इतिहासताज्या बातम्या

राजमाता जिजाऊंकडून शिकावेत हे ‘आठ’ गुण…

राजमाता जिजाऊ आईसाहेब म्हणजे शिवरायांचे सर्वस्व. ज्या माऊलीने ह्या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिलेत आणि सर्वांवर संस्कार करत मराठी भूमी राखली त्या आऊसाहेबांची आज पुण्यतिथी आहे. शिवरायांचा राजाभिषेक झाला आणि अकरा दिवसांनंतर १७ जून १६७४ ला जिजाऊ रायगडच्या पायथ्याला असणाऱ्या पाचाडच्या वाड्यात निर्वाणीस गेल्या.

स्वराज्य पोरकं झालं होतं. शिवराय जन्मावे वाटत असतील तर आधी जिजाऊ जन्मली पाहिजे. जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे ते आजच्या लेखात पाहुयात.

१) नवनिर्मिती करणाऱ्या कार्यक्षम जिजाऊ:

स्वराज्य आणायचे, रयत सुखी करून सोडायची हे व्रत हाती घेतलेल्या जिजाऊंचे लक्ष सर्वात पहिले गेले पुण्याकडे. मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला. पहार ठोकली त्यावर चपलांचा हार घातला. जो ही भूमी कसेल त्याचा निर्वंश होईल असा शाप देखील दिला.

याच पुण्याची जहागिरी शिवरायांच्या नावावर होती म्हणून जिजाऊंनी बाल शिवबांना सोबतीला घेत सोन्याचा नांगर फिरवण्याचा निश्चय केला. पुणं पुन्हा वसवायचं ह्या हेतूने जिजाऊंनी बाल शिवबांकडून सोन्याचा नांगर फिरवला; तीच नवनिर्मितीची पहिली पायरी होती.

काहीही नसताना नवनिर्मितीकडे जाण्याचा तो मार्ग होता. पण काही ग्रामजोशींनी त्याला विरोध केला. तुमचा वंश बुडेल असे सांगत जिजाऊंना थांबवले. पण व्हायचा तो होऊ द्या वंशाचा नाश, ह्या रयतेचा नाश होऊ देणार नाही असे म्हणत जिजाऊंनी तत्क्षणी निर्णय घेत आपल्यातील निर्णयक्षमता दाखवली.

२) लढाऊ आणि शूर जिजाऊ:

जिजामाता अत्यंत शूर होत्या. त्यांचे शौर्यच शिवरायात मुरले. शिवराय पन्हाळगडावर असताना जिजाऊंनी राजगड लढवला. शिवराय आग्र्याला गेले असताना रांगणा किल्ला जिजाऊंनी स्वारी करत जिंकला.

ही लढाऊ वृत्ती नक्कीच त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. वेळ पडली तर न्यायासाठी सर्वशक्तीनिशी लढा देऊन शत्रूला नामोहरम करावे जिजाऊंकडून शिकावे.

३) निःपक्षपाती जिजाऊ:

जिजाऊंनी न्यायव्यवस्था अतिशय योग्यरित्या हाताळली होती. शिवरायांना हा देखील गुण जिजाऊंकडून मिळाला. दादोजी कोंडदेवांनी एकदा असाच चालता बोलता निवडा केला तर त्यांना जिजाऊंनी औपचारिक पद्धतीची गोतसभा भरवायला सांगितली.

तसेच चालू असणारा इनाम शिवरायांनी बंद केला तेव्हा तो पुन्हा चालू करत जिजाऊंनी सांगितले, चिरंजीव राजेश्री सीउबाचे खुर्दखताचा उजर न करणे/ अर्थात शिवबांचा निर्णय आता पाळू नका. ह्याचा अर्थ वेळ प्रसंगी जिजाऊ शिवरायांचे सुद्धा निवाडे बदलत असायच्या. त्यांचे निःपक्षपाती स्वरूप ह्यातून स्पष्ट होते.

४) बचत करणाऱ्या जिजाऊ:

बचत केली तरच अर्थकारण सिद्धीस जाते व इप्सित पुरे होते आणि राज्य करायचे म्हणजे बचत आलीच. जिजाऊंचे निधन झाले आणि काही दिवसांनी महाराजांना पाचाडच्या वाड्यात २५ लक्ष इतकी संपत्ती सापडली. खाजगी खर्चातून बचत करत आऊसाहेबांनी ही संपत्ती स्वराज्यासाठी ठेवली होती. ह्या बचतीचा राजांना खूप मोठा फायदा झाला.

५) कणखर जिजाऊ:

लढणे महत्वाचे असतेच पण त्यासाठी लागतो तो करारी बाणा आणि कणखर वृत्ती. जिजाऊंचे भाऊ व वडील निजामाने मारले. थोरले पुत्र संभाजींना अफझलखानाने मारले. तशीच शहाजी राजांची अफझलखानाने धिंड काढली.

इतके होऊन देखील शिवबांना खानाला मारण्यास पाठवणे कणखरतेचे स्वरूप होते. शिवराय पन्हाळगडी अडकले तेव्हा शिरस्त्राण व चिलखत चढवून हाती तलवार व पट्टा घेऊन जिजाऊ वेढा फोडायला निघाल्या होत्या. ही कणखर वृत्ती आयुष्यात नसेल तर आपण नेहमीच भरडले जाऊ.

६) सामाजिक जवाबदारी पाळणाऱ्या जिजाऊ:

समाजाप्रती प्रत्येकाचे देणे असते आणि समाजाला धरून राहिले पाहिजे हे आपण जाणतोच. जिजाऊंनी देखील गोरगरिबांच्या घरी जाऊन माणसे जोडली. शिवबांची आठ लग्ने करण्यामागे समाज एकत्र करण्याचाच उद्देश होता. सामाजिक भान जपत जिजाऊंनी ह्याच समाजाला एकत्र केले होते.

७) जिजाऊंचे संभाषण कौशल्य:

जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारत सांगितले. अनेक कथा सांगितल्या. काही पुराणकालीन तर काही त्यांच्या वडिलांच्या. कथा संगण्यातून शिवराय व पर्यायाने मावळे घडत होते. जिजाऊंच्या शब्दाखतर इतके लोक जमा झाले.

त्या काळातल्या व्यवस्थेप्रमाणे नवरा लांब असून जिजाऊंनी सारा प्रपंच एका हाताने केला. त्यांच्या संभाषणामुळे शिवराय तर घडलेच पण मावळे, रयत, पोरी बाळी साऱ्याच घडल्या. शहाजीराजांच्या तलवारीला घाबरावे आणि जिजाऊंच्या जिभेला असे लोक म्हणायचे. अर्थात कुठे काय बोलायचे नि कोणत्या प्रकारे बोलायचे हे जिजाऊंनी आपल्याला दाखवून दिले आहे.

८) शिक्षिकेच्या स्वरूपात जिजाऊ:

शिवरायांना जिजाऊंनी अनेक गोष्टी शिकवल्या हे आपण जाणतोच. पण त्या आधी त्या गोष्टी जिजाऊ देखील शिकल्या होत्या. शस्त्र, शास्त्र, राजकारण, न्यायनिवाडे इत्यादी गोष्टी त्यांनी शिवरायांना शिकवल्या. अनुभवातून त्यांनी राजांना मार्गदर्शन केले.

शहाजी राजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड दिले नि स्वराज्याचे प्रयत्न असफल ठरले. ह्या अनुभवातून त्यांनी एका वेळी एक शत्रू हे धोरण शिवबांना शिकवले. अशा शिक्षिकेचा गुण जिजाऊ आपल्याला दाखवून देतात.

आऊसाहेबांच्या नावातुनच शिकण्यासारखे खूप आहे जि– जिज्ञासा, जा– जागरूकता आणि – उत्कर्ष. जिज्ञासा राखत जागरूकता ठेवली की उत्कर्ष होतोच. म्हणून जिजाऊ महान ठरतात. अशा या माऊलीच्या ३४८ व्या स्मृतीदिनी त्यांना मानाचा मुजरा!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button