करण्याची धामधूम चालू होते.

त्यात मला चित्रपट पाहण्याची जाम आवड. त्यामुळे शुक्रवार आला आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला नाही, असं क्वचितच होतं.

तसं हे शुक्रवार आणि चित्रपट रिलीज होणं यांचं एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन असावं? आठवड्यातील सगळे वार सोडून हे चित्रपट नेहमी शुक्रवारीच का प्रदर्शित होत असावेत? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजचा हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे.

आपण भारतीयांनी तशा बऱ्याच गोष्टी या हॉलिवूड मधून घेतल्या आहेत. त्यांचे अनुकरण करण्याच्या नादात ही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्याची पद्धत सुद्धा सुटली नाही. हॉलिवूडमध्ये १९३९ रोजी ‘गॉन विथ द वाइंड’ (Gone with the wind) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

परंतू एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाचा प्रीमियर दाखवण्याची तिथे पद्धत होती. म्हणून शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पायंडा पाडला गेला आणि तेव्हापासून ही बाब सगळीकडेच लक्षणीय ठरली. ज्याचे भारतीयांनी अनुकरण केले.

अगदी १९३९ पासूनच भारतात शुक्रवारी चित्रपट दाखवण्याची प्रथा चालू झाली असे नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘नील कमल’ हा चित्रपट सोमवार दिनांक २४ मार्च १९४७ रोजी रिलीज करण्यात आला होता.

त्याकाळात भारतात शुक्रवारसाठी हट्ट किंवा तारखेवरून वाद देखील होत नव्हते. मात्र १९५० च्या अखेरीस भारतात ‘मुगल-ए-आजम’ प्रदर्शित झाला, ज्याला भरघोस यश मिळालं.

खरं तर, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवार निवडण्याचं संपूर्ण कारण हे आर्थिक फायद्यासाठी आहे आणि हे कारण त्या चित्रपटाच्यावेळी निर्मात्यांना उमगलं.

चित्रपटातील प्रत्येकाची चित्रपटाकडून वेगवेगळी अपेक्षा असते. कलाकारांना प्रसिद्ध हवी असते, प्रेक्षकांना मनोरंजन हवं असतं तर निर्मात्यांना आर्थिक नफा. त्यामुळे आपला आर्थिक नफा मिळविण्यासाठी निर्मात्यांनी शुक्रवारला पसंती दिली. शिवाय हिंदू धर्मात शुक्रवार हा लक्ष्मीचा वार मानला जातो.

शेवटी पैसा बोलता है, हे यावरून सिद्ध होते. चित्रपट निर्मात्यांकडे सगळे बजेट असते. त्यामुळे त्यांच्यासाठी शुक्रवार हा श्रध्देचा वार झाला. निर्माता असो वा कोणताही व्यावसायिक, प्रत्येकाकडूनच लक्ष्मीदेवीची आराधना केली जाते.

कारण देवीच्याच आशिर्वादाने व्यवसायात भरभरटात येते, यावर अनेकांचा दृढ विश्वास असतो. या दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.

केवळ चित्रपट प्रदर्शनच नाही, तर चित्रपटाची शुटींग सुरु करण्याचा मुहूर्त देखील शुक्रवार बघूनच निश्चित केला जातो. जेणेकरून चित्रपटाचं शुटींग निर्विघ्नपणे पार पडावं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. शिवाय यामागे एक व्यवसायिक कारण देखील दडले आहे.

सध्या मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्याचं भारी वेड आहे. मल्टीप्लेक्समध्ये फिल्म स्क्रीनिंगची फी शुक्रवार वगळता इतर दिवशी जास्त असते. त्यामुळे साहजिक आपला व्यावसायिक फायदा लक्षात घेऊन चित्रपट निर्माते शुक्रवारीच चित्रपट रिलीज करतात.

चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित व्हायला हवेत, असा काही बंधनकारक नियम नाही. कारण सलमान खान आपले चित्रपट ईदच्या दिवशी मग तो कोणत्याही वारी येऊ प्रदर्शित करतोच. शिवाय २०१६ साली इरू मगन हा चित्रपट गुरुवारी दाखवण्यात आला.

इतकंच काय अभिनेता अमीर खान याने मुख्य भूमिका साकारलेला ‘रंग दे बसंती’ हा देशभक्तीपर चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित झाला.

शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्यामागे अध्यात्मिक, आर्थिक, मनोरंजनपूर्ण कारणे असली तरी शेवटी ज्याला जेव्हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तो करू शकतो.

आता तुम्हां सगळ्यांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. पण अजूनही अनेकांना याचं उत्तर माहिती नसेल तर हे उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत हा लेख पोहचवा आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला तेही जरूर सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button