ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

आपण आनंदी नसण्याची सुरुवात कधी होते?

सुख आणि दुःखाभोवती माणसाचं संपूर्ण आयुष्य फिरत असतं. आयुष्यात फक्त सुख असावं असंच आपल्या प्रत्येकाला वाटत असलं तरी दुःखाचा सामनाही आपल्याला करावाच लागतो. कधीकधी हे दुःख परिस्थितीमुळे येतं तर बऱ्याचदा ते आपणच खेचून आणत असतो. आपलाच स्वभाव, निराशावादी दृष्टीकोन यामुळे दुःखाचं वलय मोठं होत जातं. नेमकं दुःखी होण्याची सुरुवात कधी होते याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

१. जेव्हा आपण स्वतःची जबाबदारी घेत नाही.

आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरंतर अतिशय मुलभूत अशी ही गोष्ट आहे पण तरीदेखील त्याचा भार आपण इतरांवर टाकतो आणि तो भार झेलला गेला नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या गेल्या नाही तर आपण निराशेकडे झुकायला लागतो.

आपली जीवनशैली, आपला मूड, आपले खर्च इतरांनी सांभाळावे अशी आपली अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपण दुःखी व्हायला लागतो. त्यापेक्षा स्वतःला आनंदी करण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न केले, स्वतःच्या आवडीनिवडींवर भर दिला तर दुःख आपल्यापासून दूर राहू शकेल.

२. जेव्हा आपण आपला वेळ इतरांना दोष देण्यात वाया घालवतो.

माणसाला स्वतःच्या भ्रमनिराशेचं खापर इतरांवर फोडण्यात फार आनंद वाटत असतो. काही चूक झाली, मनाविरुद्ध काही घडलं की इतरांना दोष देऊन मोकळं होणं सोपं वाटत असतं. पण या सगळ्यात आपण किती निरर्थक वेळ वाया घालवत आहोत, दोष देऊन मानसिक समाधानापलीकडे आपण काहीही साध्य करत नाहीये याचा विचारदेखील आपण करत नाही.

खरंतर मनाविरुद्ध कोणतीही परिस्थिती घडली तर त्यात कोणाला दोष देण्यापेक्षा त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यावर भर दिला पाहिजे. परिस्थिती, व्यक्ती चुक कोणाचीही असो त्यांना दोष देणं ताबडतोब बंद करणं आपल्या भल्याचं ठरतं. समस्या आली तर समस्येवर रडण्यापेक्षा त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग शोधणं महत्त्वाचं आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा दुःखाची अनेक कारणं आपण दूर करु शकू.

३. जेव्हा आपण स्वतःच्या कमतरतांमध्ये अडकून पडतो.

काही जणांमध्ये इतका कमी आत्मविश्वास असतो की त्यांच्या आयुष्यात कुठे काही घडलं की लगेचच ते स्वतःमधल्या कमतरतांना दोष द्यायला लागतात. आपल्यामध्ये काय चांगलं आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा काय वाईट आहे, आपण काय चांगलं करु शकत नाही यामध्येच ते अडकून पडतात. अशा स्वभावामुळे आयुष्यात जे काही चांगलं करता येणार असतं तेही करता येत नाही आणि या सगळ्यातून येणारा पश्चाताप आणखीनच मोठा असतो.

हे टाळण्यासाठी जेव्हा जेव्हा मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येईल, मन जेव्हा स्वतःमधल्या कमतरतांवर लक्ष देईल तेव्हा तेव्हा त्याला तिथून दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मनात वाईट गोष्ट आली की लगेचच त्याला चांगल्या गोष्टींची आठवण करुन देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरु शकतं.

४. जेव्हा आपण स्वतःच्या हक्कासाठी लढणं सोडून देतो.

स्वतःचे हक्क, अधिकार या गोष्टीकडे आजच्या काळातही लोकांकडून सर्रास दुर्लक्ष केलं जातं. स्वतःलाच गृहित धरलं जातं. मग जेव्हा अन्यायकारक परिस्थितीचा सातत्याने मारा होतो तेव्हा मात्र त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढणं अशक्य होऊन जातं. ही हतबलता खूप मोठं दुःख आयुष्यात आणले. त्यामुळे आपल्या हक्कासाठी आपल्याला लढता आलंच पाहिजे.

कोणी आपल्याबद्दल काय विचार करेल, आपण हक्कावर बोललो तर समोरच्याला वाईट वाटेल का यामध्ये अडकून न पडता फक्त हक्क आणि आपण या गोष्टीवर ठाम राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुरुवातीला कठीण वाटेलही पण हक्क न मागून दुःखी होण्यापेक्षा हक्क मागून आनंदी, समाधानाने जगणं आपल्या हिताचं आहे हे भान आपण ठेवलं पाहिजे.

दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच. त्याचा सामना आपण कसा करतो, दुःख आपण स्वतःच खेचून तर आणत नाहीये ना याचा विचारदेखील आपण केला पाहिजे. या सगळ्यात आपला दृष्टीकोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपला दृष्टीकोन व्यापक असायला हवा. याबरोबरच, वेळीच दुःखाला बाजूला करुन आनंदी राहण्याचा प्रयत्न आपण केला तर आयुष्याची कित्येक पट जास्त मजा आपल्याला लुटता येईल, हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button