इतिहासताज्या बातम्या

का लिहिली ज्ञानोबांनी चांगदेव पासष्टी? सत्य जाणून व्हाल थक्क…

चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण होती. ती भेट केवळ एक इतिहास नाही तर आजही आपले वर्तमान आहे.

ती भेट घडली नसती तर संपूर्ण मानवजात एका उच्च अध्यात्मिक वाङ्मयाला मुकली असती. चांगदेव महाराजांच्या नावे ही ज्ञानोबांनी लिहिलेली चांगदेव पासष्टी फार कमी लोकांना ज्ञात आहे.

अध्यात्मिक क्षेत्रात देखील हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीला जितका मान आहे तितका मान चांगदेव पासष्टीला मिळताना दिसत नाही.

अनेक गुरू आणि कीर्तनकार ह्या चांगदेव पासष्टीचा अभ्यास करत नाहीत, तिथे सामान्य लोकांचे काय? पण ह्या चांगदेव पासष्टीचा जन्म का आणि कसा झाला?

माऊलींचा नि चांगदेवांचा संवाद कसा होता? काय आहे ह्या चांगदेव पासष्टीमध्ये हे सारे काही जाणून घेऊ आजच्या लेखामध्ये.

पुणतांब्याचे योगेश्वर चांगदेव महाराज १४०० वर्षं जगले अशी आख्यायिका आहे. त्यांनी साऱ्या जीवसृष्टीवर आपले अधिपत्य स्थापन केले होते.

त्यांच्या सिद्धीमुळे ते प्रसिद्ध होते. योगाभ्यासामुळे नि विविध मंत्रांच्या वापरामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. एकीकडे चांगदेवांची ख्याती पसरत असताना इकडे ज्ञानोबांनी व त्यांच्या भावंडांनी भक्तीची अद्वय परंपरा जनमानसात रुजवली होती. ही ज्ञानोबांची ख्याती चांगदेवांच्या कानावर पडताच त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहायचे ठरवले.

इतके सिद्धयोगी असून त्यांना ज्ञानोबांच्या कीर्ती विषयी ईर्षा निर्माण झाली. ज्ञानोबांचा हा मार्ग मोडण्यासाठी त्यांनी हाती बोरू घेतला आणि पत्रास सुरुवात केली.

ण खूप वेळ चांगदेव महाराज शांत बसून राहिले. आशिर्वाद देऊन पत्र सुरू करावे तर ज्ञानोबा ज्ञानी आहेत आणि दंडवत करावा तर वयाने लहान आहेत.

खूप वेळ गेला अखेर चांगदेवांनी कोरेच पत्र माऊलींना पाठवले. त्यांनी निरोप दिला, की ज्ञानेश्वर जर इतके विद्वान असतील तर ह्या कोऱ्या पत्रातला मजकूर समजून घेतील.

ते पत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या हाती एका दूताने आणून दिले. माऊली आपल्या भावंडांसोबत बसलेले होते. मुक्ताबाई त्या पत्राकडे बघून हसल्या आणि ज्ञानोबांना म्हणाल्या “दादा… आपला चांग्या कोरा तो कोराच राहिला.” मुक्ताबाईंच्या त्या वाक्याने अनेकांना हसू आले.

पण मुक्ताबाईंनी चांगदेवांची चेष्टा नव्हती केली. त्यांनी तर वात्सल्य प्रेमामुळे चांगदेवाचा गुण सांगितला होता. कोऱ्या पाटीवर स्वच्छ आणि चांगले अक्षर उमटते. त्याचप्रमाणे ह्या कोऱ्या अर्थात निष्पाप चांगदेवाला आता गरज होती शुद्ध ज्ञानाची.

त्यांची ती वात्सल्य प्रेमाची भूमिका निवृत्तीनाथांना समजली. तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना आज्ञा केली की ह्या रिक्त पत्रावर चांगदेवांना अद्वय तत्वज्ञानाचे ज्ञान द्या.

काश्मीरच्या नाथसंप्रदायाकडून आलेली ही अद्वय सिद्धांताची परंपरा आता ज्ञानोबा माऊली लिहिणार होते. ह्याच परंपरेला चिद्विलास देखील म्हणतात. ह्या सिद्धांताद्वारे उद्धार केवळ चांगदेवाचा नव्हता तर तो समस्त मानवजातीचा होता.

चांगदेवांना निवृत्तीनाथांनी हा खाऊ दिला होता ज्याचे लिखाण ज्ञानोबांनी केले होते. अशा ढोंगी साधना आणि सिद्धीमुळे आयुष्याचा ऱ्हास होतो. मानवाचा उद्धार करते ती केवळ भक्तीच. म्हणून ह्या चांगदेव पासष्टीचा जन्म झाला. पासष्ट ओव्यांमधून माऊलींनी चांगदेवांना अध्यात्माचा उपदेश दिला.
नेमका देव कसा आहे त्याचे स्वरूप काय? अध्यात्म काय आहे? हे जग कसे आहे? अद्वय सिद्धांत म्हणजे काय? हे सारे माऊलींनी आपल्या ह्या चांगदेव पासष्टी मध्ये लिहिले.

हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा अद्वय सिद्धांत स्पष्ट नसल्यामुळे तो समजण्यास कठीण जातो. तरी त्याचा गंध मात्र हरिपाठात जाणवतो. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या अनुभवामृतामध्ये हा अद्वय सिद्धांत स्पष्ट सांगितला असला तरी तो समजण्यास अतिशय अवघड वाटतो.

पण ह्या पासष्ट ओव्यांमध्ये हा सिद्धांत अतिशय सोपा वाटतो. जणू आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी ही एक गुरुकिल्ली आहे. केवळ गरज आहे कोऱ्या मनाची. जेणेकरून त्यावर हे शब्द स्पष्ट उमटतील.

“स्वति श्रीवटेशु। जो लपोनि जगदाभासु। दावी मग ग्रासु। प्रगटला करी।। अशा शब्दांनी माऊली सुरुवात करतात. ते म्हणतात की, ‘हे चांगदेवा, परमात्मा ह्या जगात दिसत नसला तरी त्याची प्रचिती होताच ह्या जगाचा भास होत नाही, उरतो तो केवळ परमात्मा.
सोनें सोनेपणा उणें। न येतांचि झालें लेणें। तेंवि न वेंचतां जग होणें। अंगे जया।। अर्थात सोन्याचे दागिने घडवल्याने त्यातले सोने संपत नसते. तसेच हे जग निर्माण झाले तरी त्यातला ईश्वर नष्ट होत नाही.

मुळात हे जग देवाचे स्वरूप नसून तोच पांडुरंग परमात्मा हे जग बनून राहिला आहे. जेविं नाममात्र लुगडें। येर्‍हवी सूतचि तें उघडें। कां माती मृद्‌भांडें।जयापरी।। माऊली म्हणतात एखाद्या वस्त्राला लुगडे म्हणतात तर दुसऱ्या वस्त्राला दुसरे नाव असते पण म्हणून त्यातले सूत अथवा कापड हा प्रकार नष्ट होत नसतो.

तेच मातीच्या भांड्याला आकार दिल्याने त्यातला माती हा घटक संपत नसतो. मुळात मातीचीच घागर बनलेली असते. कापडच लुगडे बनले असते.

तसेच हा ईश्वर नि ही सृष्टी आहे. हे जग ईश्वराचा अंश नव्हे तर तो स्वतःच हे जग आहे. समुद्र जसा लाटांमुळे झाकत नसतो. लाटा नि समुद्र एकच तसा ईश्वर नि हे जग एकच आहे. उगीच माया माया म्हणत घरदार सोडून देव शोधायला जाऊ नये.

देव शोधण्याची नाही अनुभवण्याची गोष्ट आहे हेच माऊलींनी चांगदेवांना नि पर्यायाने आपल्याला सांगितले आहे. ह्या ओव्यांचा अभ्यास प्रत्येकाने करावा.

निवृत्तीनाथांनी लावलेल्या ‘ज्ञानेश्वर’ वृक्षाच्या ‘चांगदेव पासष्टी’ नामक सावलीत आपण आपले आयुष्य व्यतीत केले पाहिजे. तेव्हा कुठे आयुष्याचे सार्थक होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button