संत तुकारामांच्या मते संवाद ‘असा’ असावा…
‘संवाद कौशल्य’ ही काळाची गरज आहे. आपल्याला बोलताना काय काळजी घ्यायला हवी? हे संत तुकारामांनी या काव्यातून सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊया.
शब्दांचा म्हणजे आपल्या बोलण्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावर तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरही होत असतो. शब्द हे मौल्यवान दागिन्यांप्रमाणे आहेत. जसे दागिने वापरण्यापूर्वी आपण घासून-पुसून लख्ख करतो अगदी त्याचप्रमाणे शब्दही केले जावेत.
उपदेशात्मक बोलताना तासून बोललेल्या शब्दांमुळे लगेच समोरच्याचे डोळे उघडतील. जे बोलायचे आहेत ते योग्य शब्द आहेत ना, याची पडताळणी करणं गरजेचं आहे! शब्द योग्य नसतील गोष्टी बिघडतात. म्हणून म्हणतात ‘बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला’.
शब्दांची ताकद खूप मोठी आहे. तीक्ष्ण शब्दांत बोललो तर समोरच्याशी असलेलं नातं तुटेल, व्यक्ती दुरावेल. शब्द कात्रीचं काम करतात. गोड, मधुर शब्दांत बोललो तर नवीन नातं तयार होईल. शब्द कसे असावेत, त्यांचा क्रम, नियम हे सगळं संवाद शास्त्राच्या नियमानुसार बरहुकूम आपण करावं.
बोलताना जितकं गरजेचं आहे, तेवढंच बोलावं ते ही मुद्देसूद व थेट असावं, व ते कंटाळवाणं नसावं. तसंच जे बोलायचं ते ठामपणे बोलता यायला हवं.
आपण कोणत्या ठिकाणी काय बोलायला हवं? याबद्दल बोलणाऱ्याचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, काय बोलावं ही सुसूत्रता आणणं फार गरजेचं असतं. संवाद साधताना या बाबी सगळ्यात महत्वाच्या आहेत.
संबंध जपण्यासाठी सुसंवाद होणं महत्वाचं आहे. यावेळी सुसंवाद कसा करावा तर एखाद्याची कमतरता, त्याचं व्यंग किंवा गुपित त्याच्या जातपात धर्मावरून द्वेषपूर्ण भाषा, शब्दांचा वापर करू नये. तर चांगले संबंध राहतात.
कमीतकमी शब्दांत समजावणे हे जमायला हवं, बरं हे थोडक्यात समजावलेलं समोरच्याला समजायला ही हवं. या समजावण्याच्या प्रक्रियेत बोलताना मुद्देसूद बोलायला हवं. ही कला आहे, त्यालाच संवादशास्त्र म्हणतात.
शब्द वापरताना त्यातून बोलणारा किती ज्ञानवंत आहे ते समजून येतं. तसेच बोलणारा ज्या वातावरणातून आलेला असतो तसेच त्याचे शब्द असतात.
भक्तीही शब्दांमधून कळून येते. बरं जे पण बोलणं आहे त्यात स्वतःचा अनुभव असावा. विना अनुभवाचे शब्द परिणामकारक वाटत नाहीत.
शब्द विचार करून वापरले नाही तर वातावरण ढवळून काढतात. शांतता भंग करतात. शब्दांमध्येच सगळं मंगल करण्याची ताकद आहे. शब्दांनी आपल्याला वेढलेलं आहे. म्हणून शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरावेत.
शब्दांमुळे दंगल घडून रक्तपात होऊ शकतो. भांडणे होऊ शकतात त्यामुळे स्वतःच तसचं मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच बोलताना जीभ ताब्यात हवी.
तेच शांतीकारक ठरू शकेल. तर संवाद कौशल्याचं महत्व हे आपल्याला यावरून कळते. म्हणून आपण विसंवाद टाळून सुसंवाद करा.