इतिहासताज्या बातम्या

‘असे’ करावे गडकिल्ल्यांचे संवर्धन; एकदा नक्की वाचा…

गड किल्ले म्हणजे मराठी लोकांसाठी जीव की प्राण. महाराष्ट्राचे वर्णन करताना गडकोटांचा उल्लेख होणार नाही असे शक्यच नाही. गडकोटांची कणखरता महाराष्ट्रातील लोकांमध्ये दिसून येते.

ह्याच भावनेतून सारे शिवभक्त गडकोटांवर जात असतात. काही पर्यटक मंडळी मात्र किल्ल्यांवरचे वातावरण दूषित करत असतात.

पण खऱ्या शिवभक्तांचा ओढा असतो तो गडकोटांच्या संवर्धनाकडे. किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे कारण महाराष्ट्र राखायचा असेल तर इतिहास वाचवला पाहिजे.

इतिहास तेव्हाच वाचेल जेव्हा किल्ले शाबूत राहतील. कारण शिवरायांच्या इतिहासाचा एक भक्कम पुरावा हेच गडकिल्ले आहेत. आजच्या लेखात आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ल्यांचे संवर्धन कसे करायचे हे पाहणार आहोत.

कधी कधी किल्ले संवर्धन करताना खूप चुका होतात. मात्र त्या चुकांकडे आपले दुर्लक्ष होते आणि किल्ल्यांचे संवर्धन होण्याऐवजी नुकसानच होऊन बसते.

पण ह्या लेखातून आपल्याला समजेल की नेमके संवर्धन काय असते? ते कसे केले पाहिजे? ज्यांना गडकोटांची काळजी घ्यायला आवडते त्यांनी सर्वप्रथम किल्ल्याची माहिती घ्यावी.

किल्ला कोणाचा, कोणी बांधला, त्यावर काय काय आहे, त्याची श्रेणी व प्रकार कोणता हे पाहावे. भुईकोट, जलदुर्ग, वनदुर्ग, गिरिदुर्ग असे प्रकार पाहून कार्य करावे. त्या किल्ल्यावरील वास्तूंचे छायाचित्र काढावेत. त्या वास्तूंचे मोजमाप करावे. ह्या गोष्टी प्राथमिक आहेत.

ह्या प्राथमिक गोष्टी पूर्ण झाल्या की मग संवर्धन सुरू करावे. त्या आधी हे समजून घेतले पाहिजे की किल्ल्याचे संवर्धन तीन गोष्टी वापरून करावे लागते. हाच नियम पुरातत्व विभागाने सांगितला आहे. त्या तीन गोष्टी म्हणजे

१) अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण

२) वास्तूंची दुरुस्ती व डागडुजी

३) वस्तूंचे जतन व संवर्धन.

ह्यातला पहिला प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. सर्वेक्षण मुख्य सहा पद्धतीने होते. पुरातत्व पद्धतीने वस्तूंचे सर्वेक्षण होते. भौगोलिक माहितीचे सर्वेक्षण दुसरी पायरी आहे.

वास्तू नेमक्या कुठे आहेत ह्याचे सर्वेक्षण ही तिसरी पायरी आहे. आंतरजालावरून किल्ल्याची माहिती व चित्र संकलन करून त्याचे सर्वेक्षण करणे ही चौथी पायरी आहे. सर्वेक्षणामध्ये वास्तूंचे मोजमाप पूर्ण होते. तसेच शेवटी गडावरील द्वार, घरे, तळी इत्यादी गोष्टींचे चित्र रेखाटने महत्वाचे असते.

आता संवर्धन म्हणजे पूर्णबांधणी नव्हे. किल्ले पुन्हा बांधून काढावे असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी इतिहासाची संमती लागते.

मनात आले म्हणून कोणतीही इमारत उभी करता येत नाही. त्यामुळे गडसंवर्धन करणाऱ्या शिवभक्तांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की आपल्याला किल्ले पुन्हा बांधून काढायचे नाहीयेत तर ते जतन करायचे आहे. पुनर्बांधणी होऊ शकते पण त्यासाठी तितके सर्वेक्षण, तितका अभ्यास आणि तितके पुरावे गरजेचे असतात.

आपल्या मुख्य जवाबदऱ्या काय आहेत? तर गडावरील प्लास्टिकच्या बाटल्या खाली पुन्हा घेऊन येणे. गड प्लास्टिक मुक्त करणे. काही संघटनेतील लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा आकार कमी करण्याचे यंत्र बसवले आहे.
त्यात बाटली दाबायची आणि तिचा आकार कमी करायचा. जेणेकरून कचराकुंडी मध्ये २०० पेक्षा जास्त बाटल्या बसतील. हा उपक्रम अत्यंत चांगला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे अनेक संवर्धकांना झाडे कोणती आणि कुठे लावायची हे माहिती नसते. अनेकदा तटबंदीवर झाडे लावून त्या तटबंदी आपण कमकुवत करत असतो. सिताफळासारखे झाड खूप टिकते म्हणून ते लावावे. वनखात्याकडून तशी माहिती घेता येते.

भिंती पुन्हा बांधता येतात पण त्या आधी खाली पडलेले दगड उचलून ते व्यवस्थित रचावे. तळ्यातील पाण्यावर जमलेला गाळ काढावा. अनेकजण किल्ल्यावर लाकडी द्वार लावतात तिथे पावसाचे पाणी जाण्याची सोय करावी म्हणजे लाकूड फुगत नाही.

गडांवरील मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर तो किल्ल्याला शोभेल असा करावा. अगदी भडक रंग देऊन त्याची शोभा घालवू नये.

शौचालय देखील उचित ठिकाणी असावे. शिवाय संपूर्ण किल्ल्याचा नकाशा लावता आला तर उत्तम. ज्याचा फायदा गड चढणाऱ्या लोकांना होईल.

किल्ल्यावर शिलालेख असतील तर सर्वप्रथम तो शिलालेख वाचावा. तो लिहून काढावा. नंतर कागदाच्या ओल्या लगद्याचा वापर करत तो शिलालेख त्यावर छापावा.
त्या शिलालेखाचे छायाचित्र घ्यावे. पावसाने त्याचे नुकसान कसे होणार नाही ह्याची तजवीज करावी. किल्ल्यांचे खासगीकरण, रोपवे बांधणी, खाली शिवसृष्टी निर्माण करणे हे वेगळे विषय आहेत.
पण आपली एक शिवभक्त म्हणून जवाबदारी आहे की महाराजांचे हे गडकोट आपण जतन केले पाहिजे. हीच सेवा शिवरायांच्या चरणी वाहत शिवकार्य करत राहावे. आपणही अशा कोणत्या मोहिमेत सामील झाला असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button