इतिहासजरा हटकेताज्या बातम्या

बिपिनचंद्र पाल ह्यांच्या काही ‘अपरिचित’ गोष्टी! एकदा नक्की वाचा…

इतिहास हा अनेकांना अवघड वाटणारा विषय पण भारतीय स्वातंत्र्याचा काळ केवळ आपला इतिहास नसून ती आपली अस्मिता आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले, त्यांनी आपापल्या परीने ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला.

तेव्हा कुठे १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. लाल बाल पाल हे नाव अनेकांनी ऐकलेले असेल. त्यातले पाल म्हणजेच बिपिनचंद्र पाल ह्यांची आज पुण्यतिथी आहे. २० मे १९३२ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

बिपिनचंद्र पाल केवळ एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते असे आपल्याला वाटते पण आजच्या लेखामधून जाणून घेऊ महान क्रांतीकारक बिपिनचंद्र पाल ह्यांच्या अपरिचित गोष्टींबद्दल.

बिपिनचंद्र पाल यांचे सुरुवातीचे आयुष्य :

भारतीय स्वातंत्र्यसैनिक बिपिनचंद्र पाल ह्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ ला आता असणाऱ्या बांगलादेश मधील पॉईल इथे झाला. त्यांचे वडील रामचंद्रपाल हे प्रगत विचारांचे होते.

त्यांनी मुलांना पाश्चात्य शिक्षण घेण्यास अनुमती त्या काळात दिली होती. बिपिनचंद्र पाल ह्यांचे शिक्षण व्यवस्थित झाले व नंतर ते काही काळासाठी शिक्षक म्हणून नोकरीस लागले.

महान क्रांतिकारक लाल-बाल-पाल ह्यांचे त्रिकुट :

आपण लाल-बाल-पाल हे नाव एकत्रपणे अनेक ठिकाणी वाचले वा ऐकले असेल. ह्या नावात तीन स्वातंत्र्यसैनिकांची नावे आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल. हे तिन्ही स्वातंत्र्य सेनानी सशस्त्र क्रांतीला मानणारे होते. इंग्रजांना शांततेत सांगून ते देश सोडणार नाहीत.

म्हणून आपण त्यांची आर्थिक व राजकीय कोंडी केलीच पाहिजे असे ह्या महान क्रांतिकारकांचे विचार होते. स्वराज्य आणि स्वदेशी हे दोन मंत्र त्यांनी भारतीयांना दिले होते. भारतीय लोकांचे उत्पन्न बंद झाले होते.

कारण भारतीय व्यवसायांची जागा आता इंग्रजांनी घेतली होती. म्हणूनच ह्या त्रिकुटाने इंग्रजी वस्तूंवर बहिष्कार घातला व स्वदेशी मोहीम चालू करून भारतीयांचा विचार केला. स्वदेशी वस्तूंच्या समर्थनामुळे सामान्य लोकांच्या उत्पन्नाचे प्रश्न मिटले होते.

बिपिनचंद्र पाल ह्यांचे सामाजिक कार्य :

केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हे तर बिपिनचंद्र पाल हे समाजसुधारक व समाजसेवक पण होते. त्यांनी तब्बल ४८ तास वकिलीचे काम करून कामगार लोकांचा पगार वाढवला होता. सामान्य लोकांना शिकता यावे त्यांची प्रगती व्हावी म्हणून बिपिनचंद्र पाल नेहमी कार्यरत राहिले.

ज्या काळात विधवा स्त्रियांना कुठेही जाण्यास बंदी होती, त्यांच्यावर बंधने होती त्या काळात बिपिनचंद्र ह्यांनी एका विधवा स्त्रीसोबत विवाह केला होता. कोणा मोठ्या व्यक्तीस विरोध करायची वेळ आली तेव्हा देखील ते मागे हटले नाहीत. गांधीजींचे कार्य मॅजिक अर्थात जादूवर चालते तर आमचे कार्य लॉजिक म्हणजेच तर्कशुद्धतेवर चालते असे ते म्हणायचे.

बिपिनचंद्र पाल ह्यांची पत्रकारिता व लिखाण :

स्वातंत्र्यसैनिक केवळ हातात शस्त्र घेत नसतो तर तो समाजाला देखील प्रगत बनवत असतो. अर्थात जे स्वातंत्र्याचे कार्य आहे त्यासाठी समाज तयार करणे गरजेचे असते. हेच काम बिपिनचंद्र पाल ह्यांनी केलेले दिसते. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी अनेक मासिकं व वर्तमानपत्रं काढली.

वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी ‘परिदर्शक’ प्रकाशित केले तर पुढे वंदे मातरम, स्वराज अशी वर्तमानपत्रे सुरू केली. ते लंडनला असताना स्वराज वर्तमानपत्र चालू होते. मात्र मदनलाल धिंग्रा ह्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याला मारल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली व स्वराज हे वर्तमानपत्र बंद करावे लागले. तरी ते लिखाण करत गेले.

चीनमध्ये होत असलेले बदल आणि भौगोलिकदृष्टीने भारताची होणारी हानी त्यांनी खूप आधी लिहून ठेवली होती. आपल्या लिखाणाचा वापर करत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिक कसा असतो हे उदाहरण प्रस्थापित केले होते.

बिपिनचंद्र पाल आणि विविध संस्था :

बिपिनचंद्र पाल हे महान क्रांतिकारक होते. त्यामुळे त्यांना विविध पक्षातून व संस्थांमधून बोलावणे यायचे. देशाच्या हितासाठी व स्वतःचे विचार जपण्यासाठी त्यांनी अनेक संस्थांमध्ये कार्य केले. काँग्रेसमध्ये तर ते होतेच पण सोबतच ‘होम रुल लीग’चे देखील ते सदस्य होते.

अ‍ॅनी बेझंट व टिळकांनी सुरु केलेली ‘होम रुल लीग’ भारतात मोठे कार्य करीत होती. त्याचेच सभासद होऊन बिपिनचंद्र पाल ह्यांनी देशासाठी कार्य केले. ह्या संस्थे प्रमाणे ब्राह्मो समाजाकडे देखील बिपिनचंद्र पाल वळले. आपल्यातील सर्व कला कौशल्ये त्यांनी विविध क्षेत्रात वापरलेली दिसतात.

बिपिनचंद्र पाल ह्यांची गुणवैशिष्ट्ये :

बिपिनचंद्र पाल हे सुरुवातीला शिक्षक होते. तसेच एक पत्रकार, समाजसुधारक, क्रांतिकारक, लेखक, पत्रकार असे विविध पैलू त्यांच्यात होते. त्यांचा आवज पहाडी होता, असे म्हणतात. स्वराज्य मिळावे पण भारतीय लोकांची ते स्वीकारण्याची मनःस्थिती झाल्यानंतरच असे विचार त्यांनी मांडले. त्यांना “फादर ऑफ इंडियन रिवोल्यूशनरी थॉट्स” अर्थात क्रांतिकारी विचारांचे जनक म्हणतात.

असे विविध गुण जपत भारत स्वतंत्र व्हावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करणारे बिपिनचंद्र पाल वयाच्या ७३ व्या वर्षी कलकत्त्यात २० मे १९३२ ला निधन पावले. आज बरोबर ९० वर्षे होऊनही बिपीनचंद्र पाल यांचे विचार आजही सुसंगत आहेत. त्यांच्या स्मृतीदिनी आपण त्यांच्या प्रमाणे सर्वच स्वातंत्र्य सैनिकांना शतश: सादर नमन करूया…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button