फळ पीक विमा अर्ज सुरू झाला आहे, इथे करा अर्ज…
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मागविले अर्ज फळपीक विमा योजनेत सहभागाची संधी.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी कृषी विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रे आणि पपई या फळ पिकांचा विमा काढता येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास, या विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई दिली जाते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. ही विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विविध पिकांसाठी ऐच्छिक आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना आंबा या फळ पिकासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 14 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर व शिरूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकन्यांना येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तर दौड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, खेड, हवेली व शिरूर तालुक्यातील केळी उत्पादकांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत आणि इंदापूर तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत या विमा योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.
याशिवाय शिरूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत तर आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यातील पपई उत्पादकांना येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत या विमा योजनेत सहभागी होता येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले.