सावरकरांच्या बालपणीच पेरली होती देशप्रेमाची बीजे!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांची आज १३९ वी जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी सावरकरांचा जन्म नाशिक मधील भगूर इथे झाला. सावरकरांच्या आयुष्यात निवांत क्षण कधी नव्हतेच मुळी. जे काही शांत दिवस त्यांना लाभले ते त्यांच्या बालपणातच. आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्या बालपणातील काही रंजक व तितक्याच देशभक्ती विषयक गोष्टींबद्दल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बालपणीचे रंजक प्रसंग
आईचे व सर्व वाड्यातील मंडळींचे लाडके असणारे विनायक पुढे इतके मोठे क्रांतिकारक होतील असे बहुदा कोणालाच वाटले नसावे. जो तो व्यक्ती त्यांचे लाड पुरवायचा. त्यांचा एक छंद असा होता की, आई देवपूजेला बसली की अगरबत्तीचा धूर ते हातात धरू पहायचे.
विनायकास तो धूर काही पकडता आला नाही मात्र त्यांच्या विद्ववत्तेने विज्ञानाचा सुगंधी धूर पुढे त्यांनी नेमका पकडला हे नक्की. सावरकरांचे हे विश्रांतीचे दिवस वाटत असले तरी त्यांच्यातील व्यक्तिमत्व घडवणारे काही प्रसंग त्यांच्या बालपणात घडले होते. ज्यांच्या अनुभवावर त्यांनी पुढे इतके मोठे कार्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणी अगदी इतर मुलांप्रमाणेच सामान्य होते. पण त्यांच्यातील काही असामान्य गोष्टी त्यांना वेगळे ठरवतात. त्यांना आईचे छत्र खूप काळ लाभलेच नाही. आई गेल्यानंतर मोठ्या भावाच्या पत्नीने अर्थात येसू वहिनीने त्यांना मायेचे छत्र दिले.
येसू वहिनीच्या सान्निध्यात सावरकर शिकू लागले. सावरकर स्वतः उत्तम कविता करायचे आणि येसू वहिनी देखील कविता करायच्या. त्यामुळे सावरकरांचे कवित्व अधिकच झळाळून निघाले. येसू वहिनी त्यांच्या कविता ऐकून त्यांना कधी सल्ला तर कधी शाबासकी द्यायच्या. नाशिकमध्ये असेच शिवजयंती निमित्त सावरकरांनी शिवरायांवर गीत लिहिले होते,
त्यात त्यांना पहिला क्रमांक मिळाला. लोकमान्य टिळकांच्या हातून त्यांना बक्षीस मिळाले आणि तेव्हापासून त्यांना मोठमोठे लोक भेटू लागले. बालपणी मिळालेल्या ह्या अनुभवांचाच सावरकरांना पुढे नक्कीच उपयोग झाला असेल. ह्याच प्रेरणेतून त्यांनी बंदूक, शस्त्र, तलवार शिकून घेतले. जोर बैठका मारणे, लांबवर धावत जाणे, व्यायाम करणे हे सावरकरांचे नियमित उपक्रम होते.
म्हणूनच त्यांना समुद्रात उडी टाकल्यावर खूप वेगाने पोहोता आले असावे. क्रांतिकारक बनायचे हे त्यांना चाफेकरांकडे बघून वाटले. त्यांनी ‘मित्र मंडळ मेळावा’ स्थापन करत अनेक तरुणांना लहापणीच संघटित केले. घरातील देवी पुढे शपथ घेऊन बाल सावरकरांनी देशाला स्वतंत्र करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती.
जसे सावरकर विचारवंत, क्रांतिकारक, समाजसुधारक होते तसे ते मराठी भाषेचे उत्तम जाणकार व साहित्यिक होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून काढले होते. तसेच घरातील ऐतिहासिक पुस्तके त्यांनी वाचली होती.
ह्या सगळ्या गोष्टींचा सार त्यांनी एका वहीत लिहिला. त्या वहीचे नाव ‘सर्व सार संग्रह’. पुढे सावरकरांनी काही घरातील पोथ्या वाचल्या आणि तेव्हा ‘देविदास विजय’ नावाचे आपले छोटे पुस्तक लिहिले. केवळ वाचून लिहून न थांबता सावरकर वक्तृत्व स्पर्धेत पण भाग घ्यायचे.
एकदा त्यांना वक्तृत्व स्पर्धेत पाहिले पारितोषिक मिळाले तेव्हा आयोजकांनी त्यांना विचारले की हे भाषण तुम्हाला कोणी लिहून दिले? त्यावर सावरकरांनी हे मी स्वतः लिहितो व बोलतो असे सांगितले.
आयोजकांना संशय आला पण सावरकरांनी त्यांना उत्तर दिले की “ज्ञानेश्वर माऊली लहान वयात ज्ञानेश्वरी लिहू शकतात. शिवाजी महाराज लहान वयात तोरणा किल्ला जिंकू शकतात. मग मी का हे करू शकत नाही?” असे सांगत त्यांनी आयोजकांना विनम्रतेने पटवून दिले होते की आपल्याकडील ज्ञान आपलेच आहे.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे सावरकरांनी नेहमीच आपल्या लहापणी संघटन केले. वाचन केले. ह्याच गोष्टींमुळे सावरकर विशेष ठरतात. त्यांच्या बालपणात घडलेल्या गोष्टी देखील विशेष ठरतात. अशा या स्वातंत्र्यवीर विनायक दमोदर सावरकर यांना शतश: नमन!