ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

राजकारणातील घोडेबाजार म्हणजे काय?

राज्यसभा, विधानपरिषद, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचं पद या सर्व पदांच्या निवडणुकीदरम्यान अनेक राजकारण्यांच्या तोंडी आपल्याला घोडेबाजार हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो.

पण घोडेबाजार म्हणजे नेमकं काय, हे आजवर अनेकांना माहित नाही. आजच्या लेखात आपण घोडेबाजार म्हणजे नेमकं काय, राजकारणात याचा काय अर्थ आहे, हा शब्द कुठून आला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

घोडे बाजार म्हणजे काय ?

घोडे बाजाराचा साधारण अर्थ हा घोड्यांचा बाजार असाच आहे. केंब्रिज डिक्शनरीमध्ये याला हॉर्स ट्रेडिंग असं म्हंटल गेलं आहे. घोडे बाजारात घोड्यांची खरेदी-विक्री केली जाते.

घोडे बाजार शब्द कधी प्रचलित झाला ?

१८ व्या शतकात घोडेबाजार या शब्दाचा सर्वात जास्त वापर झालेला दिसतो. १८२० च्या दरम्यान परप्रांतात उच्चवर्गीय आपल्या करमणुकीसाठी घोडा विकत घेऊन किंवा त्यावर भरगच्च पैसे लावून घोड्यांच्या स्पर्धेत सहभागी होत.

या व्यापारातील नफा पाहून अनेक व्यापाऱ्यांनी घोडे बाजारात घोड्यांच्या विक्रीला सुरुवात केली होती. काही व्यापारी इतर काही व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीत घोडे खरेदी करत आणि अधिक नफा कमवण्यासाठी घोड्यांची किंमत तिप्पट पटीने वाढवून विकत.

अनेक व्यापारी चांगल्या जातीचे घोडे लपवत आणि जास्त किंमत देईल त्याला ते घोडे विकत. मात्र कालांतराने घोडे बाजारात व्यापारी वर्ग करत असलेली ही चलाखी उघडकीस आली आणि व्यापारी वर्गात चढाओढ निर्माण झाली. त्यामुळे अठराव्या शतकापासून घोडेबाजार हा शब्द प्रचलित झाला.

भारतीय राजकारणात हा शब्द कधी आला ?

भारतात घोडेबाजार हा शब्द १९ व्या शतकात आल्याचं कळतं. साधारण ऑक्टोबर १९६७ मध्ये हरियाणातल्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातले आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीन वेळा पक्ष बदलला. आधी कॉँग्रेसला सोडून ते जनता पक्षात गेले नंतर ते पुन्हा कॉँग्रेसमध्ये आले.

काही तासांनी त्यांचं मत परीवर्तन झालं आणि ते पुन्हा जनता पक्षात गेले. त्यामुळे पत्रकार परिषदेत कॉँग्रेसचे नेते राव बिरेन्द्र यांनी गयालाल यांच्यावर टिपणी करत ‘आया लाल गया लाल’ असं वाक्य म्हटलं होतं.

ते वाक्य राजकारण्यांपासून ते सामान्य माणसांपासून सर्वांनी उचलून धरलं. महाराष्ट्रात गयालाल यांच्या कृतीवर भाष्य करताना त्याला घोडेबाजाराचा संदर्भ जोडला गेला.

राजकारणातील घोडे बाजाराचा अर्थ काय आणि घोडे बाजार का होतो ?

१. राजकारणात घोडेबाजार हा शब्द खासदार, आमदार अशा राजकीय उमेदवारांच्या लालचीपणासाठी वापरला जातो.

जेव्हा उमेदवार स्वत:चा फायदा पाहून सरकार अस्थिर करण्यासाठी इतर पक्षात प्रवेश करतात तेव्हा त्या उमेदवाराला घोड्याची उपमा दिली जाते आणि पक्षाच्या खेळीला बाजार असं म्हंटलं जातं.

२. दोन पक्ष दोन्ही पक्षाचा फायदा पाहत त्यावर अनौपचारीक चर्चा घडवून करार करतात आणि आपल्या उमेदवारांची अदलाबदल करतात किंवा काही उमेदवारांना पक्षातून काढत इतर पक्षातील उमेदवाराला त्याचा फायदा दाखवून आपल्या पक्षात घेतात याला देखिल घोडेबाजार असं म्हटलं जातं.

३. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाकडे बहुमतांचा आकडा कमी असेल तेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम पक्षातून केलं जातं. यावेळेस दोन पक्षात चांगलाच अटीतटीचा सामना राजकारणातील घोडेबाजारात रंगलेला दिसतो.

४. राजकारणातील घोडेबाजारात केवळ राजकीय पक्ष, राजकीय नेतेच सहभागी नसतात तर पॉवर ब्रोकरही सहभागी असतात. पॉवर ब्रोकर हे राजकारणातील घोडेबाजारात नेत्याला दुसऱ्या पक्षाचं आमिष देतात आणि पक्षाकडून नफा कमवतात.

५. राजकारणातील अनेक गोष्टी या सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोहोचण्याची योग्य खबरदारी घेतली जाते. राजकरणातील घोडेबाजारात घोड्यावर लावलेली रक्कम लाखांच्या, कोटींच्या घरात असते. स्थानिक पातळीवर ही रक्कम काही हजारांवरही लावली जाते.

घोडे बाजार म्हणजे अपमान आहे का ?

अनेक जण असाही विचार करतात की, उगाच त्या घोड्यांना बेईमान नेत्यांची उपमा का द्यायची किंवा काही जण नेत्यांंना घोडा म्हणून हिणवलं यासाठी आक्षेप घेतात. सामाजिक माध्यमांवर या दोन्ही गोष्टींचा राग काढला जातो पण हे दोन्ही विचार चुकीचे आहेत.

घोड्यांचा अपमान व्हावा किंवा नेत्यांचा अपमान व्हावा असा त्याचा अर्थ नाही. व्यवहारात असे अनेक शब्द रूढ होत जातात हा शब्द त्याचेच एक उदाहरण आहे.

तर ज्यांना राजकारणात रस आहे अशा आपल्या मित्रमैत्रिणींना हा लेख पाठवा. तुम्हालाही या लेखातील माहिती कशी वाटली, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button