इतिहासताज्या बातम्या

दिल्लीचे तख्त महाराष्ट्र असे राखतो…

‘भीमथडीच्या तट्टांना ह्या यमुनेचे पाणी पाजा, ‘जय जय महाराष्ट्र माझा हे राजा बढे ह्यांचे गीत आपण शाहीर साबळे ह्यांच्या स्वरात आजवर ऐकत आलेलो आहोत. हे गीत ऐकून आजही महाराष्ट्र धर्माचे मर्म आपल्या मनात जागृत होते. तसे हे गीत समजून घ्यायला सोपे आहे पण ह्यातल्या काही ओळी किंवा शब्द लवकर समजत नाहीत. भीमथडी म्हणजे काय? तट्टांना पाणी पाजावे म्हणजे काय? कोणाला नि कसे पाणी पाजायचे आहे? एकूणच ह्या गीताचा अर्थ काय? इतिहास, परंपरा नि भविष्य सारे काही ह्या गाण्यात आहे. कसे ते पाहुयात आजच्या लेखात.

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।
जय महाराष्ट्र माझा”

राजा बढे आपल्या या गीतामध्ये महाराष्ट्राचा जयजयकार करत आहेत. गर्जना करणाऱ्या महाराष्ट्राचा जयजयकार असो म्हणत ते सांगतायत. इथली विचारधारा इथला इतिहास, रेवा, वरदा, कृष्ण, कोयना सारख्या नद्या महाराष्ट्राला आजपर्यंत जगवत आल्या आहेत. इतक्या नद्या अर्थात इतकं वैविध्य असून देखील इथले लोक एकीचे पाणी भरतात.

जातीयवाद इथेच ठेचून पुरोगामी महाराष्ट्र इथले लोक घडवत आहे. आता वेळ आहे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजण्याची. थडी म्हणजे किनारा आणि तट्ट म्हणजे घोडे. अरबी आणि तुर्की घोड्यांचे संकर्ण होऊन जे घोडे बनले त्यांना भीमा नदीच्या जवळ ठेवण्यात आले त्यांना तट्ट म्हणतात. तर भीमा नदीच्या किनारी असणाऱ्या मराठी घोड्यांना यमुनेचे पाणी पाजा.

पण मराठ्यांनी पूर्वी हेच केले. आज घोडे देखील नाही आणि तशी आवश्यकता देखील नाही. पण ह्या ओळी प्रतिकात्मक आहेत. खरा अर्थ हा आहे की आपल्यातील गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर उत्तरेत जा. जगभर जा आणि मराठी विचार सर्वत्र प्रसारित करा. रामदास स्वामींच्या ओव्या अशाच स्वरूपाच्या आहेत.

“आहे तितुके जतन करावे। पुढे अधिक मेळवावे। महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे।।”

हाच विचार ह्या गीतातल्या ओळींमधून दिसतो. यमुना नदी केवळ प्रतिकात्मक असून महाराष्ट्र धर्म आता जगात पोहोचवण्याची वेळ आहे असा सल्ला राजा बढे ह्यांनी दिला आहे.

“भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा।
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा।।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा।
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।”

आता महाराष्ट्रातल्या लोकांचे वर्णन करताना कवी म्हणतात, आम्हाला गडगडणाऱ्या नभाची भीती नाहीच. पण अस्मानी सुलतान अर्थात प्रचंड मोठे सैन्य आणि साम्राज्य असणाऱ्या सुलतानांची देखील आम्हाला भीती नाही. वेळ पडलीच तर आम्ही त्यांना आमच्या ह्या तिखट जिभांनी उत्तर देऊ. इथे शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारात नामोहरम केले होते हाच आदर्श कवीने मांडला आहे. म्हणून तर सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा असं म्हटलं आहे. आणि आता वेळ आहे महाराष्ट्रातील मराठ्यांनी दरीदरीतून एकच नाद करण्याची. तो नाद म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा.

“काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी।
दारिद्र्याच्या उन्हात शिजला। निढ़ळाच्या घामाने भिजला।
देशगौरवासाठी झिजला। दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा।।”

ह्यात देखील महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे. काळी छाती आणि त्यावरची लेणी म्हणताच वेरूळच्या लेण्या पुढे उभ्या राहतात. इथल्या लोकांचे पोलादी मनगट जीवघेणे खेळ खेळतात. अर्थात धाडसी लोक इथे जन्मला आले. पण पुढे कवीने महाराष्ट्राची सद्य:स्थिती सांगितली आहे. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, कपाळावरील घामाने भिजला असा हा कष्टकरी महाराष्ट्र! तरीही देशाच्या गौरवासाठी झिजला. इतके होऊनही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दिल्लीचे तख्त राखणारा हाच आमचा महाराष्ट्र आहे.

ह्या गीतात जणू कवीने आपल्याला सल्लाच दिला आहे की ह्या दारिद्र्याच्या उन्हातून आता समाधानाच्या नि सुखाच्या सावलीत बसायचे असेल तर आपण भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजलेच पाहिजे, शिवशंभू राजप्रमाणे अस्मानी सुलतानांना आपल्या जिभांनी उत्तर दिलेच पाहिजे. गर्जना ही झालीच पाहिजे.

तेव्हा कुठे दिल्लीचे तख्त मराठी मताने चालेल. दिल्लीचे तख्त मराठी मतानेच का चालावे असा प्रश्न पडला असेल तर हे ध्यानी घ्यावे लागेल की हिमालयाच्या मदतीसाठी नेहमी आणि नेहमीच सह्याद्री धावून जातो. त्यामुळेच अभिमानाने म्हणावेसे वाटते जय जय महाराष्ट्र माझा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button