ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

मुद्दाम ‘हे’ विचार करा आणि आनंदी रहा!

आपले विचार आपलं आयुष्य आनंदी आहे की दुःखी हे ठरवत असतात. त्यामुळे चांगले विचार करणं अतिशय गरजेचं आहे. मनात मुद्दाम ठरवून चांगले विचार करण्याची सवय आपण लावली तर ही सवय आयुष्यभर आपल्या हिताची ठरु शकते.

म्हणूनच या लेखातून अशाच काही विचारांवर लक्ष वेधलं आहे ज्यातून तुमचं आयुष्य आनंदी होऊ शकेल.

१. तुम्ही काय ऐकता आणि कोणाचं ऐकता ते तुम्ही बनता!

आपल्या कानावर दिवसभर अनेक गोष्टी पडत असतात. या गोष्टी कधी आपल्यासाठी चांगल्या असतात तर कधीकधी आपलं मन, विचार बिघडवणाऱ्या असतात. त्यामुळे आपण काय ऐकतो आणि कोणत्या व्यक्तींचं ऐकतो याबाबत सजग राहिलं पाहिजे.

ज्या लोकांचे विचार चांगले नाहीत, ज्यांची वागणूक अनैतिक आहे अशा माणसांचं बोलणं कधीही ऐकू नये. अशा लोकांचं बोलणं चुकून कानावर पडलं तरी लगेचच ते विचारातून दूर करावं.

व्यावहारिक, आशावादी, समाधानकेंद्रित, ध्येयवादी, लोकांच्या सहवासात राहून त्यांचं बोलणं ऐकणं आपल्या हिताचं ठरु शकतं. अशाच लोकांची निवड आपण करावी.

२. आपण आपल्या आयुष्याकडे जसं पाहतो तसंच आयुष्य आपल्याला दिसतं.

आयुष्य समाधानाने जगण्यासाठी आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचा असतो. आपण रोजच्या दिवसाकडे सतत निराशेने पाहत असू, तक्रारींमध्ये अडकून पडत असू तर आयुष्य तसंच निरस, बोअरिंग असल्याचं आपल्याला वाटायला लागतं.

पण हेच जर आपण रोजच्या दिवसाकडे सकारात्मकतेने पाहत असू, एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहतन घेत असू तर आयुष्य आपल्याला आनंदी, समाधानी असल्याचं दिसून येईल.

३. तुम्ही जिंकावं असं वाटत नसेलल्या लोकांशी संपर्क टाळा.

काही लोकं आपल्यासमोर अतिशय गोड बोलतात पण आपल्याला कुठे यश मिळालं, आपल्या आयुष्यात आनंदाच्या काही घटना घडल्या तर मात्र अशा लोकांना त्रास होतो. आपल्यासोबत काही चांगलं होऊ नये अशी त्यांची इच्छा असते.

अशा माणसांपासून आपण चार हात दूर रहावं. अगदीच संपूर्ण संपर्क बंद करावे असं नाही पण संपर्क मर्यादित करावा. अशा माणसांच्या सान्निध्यात राहिल्याने आपल्यामध्ये प्रचंड नकारात्मकता निर्माण होते. स्वतःविषयी अनेक शंकाही उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांना दूर ठेवलेलंच बरं.

४. जे योग्य वाटतं तेच करा.

आपल्याला जे काही करणं योग्य वाटतं तेच करण्यावर आपण भर दिला पाहिजे. फक्त आपल्या कृतीतून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बरेचसे लोक इतरांच्या दबावामुळे त्यांना जे काही करायचं आहे ते करायला घाबरतात.

इतरांकडून थट्टा केली जाईल, कमी लेखलं जाईल अशी अनेक प्रकारची भीती त्यांच्या मनात असते. या सगळ्यांना दूर ठेवत आपलं जीवन आपण आपल्या हिंमतीवर जगायला शिकलं पाहिजे.

स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःचा आनंद ज्यामध्ये आहे फक्त त्यावरच लक्ष केंद्रीत करा.

५. भूतकाळातल्या दुःखांकडे बघू नका.

प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ असतो. नकोशा आठवणी असतात. अशा आठवणी आपण सतत कुरवाळत बसलो तर वर्तमानकाळही दुःखी होईल. त्यामुळे भूतकाळातल्या दुःखाकडे कधीही बघू नये. त्यातून योग्य ती शिकवण घ्यावी.

एखादी दुःखद घटना, प्रसंग आपल्या आयुष्यात घडला असेल तर तो का घडला, आपण तो कशा पद्धतीने हाताळू शकलो असतो, त्या प्रसंगाचा कमीतकमी त्रास आपल्याला कसा झाला असता या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. त्या प्रसंगांना आठवून दुःखी होणार असू तर मात्र त्याकडे कधीही बघू नये.

हे सगळे विचार, कृती आपण वारंवार स्वतःला सांगितल्या पाहिजे. आपलं आयुष्य आनंदी करायचं असेल, समाधानाने भरायचं असेल तर स्वतःसाठी काय योग्य आहे याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे.

दुसऱ्यांच्या हातातल्या कठपुतळ्या होण्याचं टाळून स्वतःचा आनंद स्वतःच्या हातात ठेवण्यास आपण शिकलो तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

जितकं लवकर आपण हे सगळं ओळखू तितकं ते आपल्या भल्याचं राहिलं. त्यामुळे हे सगळे विचार वारंवार आठवत रहा आणि स्वतःमध्ये रुजवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button